घटना एक:
स्थळ: पुणे
एका समारंभात नवऱ्याला त्याचा एक जुना मित्र भेटला. तो आपण होऊन बोलायला आला. मित्र पुणेकर मराठी. त्याने मराठीतच बोलायला सुरुवात केली. त्याची सहा-सात वर्षांची लहान मुलगी तिथेच खेळत होती. तिच्याशी मात्र तो हिंदीमध्ये बोलत होता. "यहां आओ, वहां मत जाऒ, मम्मी के पास जाओ" वगैरे. थोडयावेळाने त्याची बायको तिथे आली आणि संभाषणात सामील झाली. तिने हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तोही हिंदी बोलू लागला आणि त्यामुळे आम्हीही. बायकोच्या चेहऱ्यामोहऱ्यावरुन ती मराठी नाही हे कळत होतं. मुलीशीही ते सतत हिंदीमध्येच बोलत होते.
पुण्यात राहणाऱ्या, मराठी आडनाव लावणाऱ्या त्या मित्राच्या बायकोला आणि मुलीला मराठी बोलता येत नव्हते. सहा-सात वर्षांची मुलगी आहे म्हणजे त्यांच्या लग्नाला सात-आठ वर्षं झालीच असणार कमीत कमी. त्या काळात तो पुण्यातच नोकरी करत होता हा उल्लेखही त्याच्या बोलण्यात आला. मराठी मुलाशी लग्न केलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या त्या अमराठी मुलीला नवऱ्याची भाषा (जी सो-कॉल्ड राज्यभाषादेखील आहे) शिकण्याची अजिबात गरज वाटली नव्हती. (भाषा शिकायला सात वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.) आणि तिलाच जी भाषा येत नाही ती मुलीला शिकवण्याचीही अजिबात गरज वाटली नव्हती.
घटना दोन:
स्थळ: मुंबईतील लोकल ट्रेन
मी लोकलमधून प्रवास करत असताना एक ओळखीची बाई भेटली. ती मराठी असल्यामुळे आमच्या गप्पा मराठीतून सुरु झाल्या. तिचा पाच-सहा वर्षांचा मुलगाही सोबत होता. त्याच्याशी ती हिंदीत बोलत होती. तो मुलगाही तिच्याशी हिंदीतच बोलत होता. त्या बाईचा नवरा त्याक्षणी तिच्यासोबत नव्हता पण तोही मराठीच आहे हे मला माहीत होतं. आई-बाबा दोघंही मराठी असताना मुलगा हिंदीत का बोलतोय मला कळेना. मी त्याच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो माझ्याशी हिंदीत बोलू लागला.
"त्याला मराठी येत नाही." त्याची आई अगदी सहजपणे म्हणाली.
"का?" मी आश्चर्याने विचारलं.
"अगं आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे सगळे कॉस्मोपॉलिटन (म्हणजे मराठी सोडून बाकी सगळॆ) लोक राहतात. तिथे याचे सगळे मित्र, त्यांच्या आया - सगळे हिंदीच बोलतात. शिवाय तो ज्या शाळेत जातो तिथे टीचर्स, मुलं सगळे हिंदीच बोलतात. त्यामुळे त्याला घराबाहेर सतत हिंदीच बोलावं लागतं. त्यामुळे आता घरीपण आम्ही हिंदीतच बोलतो. शिवाय शाळा इंग्लिश मिडीयमची असल्यामुळे तीही भाषा शिकायची आहेच त्याला. मराठी शिकवून काहीच उपयोग नाही. म्हणून आम्ही त्याला हिंदीच शिकवलं आहे."
मराठी मातापित्यांना आता ’मराठी शिकवून काय फायदा?" असं वाटत असल्यामुळे ते मुलांना मराठी-बिराठी शिकवण्याच्या फंदात पडत नाहीत-सरळ घरी हिंदी बोलू लागतात- ही माझ्यासाठी न्यूज होती.
अशी परिस्थिती आता अनेक मराठी घरांमध्ये दिसते. आजकाल मराठी-अमराठी विवाह खूप होतात. मराठी मुलीने अमराठी मुलाशी लग्न केलं की तिने सासरची संस्कृती आणि भाषा आत्मसात करणं अपेक्षित असतं आणि त्याप्रमाणे त्या करतातही. पण अमराठी मुली लग्नानंतर मराठी शिकताना दिसत नाहीत, त्यांची मुलंही हिंदीच बोलत लहानाची मोठी होतात. त्यामुळे आडनावाने मराठी पण रुपाने आणि भाषेने अमराठी अशा लोकांची एक मोठीच फौज आता तयार होते आहे.
तसेच, काही काही आई-बाप दोघेही मराठी असले, तरी मुलांना मराठी शिकवण्याची त्यांना इच्छा नसते. अमेरिकेत वगैरे स्थायिक झालेल्या पालकांनी ’मुलाला मराठी कशाला शिकवायचं?’ असा विचार केला तर मी एकवेळ समजू शकते. पण महाराष्ट्रात राहणारे पालकही असा विचार करु शकतात हे निदान मलातरी धक्कादायक होतं.
या सगळ्यामुळे मराठी भाषेला अखेरची घरघर लागली आहे असं वाटू लागतं.
घटना तीन:
स्थळ: मुंबईतील एक रेस्टॉरन्ट
मी मित्रमैत्रिणींच्या एका ग्रुपमधे बसले होते. आमच्यातला एकजण पंजाबी आहे. मुंबईत राहतो.
"अरे माझ्या भावाला अमुक अमुक कंपनीनी ऑफर दिली होती. आत्ता आहे त्याच्यापेक्षा दीडपट पगार, इतरही पर्क्स..लोकेशन केरळ होतं." तो म्हणाला. त्याचा भाऊपण मुंबईतच राहतो.
"मग? घेतली का ती नोकरी तुझ्या भावाने?" कोणीतरी विचारलं.
"नाही घेतली." तो म्हणाला.
"का?"
"अरे तिकडे केरळमध्ये राहायचं म्हणजे मल्याळम शिकायला लागलं असतं. त्यांची भाषा येत नसेल तर ते लोक तुम्हाला त्रास देतात. म्हणून मग त्याने ती नोकरी घेतली नाही."
या पंजाबी माणसाला आणि मुंबईत स्थायिक झालेल्या त्याच्या तमाम खानदानाला मराठी अजिबात येत नाही. कधी शिकायची गरजच पडलेली नाही.
मुंबई-पुण्यात- एकंदरीत महाराष्ट्रात मराठी भाषा आली नाही म्हणून काहीच बिघडत नाही. पण इतर राज्यात मात्र लोक त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. म्हणून परप्रांतियांना सेटल होण्यासाठी महाराष्ट्र बेस्ट. म्हणजे मराठी माणसाचं स्वत:च्या भाषेसाठी आग्रही नसणं त्याच्या मुळावर येत आहे का?
मराठी भाषेचा relevance आता संपत चालला आहे का? एखादया गंभीर, हाताबाहेर गेलेला आजार झालेल्या रुग्णाचे नातेवाईक जसे ’आता याचे थोडेच दिवस राहिले’ ही गोष्ट शांतपणे स्वीकारतात तशी ’आता मराठीवर प्रेम करणारी आपली शेवटची किंवा फारतर शेवटून दुसरी पिढी’ हे आजच्या मराठी पिढीने स्वीकारायला हवे का?
अशीच परिस्थिती राहिली, तर काही वर्षांनी मराठी ही केवळ बोली भाषा होऊन जाईल असे वाटते.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete