Saturday, November 3, 2012

जावे त्याच्या वंशा..


स्नेहाने शेवटचा बटाटेवडा टिश्यू पेपरवर टाकला आणि मग एकदा आपल्या कामगिरीकडे समाधानाने नजर फिरवून ती स्वयंपाकघरात घातलेला पसारा आवरु लागली. पसारा आवरुन झाल्यावर तिने नीटनेटक्या स्वयंपाकघरात चहाची तयारी केली. बटाटेवडे तिने डब्यात भरले होते. आता सचिन आला की लगेच संध्याकाळचा चहा टाकायचा, बटाटेवडे जरा थंड वाटले तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचे की झालं! आज रात्रीचा स्वयंपाक सकाळीच तयार झाला होता. फक्त सगळ्या गोष्टी फ्रीजमधून काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायच्या. त्यामुळे उदया सकाळपर्यंत स्नेहाला स्वयंपाक करायचा नव्हता. तिच्याकडॆ आता रिकामा वेळ होता. तिने लॅपटॉप उघडला. फेसबुकवरती तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या त्यांच्या दुबई ट्रीपच्या फोटोंवर खूप कॉमेन्ट्स वगैरे आल्या होत्या. बटाटेवडे खात तिने फेसबुकवर नजर टाकली. ’पीपल यू मे नो’ - रीमा देशमुख. ते नाव बघून स्नेहा एकदम खूप वर्षं मागे गेली. रीमा तिच्या वर्गात होती. आठवी ते दहावी ही तीन वर्षं. वर्गात त्या दोघींची स्पर्धा लागलेली असायची. कोणाला जास्त मार्क मिळतायत, कोणाला चित्रकला स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळतंय इथपासून ते कोणाच्या मागे जास्त पोरं लागली आहेत इथपर्यंत त्या दोघी एकमेकींची चढाओढ करत असत. क्वचित कधी त्यांची मैत्रीही व्हायची पण ते सौहार्द अळवावरच्या पाण्यासारखं काही दिवसच टिकायचं. मग पुन्हा स्पर्धा चालूच. स्नेहाचा स्वभाव मुळात भिडस्त. काहीसा घाबरटच. रीमाशी स्पर्धा करण्यात तिला फारसा रसच नव्हता. आपण बरं, आपलं काम बरं असं तिचं असायचं. पण रीमा तिला काही ना काही करुन चिथवायचीच. दोघी मुली हुशार, अभ्यासाबरोबर इतरही कलागुणांत निपुण, दिसायला स्मार्ट, सुंदर. त्यामुळे त्यांची ही अघोषित स्पर्धा शाळेतल्या लोकांसाठी एक प्रकारचं मनोरंजनच झाली होती.
दहावीच्या परिक्षेत स्नेहाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले. घरी आईबाबा नाही म्हटलं तरी अपसेट झालेच. नातेवाईकांचे टोमणे, मित्रमैत्रिणींच्या पालकांच्या चौकश्या. नको नको होऊन गेलं तिला सगळं. रीमाला मात्र चांगले गुण पडले होते आणि चांगल्या कॉलेजात प्रवेशही.
नंतर त्या दोघींचे मार्ग वेगळे झाले. शाळेतल्या इतर मित्रमैत्रिणींशी स्नेहाने संपर्क ठेवला पण रीमाशी मात्र नाही. आताही तिने रीमाला फ्रेन्ड रिक्वेस्ट टाकण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय रीमालाही तिचं प्रोफाइल दिसत असणारच कारण त्यांचे खूप कॉमन फ्रेन्ड्स होते. पण रीमानेही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली नव्हती. अर्थात, तिने पाठवली असती तरी स्नेहाने ती स्वीकारली नसतीच. पण रीमाविषयी उत्सुकता होतीच, त्यामुळे स्नेहाने तिचं प्रोफाइल उघडलंच. याला stalking म्हणतात हे तिला माहीत होतं. पण तिला खूपच उत्सुकता होती रीमा काय करतेय सध्या हे पाहण्याची.
रीमा एका मोठया आय.टी. कंपनीत नोकरी करत होती. साधीसुधी नोकरी नाही- ती प्रोजेक्ट मॅनेजर होती. तिच्या फोटो अल्बम्समध्ये जगभरातले फोटो होते. ऑफिसच्या कामानिमित्त जगभर फिरत होती ती. शिवाय एका मोठया मॅनेजमेन्ट कॉलेजमधून एक एक्झिक्युटिव एमबीएचा कोर्सही करत होती. शाळॆत दिसायची त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिने घेतलेल्या नवीन महागडया गाडीचेही फोटो होते. आणि नुसतीच नोकरी एके नोकरी करत नव्हती रीमा. ती खूप पुस्तकं वाचत होती, चांगले चित्रपट बघत होती, तिच्या पेन्टिंग्जचे फोटोही होते फेसबुकवर. शिवाय जगभर फिरत असल्यामुळे फोटोग्राफीचाही छंद होता तिला. साडीपासून मिनी स्कर्टपर्यंत सगळया कपडयात सुंदर दिसंणारी, देशीविदेशी मित्रमैत्रिणी असणारी, लाखो रुपये कमावणारी, जगभर फिरणारी, छंद जोपासणारी रीमा पाहून स्नेहाला अगदी बिचारं असल्यासारखं वाटू लागलं. ती काय काय करतेय, कुठे पोचलेय..आणि आपण? नवऱ्यासाठी बटाटेवडे करतोय! स्नेहानेही शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळवली होती. पण लग्न झालं आणि सचिनला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्याबरोबर तिलाही. मग दिली सोडून नोकरी. अमेरिकेत इतकी मंदी होती की तिथे तिला नोकरी मिळणं, कोणीतरी तिचा एच वन व्हिसा स्पॉन्सर करणं- सगळंच अवघड होतं.  भारतात परत आल्यावर पुन्हा नोकरी करण्याचा विचार मनात डोकावू लागला. पण आता सासर-माहेरच्यांना नातवंड हवं होतं. पटकन दिवस गेले नाहीत तेव्हा चेक-अप, फर्टिलिटी ट्रीटमेन्टचं चक्र चालू झालं. ट्रीटमेन्टच्या दरम्यान स्ट्रेस नको म्हणून डॉक्टरांनीच सुचवलं की नोकरी सध्या करु नकोस. आणि तशी आर्थिक गरज नव्हतीच. त्यामुळे आता तिचं आयुष्य ठरुन गेलं होतं- स्वयंपाक करायचा, घर नीटनेटकं ठेवायचं, दर महिन्याला ट्रीटमेन्टचं फळ मिळण्याची वाट बघायची, बाकी मग होतंच- टीव्ही, वाचनालय, शेजारी-पाजारी, नातेवाईक, मैत्रिणी- वेळ निघून जायचाच सहज. डॉक्टरांच्या मते अजून एक-दीड वर्षात स्नेहा आई होईल. मग आईपणात ती गुंतून जाणार. नोकरी वगैरे पुढची काही वर्षं कठीणच. आणि मग त्यानंतर तिला कोण चांगली नोकरी देणार? एखादी फुटकळ नोकरी मिळाली तर सचिन अजिबात करु देणार नाही.
सचिन स्वभावाने चांगला होता, सरळ मनाचा होता पण त्यांच्या संसारात सगळे मोठे निर्णय तोच घेणार हे नकळत ठरुनच गेले होते. स्नेहाच्या वाटयाला दुय्यम भूमिका कधी आली हे तिलाही कळले नव्हते.
आणि रीमा...ती किती सुखात होती...लग्न केलेले नाही...त्यामुळे नवरा, सासरची माणसे यांची मर्जी सांभाळण्याची जबाबदारी नाही. अजून ती तिच्या आईबाबांच्या घरीच राहत होती....त्यामुळे घरकामाची कटकट नाही. स्वयंपाकघरात तासनतास राबणे नाही. कोणी काहीही बोलणार नाही. "दिवसभर घरीच बसून असतेस ना?" "वेळ कसा जातो तुझा?" "बाहेर जाऊन नोकरी कर म्हणजे कळॆल तुला किती कठीण असतं सगळं ते!" असं काहीही ऐकून घ्यावं लागत नसेल. मोठी नोकरी, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वरचेवर जाणे, परदेशात (तेही ऑफिसच्या खर्चाने) फिरणॆ, भरपूर पैसा मिळवून तो स्वत:च्या मर्जीनुसार खर्च करणे, सतत नवीन गोष्टी शिकत राहणे, स्वत:च्या आवडी-निवडी जपणे- मजा होती  नुसती. स्वतंत्र, मुक्त आयुष्य जगत होती ती. कोणाला काही विचारायला नको, कोणाचं ऐकून घ्यायला नको. हवं तेव्हा झोपायचं, हवं तेव्हा उठायचं, हवं ते खायचं-प्यायचं. ’उदया भाजी कुठली करायची?" हा प्रश्न नसेल. स्नेहाला आता आपण अगदीच गरीब बिचारी काकूबाई झालो आहोत असं वाटू लागलं. तेव्हढयात बेल वाजली. सचिन आला होता. लॅपटॉप खाली ठेवून ती उठली. दार उघडून तिने सचिनला घरात घेतलं आणि लगबगीने चहाची तयारी करायला गेली. बटाटेवडे प्लेटमध्ये काढत असताना बाहेरुन सचिनचा त्रासलेला आवाज आला- "तुझा लॅपटॉप वापरुन झाला असेल तर बंद का नाही करत? निदान अनप्लग तरी कर. उगाच विजेचं बिल वाढतं- परवाच भरलं मी बिल..खूप जास्त आलं होतं गेल्या महिन्याचं-" "बिल वाढतं ते तुझा एसी सतत चालू असतो म्हणून-" असं म्हणावं असं स्नेहाच्या मनात आलं. पण तिने स्वत:ला आवरलं. उगाच तिला वाद नको होता. आपण कमवत नाही म्हणून सचिन आपल्याला पैश्यांवरुन असं बोलू शकतो असं वाटून तिला आणखीच बिचारं वाटू लागलं. "तू महिन्याला पाच लाख कमवत असतीस तरी सचिन हेच बोलला असता- त्याच्या दृष्टीने हा प्रश्न पैश्यांचा नसून विजेच्या गैरवापराचा आहे-" तिच्या लॉजिकल मनाने मुद्दा काढला. तो तिला पटलाही. तिने सचिनला चहा-खाणं बाहेर नेऊन दिलं. सचिनने बटाटेवडयांचं कौतुक केलं, मनापासून भरपेट खाल्ले...तेव्हा तिचा पडलेला चेहरा जरा सुधारला.

रीमा रात्री जेवण झाल्यावर तिच्या खोलीत आली. घडयाळात साडेनऊ वाजले होते. उदया शनिवारची सुट्टी असल्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. तिने बेडमध्ये बसूनच लॅपटॉप ऑन केला. मेल्स वगैरे बघत एकीकडे फेसबुक उघडलं. पीपल यू मे नो- स्नेहा रानडे-आगाशे. तिने स्नेहाच्या प्रोफाइलवर क्लिक केलं. स्नेहा रानडे-आगाशे. मॅरिड टू सचिन आगाशे. प्रोफाइल फोटोत स्नेहाच्या बरोबर तिचा देखणा, उंच, गोरा-घारा नवरा. सचिन आगाशे. अल्बम्समध्ये फोटो होते- काही दुबईतले, काही अमेरिकेतले, काही मुंबईतलेच नातेवाईकांबरोबर वगैरे काढलेले. स्नेहाचं वजन वाढलं होतं. पण ते तिला शोभतही होतं. काठपदराची उंची साडी, ठसठशीत मंगळसूत्र, सोन्याचे घसघशीत दागिने घातलेली स्नेहा आणि तिच्या बाजूला सचिन. काही फोटो स्नेहाच्या पाककृतींचे होते. काही मैत्रिणींबरोबर काढलेले.
रीमाच्या मनात तुलना येऊन गेली आणि काहीशी असूयाही. स्नेहा पूर्णवेळ गृहिणी होती. काय आयुष्य असेल- छानपैकी स्वयंपाक करायचा, घर सजवायचं. दुपारी झोप काढायची, टीव्ही सीरीयल्स बघायच्या. ऑफिसमधल्या कटकटी नाहीत. तासनतास रात्रीबेरात्री काम करणं नाही. रात्री उशीरा एकटं घरी परतताना वाटणारी असुरक्षितता नाही. सुरक्षित, उबदार घराच्या चौकटीतलं आयुष्य. तिचे त्रास, संकटं, मनातले विचार- सगळं शेअर करायला तिचा हक्काचा नवरा होता. रात्रीच्या थंडीत तिला कुडकुडत एकटं झोपावं लागत नव्हतं. तिच्या नवऱ्याच्या उबदार कुशीत ती निर्धास्त झोपत असेल. आणि आपण? कितीही यश मिळवलं आपल्या करीअरमध्ये तरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी या गोष्टीची जाणीव करुन देणारच की आपलं लग्न झालेलं नाहीये, आपण एकटया आहोत. आईबाबा काय आज आहेत, ते काही आयुष्यभर पुरणार नाहीत, वगैरे.
तसा रीमाने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला स्थळं भरपूर येत होती तिच्यासाठी. पण तिला कोणी पटकन पसंतच पडत नव्हतं. त्यामुळे बरीचशी स्थळं वजा होत होती. जी उरत होती त्यातली काही पत्रिका न जुळल्यामुळे बाद. त्यातून उरलेल्या स्थळांच्या बाबतीत कधी तिचा नकार- काही ना काही कारणांमुळे. आणि जिथे तिला सकारात्मक भावना होती तिथे नेमका समोरच्या बाजूने नकार. त्यामुळे योग जुळून आलाच नव्हता. आपल्या अपेक्षा कमी करुन नुसतं करायचं म्हणून मनाविरुध्द लग्न केलं तर आपण सुखी होणार नाही असं तिचं मत होतं. त्यामुळे तसं काही करण्याचा प्रश्न नव्हता. सुटेबल स्थळ असेल तर लग्न करायची तिची आजही तयारी होती पण आताशा स्थळं कमीच येत होती. तीच तीच स्थळं परत येत होती. तिच्यायोग्य असणाऱ्या बऱ्याच चांगल्या मुलांची लग्नं झाली होती. आईबाबांना तिच्या लग्नाची चिंता होतीच पण आता तेही स्थळं शोधून थकले होते, त्यांचंही वय झालं होतं. त्यांनीही हा विषय सारखा सारखा काढणं थांबवलं होतं. तिच्या कॉर्पोरेट जगातले पुरुष दोन प्रकारचे. काही जण तिच्याशी जेव्हढयास तेव्हढं प्रोफेशनल वागणारे. तर काहीजण ’इतर’ अपेक्षा ठेवणारे. ती खंबीर होती त्यामुळे कोणी थेट काही सुचवण्याचं धाडस केलं नव्हतं. शारीरिक सुखाची ओढ तिलाही होती पण तिला तिच्या संस्कारांशी विपरीत काही करायचं नव्हतं. आणि रीतसर लग्नाची मागणी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कुणी तिला अजूनतरी घातली नव्हती. विवाहित लोकांच्या ग्रुप्समधे चालणारे टिपीकल विषय- संसार, मुलं- यात तिला गम्य नसल्याने आजकाल अशा ग्रुप्समध्ये ती केवळ एक मूक श्रोता होऊ लागली होती. ऑफिसमधून घरी आल्यावर तिला एकटेपणा  जाणवू लागला होता. तिने ज्या ऑनलाईन matrimonial साईटवर नाव नोंदवलं होतं तिथे लॉग इन करुन ती पुन्हा एकदा स्थळं शोधू लागली. फेसबुकचं पेज क्लोज करताना ’स्नेहाचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आहे’ हा विचार मनात परत आलाच.

स्नेहा स्वयंपाकघरातली झाकपाक करुन बेडरुममध्ये आली. सचिनचा ऑनसाईट कॉल चालू होता त्यामुळे तो लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये ठाण मांडून बसला होता. दार लोटून ती बेडवर पडली. डोळे मिटून झोपेची आराधना करताना मनात विचार आला की रीमाचं आयुष्य आपल्यापेक्षा किती छान आहे.

9 comments:

  1. pharach simplified aahe... Rima sarkhya sucessful aani happily married baika pan asu shaktat nave astat..

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
    नोकरी आणि संसार दोन्ही करणाऱ्या, फक्त नोकरी करणाऱ्या, आणि फक्त घरी असणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या स्त्रिया जगात असतात :)
    या कथेत त्यातील दोन कॅटेगरीतील स्त्रियांचं विश्व साकारलं आहे.

    ReplyDelete
  3. Having lived both the lives, I felt like a really nicely written story.totally agree on both the points.
    -vidya.

    ReplyDelete
  4. धन्यवाद विदया!

    ReplyDelete

Thank You