एक आळसावलेली संध्याकाळ. (मला आळस कधी आलेला नसतो हा एक प्रश्नच आहे म्हणा!) गरमागरम चहा (मी केलेला, अर्थात!) पीत मी आणि नवरा आपापल्या लॅपटॉपमधे डोकं घालून बसलो होतो. (पेस्तनकाकामध्ये लिहिलंय पुलंनी की ते आणि सुनीताबाई एकेक पुस्तक घेऊन वाचत बसायचे, तसे मी आणि माझा नवरा आपापला लॅपटॉप घेऊन एकमेकांशी एक शब्दही न बोलता तासनतास बसू शकतो.) अचानक लॅपटॉपमधून डोकं वर करुन नवरा म्हणाला- "उदया स्काय डायव्हिंगला जायचं का आपण?"
"स्काय डायव्हिंग? म्हणजे ’झिंदगी ना मिले दोबारा’ मध्ये फरहान अख्तरनी केलं होतं ते?" मी धास्तावून विचारलं.
त्याने होकारार्थी मान डोलावली. तो अतिशय धाडसी स्वभावाचा. Adventure Sports म्हणजे त्याचा आवडता प्रांत. मी मात्र अगदी उलट. भित्री भागूबाईच. उगाच कशाला जीव धोक्यात घालायचा, त्यापेक्षा मस्त घरी पुस्तक वाचत बसावं एखादं- असा माझा कायम विचार. आणि उंचीची भीती मला वाटतेच.
"घरी फोन कर आणि परवानगी घे." मी सावध पवित्रा घेतला.
"मी काही फोन-बिन करणार नाही-" तो उखडला. आपापल्या आणि/किंवा एकमेकांच्या पालकांची प्रत्येक बाबतीत परवानगी घेण्याइतके आपण आता लहान नाही असं त्याचं ठाम मत आहे.
बरोबर त्याचे मित्र असणार होतेच. त्यांच्या बायकाही असणार होत्या. म्हणून मीही बरोबर यावे इतकीच नवऱ्याची माफक अपेक्षा होती. मी स्काय डायव्हिंग करावे ही त्याची अपेक्षा नव्हतीच.
"ठीक आहे. जाऊ आपण." मी म्हटलं. त्याला जायची किती इच्छा होती हे मला दिसत होतं. त्यामुळे इथे मला नकार देणं शक्य नव्हतं. तो करेल स्काय डायव्हिंग- आपण त्याचे फोटो काढू, त्याचा मोबाईल, सनग्लासेस सांभाळू, बरोबर नेलेलं पुस्तक वाचू, त्याच्या मित्रांच्या बायका जर स्काय डायव्हिंग करणार नसल्या तर त्यांच्याशी गप्पा मारू- असं मी ठरवलं.
रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्यावर मात्र मनात येऊ लागलं- नेहमीच आपल्याला वाटतं की आपण भित्री भागूबाई आहोत. आणि याबद्दल काय करावं हे कळत नाही. आता एक चांगली संधी आली आहे- भित्रटपणावर उपाय करण्याची. मी स्काय डायव्हिंग केलं तर?
नवऱ्याने तोपर्यंत मित्राशी फोनवर बोलून प्लॅन कन्फर्म केला आणि संबंधीत वेबसाईटवर जाऊन तो माहिती काढू लागला. मीही माझ्या लॅपटॉपवरुन वेबसाईट उघडली. अरे बापरे....चक्क उडत्या प्लेनमधून फेकून देतात आपल्याला खाली. आणि खाली काही वाळू वगैरेपण नसते. Parachute घेऊन उडी मारायची.
"इन्स्ट्रक्टर असतो बरोबर. इतकं घाबरु नकोस." नवरा म्हणाला. ('Tandem Sky Diving' म्हणजे नवख्या लोकांसाठी असतं- त्याच्यात एक मार्गदर्शक माणूस तुमच्याबरोबर उडी मारतो. ZNMD मध्ये फरहानला पहिलीच उडी विदाउट मार्गदर्शक मारताना दाखवलं आहे तसं निदान अमेरिकेत तरी करत नाहीत.) तसा खर्चही जास्त होता या प्रकाराचा. फी ’पर हेड’ बेसिसवर होती. ’मी नाहीच केले तर पैसे वाचतील.’ असा कोकणस्थी विचार मनात आलाच. डॉलरमधल्या फीला पन्नासने मनातल्या मनात गुणून किती रुपये वाचतील हा हिशेब केला. लईच महाग होतं हे प्रकरण. एव्हढया पैशात भारतात भरपूर शॉपिंग होईल. पण ’वन्स इन अ लाईफ टाईम’ अनुभव असणार होता. मला स्वत:ला बोल्ड करण्याची एक संधी आयती समोर आली होती. शॉपिंगचं काय- आत्तापर्यंत करत आले, यापुढेही करतच राहीन- पण अशी संधी परत परत मिळणार नाही. ’करावं की न करावं’ - ’टू बी ऑर नॉट तू बी’- माझ्या मनाचा निर्णय होईना. जाऊ दे उदया बघू तिकडे जाऊन- वाटलं तर करु- नाहीतर पैसे वाचल्याचं समाधान- असं ठरवून रात्री झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही स्काय डायव्हिंगच्या ठिकाणी जाऊन पोचलो. तिथे लोकांच्या उडया चालूच होत्या. जंपसूट घालायचा, विमानात बसायचं, वर गेल्यावर इन्स्ट्रक्टर आणि तुम्ही एकत्र बाहेर उडी मारायची, मग पॅराशूट उघडतं, तुम्ही तरंगत तरंगत खाली येता. सोप्पं अगदी.
नवरा हे सगळं बघून खूश झाला. लगेच जाऊन त्याने फी भरली आणि मजेत स्काय डायव्हिंग करुनही आला. मला कळेना काय करावं ते. भीती वाटत तर होतीच. पण मग लगेच मनात विचार आला- करुन बघू या ना. तसं सेफ वाटतंय. आणि जर आपल्याला बोल्ड व्हायचं असेल तर हे केलंच पाहिजे. नुसती बोल-बच्चनगिरी काय कामाची?
झालं. मी सज्ज झाले उडी मारायला. मग त्यांनी कसलासा फॉर्म दिला भरायला. हे प्रकरण रिस्की असतं त्यामुळे कन्सेन्ट फॉर्म भरुन घेतात. उदया तुमचा जीव गेला या नसत्या धाडसात तर स्काय डायव्हिंग कंपनी जबाबदार नाही. मग त्या फॉर्मवर तुमच्या आणि साक्षीदारांच्या सहया घेतात. सह्या झाल्या. नवऱ्याने पैसे भरले. जंपसूट चढवून मी सज्ज झाले. एका छोटयाश्या विमानात स्थानापन्न झाले. विमानात माणसे इन-मीन-तीन. मी, पायलट आणि माझा इन्स्ट्रक्टर कर्ट. आता विमानाने हवेत झेप घेतली. जमिनीवर उभा असलेला नवरा हात हलवत होता. बघता बघता विमान बरंच वर आलं. आता खाली माणसं तर दिसत नव्हती. कारण आम्ही १०,००० पेक्षा जास्त फूट वर आलो होतो. वरुन ’विहंगम’ का काय म्हणतात तसं खालचं जग सुंदर दिसत होतं. विमानातल्या इतर दोघांशी मला काहीच गप्पा मारता येत नव्हत्या कारण प्रचंड आवाज. एरव्ही नॉर्मल विमानप्रवासात टेक-ऑफ, लॅंडिंग आणि टर्ब्युलन्सच्या वेळी मी घाबरते. पण इथे या चिमुकल्या विमानात बसण्याचं धाडस केलं होतं. आत कर्टने पॅराशूट सज्ज केलं. ते आम्हा दोघांशीही attach केलं. आणि विमानाचं दार उघडलं. अरे बापरे!
बाहेर प्रचंड वारा...प्रचंड फोर्सनी हवा आदळत होती. आम्ही १०,००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर होतो आणि मी आता विमानातून खाली उडी मारावी अशी माझ्या त्या दोन सहप्रवाश्यांची अपेक्षा होती. कर्ट मला मी उडी मारावी असं सांगू लागला. पण माझं धाडस होईना. उगाच काय काहीही. पायलटही आता माझ्याकडे पाहू लागला- ही बया उडी मारतच नाही की काय?
मला त्याक्षणी वाटले- काही उडी-बिडी मारायची नाही. पायलटला सांगू या की दार बंद कर परत आणि मला सुखरुप खाली ने. पैसे गेले फुकट तर गेले. नवरा चिडेल, चिडू दे. बरोबरची मंडळी ’भित्रट’ म्हणून नावे ठेवतील, ठेवूदेत. पण हे असं उडत्या विमानातून उडी मारणं मला शक्य नाहीये. मी आता त्या दोघांना सांगू लागले की मला कसंसंच होतंय- मी जात नाहीये बाहेर. पण त्या वाऱ्यामध्ये आणि विमानाच्या आवाजामध्ये त्यांना काही ऐकूच येत नव्हतं.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की उडी मारल्याशिवाय आता गत्यंतर नव्हते. मी धाडस करुन दोन्ही पाय विमानाबाहेर काढले. आता स्वत:ला झोकून दयायचं बाहेर. तो क्षण प्रचंड भीतीचा- पुढे काय होईल हे माहीत नसण्याचा. एक क्षण मी विमानात. आणि दुसऱ्या क्षणी मी विमानाबाहेर. विमान दूर निघूनही गेलेलं. फ्री फॉल म्ह्णजे जबरदस्त भारी अनुभव. गुरुत्वाकर्षणाचा जबरदस्त फोर्स. त्यात हवेत कसेही उलटेपालटे होणारे आपण. मी पक्षांसारखे हात पाय पसरवावेत म्हणजे मला बॅलन्सला बरं पडेल असं कर्ट सांगू लागला. मी त्याप्रमाणे केलं. एव्हाना पॅराशूट उघडलं. हुश्श! आता काही टेन्शनच नव्हतं. पक्षासारखी आडवी होऊन उडणारी मी पॅराशूट उघडताच परत उभी झाले आणि मजेत हवेत अलगद तरंगू लागले. "कधी एकदा परत खाली सुखरुप जात्येय’ असा विचार मागे पडला आणि ’कसलं सही वाटतंय- अजून थोडा जास्त वेळ नाही का मला असं हवेत राहता येणार’, असा विचार येऊ लागला. त्यावेळी वरुन दिसणारं ते दृश्य, हवेत तरंगण्याचं ते फीलिंग- ते शब्दात सांगता येणं कठीण आहे. पक्ष्यांना उडताना कसं वाटत असेल याची काहीशी कल्पना आली. नुसतं विमानात बसणं वेगळं आणि हा असा चौफेर view मिळणं, हवेत तरंगणं वेगळं. काही वेळाने सुखरुप आम्ही गवतावर लँड झालो. कर्टचे मी मनापासून आभार मानले.
पुढचे दोन दिवस माझी कंबर ठणकत होती. (Landing च्या वेळी जरा आपटले होते जमिनीवर). पण आजही जेव्हा ते क्षण आठवतात, ते फोटो बघते तेव्हा खूप सही वाटतं. ’जर आपण उडत्या विमानातून १०,०००+ फूट उंचीवरुन खाली उडी मारु शकतो तर आपण आयुष्यात बरीच कठीण कामं करु शकतो’ हा एक नवा विश्वास, एक नवा paradigm मला त्या धाडसाने दिला आहे, आणि तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

No comments:
Post a Comment