उठसूठ चेक-इन करणारे : फेसबुकने तुम्ही कुठे आहात हे सांगण्यासाठी चेक-इनची सुविधा उपलब्ध केली आणि काही लोकांनी तो चेक-इन प्रकार जरा अतीच करायला सुरुवात केली. म्हणजे सारखं चेक-इन करायचं- आज काय - ही मंडळी घराशेजारच्या उडप्याच्या हाटिलात गिळायला गेली आहेत. उदया काय- घराजवळच्या मल्टिप्लेक्समध्ये कुठला तरी टुकार हिंदी चित्रपट बघायला गेली आहेत. बरं- नुसतं चेक-इन करुन ही मंडळी थांबत नाहीत. त्यात ’with' कोण-कोण आहे हे महत्त्वाचं. विशेषत: कपल्समध्ये हे फॅड असतं. म्हणजे ’झंप्या गाढव इज विथ पिंकी गाढव ॲट हॉटेल सत्कार’- छापाच्या पोस्ट करायच्या. (ही नावे काल्पनिक आहेत अर्थात.)
आता एखादा माणूस आणि त्याची बायको शनिवारी कुठच्या हॉटेलमध्ये गेले आहेत याच्याशी इतरांना काय करायचंय? पण असं स्वत:, स्वत:ची बायको/नवरा आणि एखादं-दुसरं सोबत असलेलं कपल - यांना विकेन्डला एखादया मॉल, मल्टिप्लेक्स किंवा हॉटेलमध्ये टॅग केलं की आपण किती ’कूल’ आहोत, आपलं मॅरिड लाईफ आणि सोशल लाईफ किती हॅपनिंग आहे असं या लोकांना दाखवायचं असावं. त्यात जर हे लोक कुठे सहलीला गेले तर मात्र यांना ऊत येतो. आधीच मर्कट, त्यातच मदय प्याला अशी त्यांची अवस्था होते. ते अगदी एअरपोर्टपासून चेक-इन आणि टॅग करायला सुरुवात करतात ते पार राहण्याचं हॉटेल, फिरण्याचे स्पॉट्स- जिथे जिथे रेन्ज मिळते तिथे तिथे फेसबुक भरत बसतात. कुठे कधी बाहेर गेले नसले, घरीच असले, तर आपण घरी आहोत, हे सुद्धा चेक-इन करुन फेसबुकवर टाकतात आणि त्यात घरातल्या लोकांना आणि घरी पाहुणे आले असले तर त्यांना टॅग करतात.
प्रेमात असलेले नवरा-बायको: तशी ही जमात अल्पसंख्य आहे. कारण प्रेमात पडून जरी लग्न केलं तरी एकदा नवरा-बायको झाल्यावर तुम्ही जमिनीवर येताच. पण ही काहीकाही कपल्स लग्नानंतरही फार प्रेमात वगैरे असतात. मग या प्रेमात असलेल्या बायका नवऱ्याला फेसबुकवरती ’माय शोनू’, ’माय स्वीटू’, ’माय हबी’ वगैरे संबोधित करतात. नवरेही बायकोला ’माय लव्ह’, ’wifey', 'बेबी’ वगैरे म्हणत असतात. मग हे लोक फेसबुकवरती एकमेकांची कौतुकं करत बसतात. एकमेकांच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला- एकाच घरात असले तरी एकमेकांना फेसबुकवरुन विश करतात. एकमेकांचे वेगळे किंवा दोघांचे एकत्र फोटो सतत टाकत बसतात. प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी फेसबुक हे माध्यम यांना आवडतं.
लहान मुलांचे पालक: या जमातीची ओळख यांच्या प्रोफाइल फोटोवरुनच होते. यांच्या प्रोफाइल किंवा कव्हर फोटोमध्ये यांची मुलं असतात. आता मुलासकट स्वत:चा फोटो कुणी टाकला तर ठीकच, पण हे लोक फक्त मुलांचे फोटो टाकतात- तेसुद्धा स्वत:चं प्रोफाइल पिक्चर म्हणून. ’मुलाचे फोटो टाकणं’ हा त्यांचा फेसबुकवरील मुख्य उदयोग असतो असं मात्र नाही. हे लोक सतत पालकत्वाबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचं मूलच कसं जगातलं सगळ्यात हुशार, गोड मूल आहे, मूल असल्यामुळे यांचं जीवन कसं सफल झालं आहे- हे फेसबुकवर टाकत बसतात. यांच्या मुलांची नावंही ठराविक असतात. मुलगा असेल तर आर्य, आर्यन, विहान, विवान, अथर्व, वेदांत, इशान, नील, अर्णव इत्यादी. मुलगी असेल तर आर्या, सिया, सानवी, सारा, रिद्धी, वगैरे. मुलांचे फोटो कितीही गोड असले तरी ते किती टाकायचे याला काही मोजमाप या मंडळींकडे नसते.
काही लोक तर आपल्या लहान मुलांच्या नावाचे फेसबुक अकाऊंट उघडतात. आणि मग त्यातून स्वत:च पोस्ट करत बसतात लहान मुलाच्या वतीने. आवरा रे कुणीतरी त्यांना!
भारतावर कावळ्यासारखी नजर ठेवून असणारी परदेशस्थ भारतीय मंडळी: ही मंडळी परदेशात स्थायिक झालेली असतात. परदेश म्हणजे अमेरिकेपासून दुबईपर्यंत कुठलाही देश पण त्यातही अमेरिका, कॅनडा किंवा युकेतील मंडळी या कॅटेगरीत जास्त आढळतात. तिथे राहात असलेल्या या लोकांचं भारताकडे भारी लक्ष असतं. आणि भारतातल्या प्रत्येक घडामोडीवर फेसबुकवरुन हे लोक सतत भाष्य करत असतात. अण्णा हजारेंचं आंदोलन, रॉबर्ट वद्राची मालमत्ता, क्रिकेट सीरीजमधला भारतीय टीमचा परफॉर्मन्स- या सगळ्यात या परदेशस्थ फेसबुककरांना भलताच रस असतो. यातही - जे लोक काही कारणामुळे थोडया कालावधीसाठी परदेशात राहतात (यात मीही आलेच) पण भारतातच स्थायिक होण्याचा ज्यांचा निर्णय झालेला असतो, ते लोक या अशा भारताबद्दल कॉमेन्टस करण्यात रस दाखवत नाहीत. कॉमेन्ट्स करणारी मंडळी ही जास्त करुन स्वत: ग्रीनकार्डधारक असतात आणि अमेरिकन नागरिकत्वाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू असते. भारत कसा वाईट आहे, भारतात भ्रष्टाचार कसा चालू आहे- यावर या लोकांची सतत टिप्पणी चालू असते. थोडक्यात- भारतात राहणाऱ्या लोकांना "कसे राहता तुम्ही त्या डर्टी इंडियात? आम्ही बघा कसे पृथ्वीवरच्या स्वर्गात राहतो" असे खिजवण्याचा यांचा हेतू असावा. भारतात राहणाऱ्या लोकांना नसते इतकी यांना भारतातल्या घडामोडींची माहिती असते. भारतातल्या चांगल्या गोष्टी यांना कधीच दिसत नाहीत. पण भारताला सतत नावे ठेवण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही. भारतात कुठे काहीही झाले- विशेषत: दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट वगैरे- तर हे लोक अमेरिकेत किंवा युकेत बसून सात्विक संतापाने भरलेले पोस्ट टाकतात. "हे असं कुठवर चालणार?" वगैरे बरंच काय काय. मात्र अमेरिकेत किंवा युकेमध्ये भारतीयांवर हेट क्राईमवाले जे हल्ले होतात (परवा Wisconsin ला झाला तसा) त्यावेळी मात्र ही मंडळी गप्प असतात (बहुधा भीतीने दातखिळ बसत असावी.)
अर्थात, या सगळ्या मंडळींमुळेच फेसबुकवर टाईमपास होतो त्यामुळे यांनी आपले हे चांगले काम असेच चालू ठेवावे ही कळकळीची विनंती :)
उत्कृष्ट लेख. फेसबुक हे हल्ली एक सेकंड लाइफ झाले आहे. महिना झाला फेसबुक वरचा अकाउंट सस्पेंड करून.. कदाचित पुन्हा कधी लॉग इन करणार नाही.
ReplyDeleteआणि हो, ते गिळायला गेल्यावर पोस्ट करायची मला पण सवय होती बरं कां!
धन्यवाद!
ReplyDelete