Friday, October 26, 2012
क्षण
शीतल सकाळी उठली. घडयाळात बघितलं तर चक्क नऊ वाजले होते. तिने घाईघाईत आवरलं आणि कशीबशी पावणेबारा वाजता ती ऑफिसला पोचली. ऑफिसात पाऊल टाकताच निखिलची सेक्रेटरी ईशा तिच्यावर धावून आली.
"कुठे होतीस तू? मी केव्हापासून तुला contact करण्याचा प्रयत्न करतेय. ब्लॅकबेरीवर फोन केला, तुझ्या पर्सनल नंबरवर फोन केला- तुला मेल्स पाठवली- तुझा पत्ताच नाही."
"अं...हो...जरा उशीर झाला आज- शिवाय traffic-"
"He is waiting for you since TWO HOURS-"
शीतलला आता ईशाचा रागच आला होता. अरे हो..झाला उशीर- पण इतकं काय त्याचं- आणि ही बॉस आहे का माझी? माझ्यापेक्षा कितीतरी ग्रेड खाली आहे ही- दिसायला सुंदर आहे म्हणून निखिलनीच डोक्यावर चढवून ठेवलंय. सीनियर मॅनेजर्सशी कसं बोलावं हेसुध्दा कळत नाही या बयेला.
ती निखिलच्या केबिनकडे वळली. तर आतमधे निखिल फोनवर बोलत होता. ती तिथेच उभी राहिली. हातात पर्स आणि लॅपटॉपची बॅग तशीच घेऊन. दहा मिनिटं उभं राहून पाय दुखायला लागले- जड लॅपटॉप बॅग धरून हात. आता काय करावं? थांबावं का क्युबिकलशी जाऊन बॅग ठेवून नंतर यावं? तेव्हढयात एकदाचा निखिलचा फोन संपला. ती लगेच आत घुसली.
"सॉरी आज उशीर झाला मला-"
"It's alright. Take a seat-" निखिलनी मग लगेच मुद्दयाला हात घातला. त्याला आज दुपारी एक प्रेझेंटेशन दयायचं होतं. त्यासंबंधी काही काम त्याला शीतलकडून करुन घ्यायचं होतं. काम समजावून घेवून शीतल आपल्या क्युबिकलकडे वळली.
दुपारची डेडलाईन होती त्यामुळे मग ती भराभर कामाला लागली. फायनल कॉपी तिने निखिलला मेल केली तेव्हा साडेतीन वाजले होते. त्यांचं canteen बंदच व्हायचं साडेतीनला. तिला आता भूक लागली होती. सकाळपासून चहा, पाणी, खाणं काहीच झालं नव्हतं. तिने डेस्कवर ठेवलेली रिकामी झालेली पाण्याची बाटली भरुन आणली. तेव्हढयात निखिलचं मेल आलं परत. "आता काय झालं? परत काय हवंय याला?" धास्तावून तिने मेल उघडली. "Good. Excellent job." निखिलनी फक्त इतकंच लिहिलं होतं. तिला जरा बरं वाटलं. निखिल आता कसल्याशा conference ला चालला होता. तिथून तो घरी जाणार होता. बाकीही काही ऑफिसमधे फार तातडीचं काम नव्हतं. त्यामुळे आता जरा ब्रेक घ्यावा, जरा खावं असा तिने विचार केला. तिच्या ऑफिसजवळ एक चांगलं restaurant होतं. तिथे sandwiches आणि कॉफी वगैरे चांगलं मिळायचं. ती तिथे एकटी कधी गेली नव्हती. पण आज मात्र ती तिथे गेली. "Table for how many, mam?" वेटरने विचारलं.
"Just one!" ती उत्तरली. वेटरला जरा आश्चर्यच वाटलं. पण त्याने तिला एक लहानसं टेबल दिलं. दोन माणसांसाठीचं. तसंही restaurant जवळपास रिकामंच होतं. तिने पहिल्यांदा cheese sandwich मागवलं. हातातल्या मोबाईलशी खेळत ती बसली.
आणि अचानक समोर लक्ष गेलं. दार उघडून समीर आत येत होता. समीर? तिने त्याला कितीतरी लांबूनही ओळखलं असतं. केस आता बऱ्यापैकी पिकले होते. वजन मात्र चांगलं maintain केलेलं दिसत होतं. उंचापुरा, नेहमीच उत्तम कपडे घालणारा. आजही पांढरा शर्ट आणि ग्रे पॅंटमध्ये तो स्मार्ट दिसत होता. ती बघतच राहिली त्याच्याकडे. आणि तो सरळ तिच्याकडेच आला. तिच्या समोरच्या रिकाम्या खुर्चीत बसला. तिला कळेना- हे स्वप्न आहे की सत्य?
मग त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं तिचं. तिला पाहून झालेला आनंद स्पष्ट दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर.
मग बोलायला लागले ते एकमेकांशी. त्याच्या कंपनीचं जवळच ऑफिस होतं. तो नुकताच तिथे आला होता transfer घेवून. या restaurant मधे cheese sandwich आणि कॉफी चांगली मिळते हे कळल्यावर पहिल्यांदाच आला होता तो.
त्यानेही cheese sandwich मागवलं आणि इतरही बरंच काही. खाता खाता स्वत:विषयी सांगितलं त्याने. त्याचा आणि उत्तराचा divorce झाला होता. त्यांचा मुलगा त्याच्याकडेच होता. आणि त्याचे आई-वडील. मुलगा खूप हुशार होता त्याचा.
ती बोलता बोलता म्हणाली- "खूप काम होतं ऑफिसमधे. जेवायला canteen मधे जावं तर ते बंद झालेलं. डबा आणायचा असं ठरवलं होतं पण एकटीसाठी काही स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. अगदी सकाळचा चहा-नाश्तापण एकटीसाठी करायचा कंटाळा येतो. मग कधी रात्री पण असंच काहीतरी पटकन वरण-भाताचा कुकर लावते नाहीतर घरी जाताना काहीतरी विकत घेवून जाते. नाहीतर फोनवरुन मागवते काहीतरी. आणि काम पण इतकं असतं सध्या की घरी जाईपर्यंत दमायलाच होतं."
"वीकेन्डचा काय प्रोग्रॅम असतो तुझा?" तो म्हणाला.
"काही नाही. आता मागचा जो वीकेन्ड गेला- तो मी आरामात झोपून घालवला. शनिवार रविवार म्हणजे उशीरा उठायचं. दुपारी परत झोपायचं. टीव्ही बघायचा- काहीही पिक्चर वगैरे. नाहीतर ऑनलाईन टाईमपास करायचा. आठवडाभर इतकं दमायला होतं की शनिवार-रविवार रिकव्हरीमधेच जातो."
"तुझे आईबाबा-"
"ठीक आहेत आता. थकले आहेत. माझा भाऊ दिल्लीला असतो. त्याची बायको नोकरी करते. त्यांना एक मुलगी आहे. आई-बाबा तिला सांभाळतात. दिल्लीलाच असतात आता."
असंच काहीबाही बोलत त्यांनी खाणं संपवलं. आता तो बिल देईल या धास्तीने ती बाथरुमला जाण्याचं निमित्त सांगून उठली आणि काऊंटरवर बिल देऊन आली. त्याचं काहीच चाललं नाही. पण तिला त्याचे उपकार नको होते अजिबातच.
ऑफिसमधे परत गेल्यावर कामात लक्षच लागेना तिचं. घरी गेल्यावरही त्याचेच विचार डोक्यात. समीर. तिच्या आयुष्यातला एक काळ या माणसाने व्यापलेला होता अख्खाच्या अख्खा. ते एकाच कॉलेजमधे होते. तो टॉल, डार्क, हॅंडसम. अनेक मुली त्याच्या मागे होत्या. पण त्याचं लक्ष मात्र फक्त उत्तराकडेच. ती त्याची गर्लफ्रेन्ड होती. अतिशय सुंदर, लांबसडक केस, टपोऱ्या डोळ्यांच्या उत्तरामागेही कॉलेजमधली बरीच मुलं होती. ती अतिसुंदर असल्याचा तिला खूप गर्व होता व ती शीतलसारख्या सर्वसाधारण मुलींची कधी दखलच घ्यायची नाही. आधीच सुंदर आणि त्यात कॉलेजमधला सर्वात एलिजिबल बॅचलर तिचा प्रियकर- त्यामुळे ती हवेतच तरंगायची जशी. शीतलची आणि समीरची मैत्री योगायोगानेच झाली. एका प्रोजेक्टसाठी ते एकाच ग्रुपमधे होते. तिला खूप आवडायला लागला समीर. कुणालाही आवडण्यासारखा होताच ना तो. देखणा, हजरजबाबी, हसवणारा, जबाबदाऱ्या घेऊन त्या पारही पाडणारा. कायम उत्तम कपडे घालून प्रेझेन्टेबल दिसणारा. मराठी कवितांची आवड असणारा. गाण्याच्या क्लासला वगैरे कधीही न गेलेला असूनही खूप चांगलं गाणारा. अभ्यासातही कायम पुढे. शिवाय सधन घरातला. थोडक्यात एक आयडियल नवरा. पण तो तर आधीच उत्तराने पटकावलेला होता. आणि समीर तर उत्तराशी पूर्ण एकनिष्ठ होता. तिच्या शब्दाबाहेर तो कधी जात नसे. त्यामुळे शीतलच्या मनातल्या भावना तिच्या मनातच राहिल्या. कॉलेजचं शेवटचं सेमिस्टर चालू झालं आणि समीर आणि उत्तरामध्ये दुरावा निर्माण झाल्याची कुजबूज सुरु झाली. ती शीतलच्याही कानावर आली. तिने समीरला त्याबद्दल विचारलंही. उत्तरा आणि आपलं आजकाल पटत नाही हे त्याने मान्य केलं पण त्या विषयावर आणखी काही बोलण्याचं नाकारलं. आणि मग अचानक एक दिवस ध्यानीमनी नसताना समीरने सांगितलं तिला- "उत्तराशी नातं तोडलंय मी. माझं आता तुझ्यावर प्रेम आहे." आणि मग प्रेमकथाच सुरु झाली त्यांची. कॉलेज संपतच आलं होतं. आता जरा एक-दोन वर्षं नोकरी करेल समीर, आणि मग आपलं लग्न- असंच तिला वाटत होतं. समीरवर तिचं गाढ प्रेम होतं. खरोखर तशी त्याला चांगली नोकरी मिळाली. शीतललाही नोकरी मिळाली. एक वर्ष त्यांच्या प्रेमाच्या धुंदीत गेलं आणि मग हळूच जाणवलं- समीर टाळतोय आपल्याला. पूर्वीसारखा प्रेमाने बोलत नाही. त्याच्या आईबाबांशी ओळखही करुन नाही दिली त्याने आपली अजून. लवकरच समीरने सगळ्याचं कारण स्पष्ट केलं- उत्तरा परत आली होती त्याच्या आयुष्यात. आणि तिच्यावरच प्रेम असल्याचा साक्षात्कार झाला होता म्हणे त्याला. "मी तुझ्याशी लग्न केलं आणि उत्तरावरच प्रेम करत राहिलो तर तीन आयुष्यं उध्वस्त होतील शीतल. म्हणून- I am sorry- माफ कर मला- मी काहीच जाणूनबुजून केलं नाहीये-"
शीतलच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता तो. ती प्रतारणा तिला सहनच होत नव्हती. कालपर्यंत ’तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आपण लवकरच लग्न करु या.’ असं म्हणणारा आज सरळ सांगत होता तिला- ’Please move on. झालं-गेलं विसरुन जा.’
खूप भांडली ती समीरशी. उत्तराचाही राग राग आला तिला. समीर आपली चूक कबूल करत होता पण उत्तराशीच लग्न करण्याबाबत तो ठाम होता. त्याने लवकरच लग्न केलं. वर्षभराने मुलगाही झाला त्याला. मित्रमैत्रिणींकडून शीतलला सगळं कळत होतं. समीर आणि उत्तराच्या भांडणानंतर उत्तराला परत मिळवण्यासाठी- तिला असूया वाटावी यासाठी- समीरने शीतलचा वापर केला असावा असं शीतलच्या मैत्रिणींना वाटत होतं. त्यावेळी शीतलला मात्र वाटत होतं- समीरचं आपल्यावर प्रेम आहे. ते आज ना उदया कळेल त्याला. उत्तराला सोडून तो येईल आपल्याकडे. त्या क्षणाची कितीतरी दिवास्वप्नं रंगवली होती तिने. उत्तराचा गर्विष्ठ आणि आळशी, आत्मकेंद्रित स्वभाव पाहता ती चांगला संसार करु शकणार नाही. त्यातून समीर मराठी आणि उत्तरा गुजराती. तिला मराठी भाषा, संस्कृती आवडत नाही. मराठी म्हणजे तिच्यालेखी तुच्छ ’घाटी’. तिला मराठी बोलता येत नाही. शिकण्याची इच्छाही नाही. हे सगळं समीरच्या घरच्यांना खटकणारच. शिवाय समीरचे पैसे शॉपिंगमधे उधळणार उत्तरा. समीर आणि उत्तराचं पटणार नाही. मग समीर माझ्याकडे परत येईल. समीरचा मुलगा राहिला आपल्याबरोबर तरी आपण आपल्या मुलासारखंच सांभाळू त्याला. आणि शिवाय लवकरच आपलं आणि समीरचं मूल या जगात येईल. समीरच्या आईबाबांची आपण खूप सेवा करु. समीरला सुखात ठेवू. वगैरे वगैरे. पण तसं कधीच काहीच घडलं नाही. समीर परत आला नाही. ती कितीतरी वर्षं झुरत राहिली त्याच्यासाठी.
आणि आज इतक्या वर्षांनी समीर भेटला होता.
दोन दिवसांनी- शुक्रवारी- ऑफिसमधून ती बाहेर पडली तर समोर समीर उभा होता. परवा बोलताना तिचं ऑफिस कुठे आहे हे तिने त्याला सांगितलं होतं.
"कॉफी?" तो म्हणाला.
"अं..नको." ती म्हणाली.
"का?" तो आश्चर्याने म्हणाला.
"का म्हणजे काय? कशाला प्यायची मी तुझ्याबरोबर कॉफी?" ती वैतागून म्ह्णाली.
"I am sorry शीतल. तू खूप दुखावली गेली आहेस हे माहीत आहे मला. पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय."
"जे काही बोलायचं असेल ते इथेच बोल समीर. प्लीज. मी कुठेही हॉटेलमधे वगैरे येणार नाही. आणि लवकर बोल. मी घाईत आहे जरा आत्ता." ती हट्टीपणे म्हणाली.
त्याने आजूबाजूला पाहिलं. ते ज्या बसस्टॉपशी उभे होते तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. बऱ्यापैकी एकांत होता.
तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"गेले दोन रात्री मी झोपलो नाहीये शीतल. सारखा तुझा चेहरा डोळयांसमोर येत होता. तुझी आठवण येत होती. काय झालं होतं त्यावेळी मला- मूर्खपणा केला मी उत्तराशी लग्न करुन. तिचं कधीच पटलं नाही माझ्या आईबाबांशी. आणि मग माझेही खटके उडत राहिले. पण संसार मोडायचा तरी कसा? त्यासाठी लागणारं धैर्यही नव्हतं माझ्याकडे. आणि एक दिवस उत्तरानेच डिव्होर्स मागितला. तिच्या एका मित्राशी दुसरं लग्न करायचं होतं तिला. मीही खळखळ न करता लगेच तिला डिव्होर्स दिला. माझा मुलगा मात्र माझ्याकडेच राहिला. त्याला माझ्या आईबाबांचा खूप लळा आहे. त्याच्यासाठीच जगतोय मी आता. परवा तुला पाहिलं- तेव्हा वाटलं की मी तुझ्यावर केलेला अन्याय दूर करण्याची एक संधीच देतोय देव मला. मला लग्न करायचंय तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला हा एकटेपणा दूर करायचाय. मी तुझ्यावर केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करायचंय. तुझ्या रुपाने मला एक चांगली बायको, माझ्या मुलाला चांगली आई आणि माझ्या आईवडिलांना चांगली सून मिळेल. तू म्ह्णशील तेव्हा- अगदी उदयाच- किंवा आजही लग्न करायला तयार आहे मी तुझ्याशी. आणि मी इतकं प्रेम देईन तुला-"
शीतल बघत राहिली त्याच्याकडे. हाच तो क्षण...तिने याच क्षणाची किती वाट बघितली होती- किती स्वप्नं पाहिली होती- तिच्या सगळ्या स्वप्नांत लखलखणारा...तिचं आयुष्यच उजळवून टाकणारा..हाच तो क्षण.
पण आज या क्षणी तिला काहीच वाटत नव्हतं.
"तुझा काहीतरी गैरसमज झालाय समीर." ती थंडपणे म्हणाली.
"म्हणजे सध्या मी एकटी राहते हे खरंय. पण बेसिकली माझा नवरा पंधरा दिवस ऑफिसच्या कामासाठी चेन्नईला गेला होता. आणि सासूसासरे कोकणातल्या आमच्या घरी गेले आहेत. अर्णव- म्हणजे माझा मुलगाही गेलाय त्यांच्याबरोबर. सध्या सुट्टी आहे त्याला शाळेला. मला मात्र ऑफिसमधे खूप काम असल्यामुळे सुट्टी घेता आली नाही आणि इथेच राहावं लागलं. आज माझा नवरा परत येतोय. आणि सोमवारी सासू-सासरे-मुलगाही परत येतील. तुझा गैरसमज झाला- आणि मी वेस्टर्न कपडयांवर मंगळसूत्र वगैरे पण रोजच्या रोज घालतेच असं नाही- त्यामुळे पण कळलं नसेल तुला."
समीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
"ओके..आय गेस...आता बोलण्यासारखं काही उरलं नाहीये- बाय." ती घाईघाईत निघाली. तिने एक रिक्षा थांबवली व रिक्षावाल्याला तिच्या घराचा पत्ता सांगून ती रिक्षात बसली. डोक्यात विचार चालूच होते. त्यावेळी समीरची खूप वाट बघूनही तो परत आला नाही तेव्हा ती एकटी पडली होती. तिच्या मैत्रिणींची भराभरा लग्न ठरली, झाली. समीर प्रकरणानंतर ती पुरती निराश झाली होती. आईबाबांना, दादाला सगळं कळलं होतं आणि त्यांनाही तिची अवस्था बघून तुटत होतं. लग्न करायला ती आता तयारच नव्हती. आईने जबरदस्तीनेच अजिंक्यला भॆटायला लावलं तिला. अजिंक्य समीरपेक्षा कितीतरी जास्त देखणा. शिवाय उच्चशिक्षित, निर्व्यसनी, चांगल्या घरातला. तिच्या बाबांच्या जिवलग मित्राच्या माहितीतलं स्थळ. अजिंक्यने होकार दिल्यावर तिने होकार दयावा ही आई-बाबा, दादा-वहिनी सगळ्यांचीच अपेक्षा. पण होकार दयायच्या ऐवजी तिने अजिंक्यला बाहेर भेटायला बोलावलं आणि समीरबद्दल सांगितलं सगळं. समीरबरोबर शारीरिक मर्यादा तिने कधीच ओलांडली नव्हती पण मनाने मात्र ती समीरची झाली होती. हे सगळं स्पष्टपणे तिने अजिंक्यला सांगितलं. "बरं झालं तू विषय काढलास. मलाही तुला असंच काही सांगायचं होतं. माझीपण होती गर्लफ्रेन्ड कॉलेजमधे. नंतर ब्रेक-अप झाला आमचा. आणि तू इतकं नको मनाला लावून घेवूस. त्यात काही इतकं ॲबनॉर्मल नाहीये." अजिंक्यने सहजपणे घेतलं होतं सगळं. "फक्त आपल्या लग्नानंतर या प्रकरणाचा आपल्यावर कधी काही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायलाच पाहिजेस तू. मीही माझ्याकडून तशी काळजी घेईन." हेही बजावलं होतं त्याने. आणि मग अजिंक्यशी लग्न, तिचं नोकरी सोडून पूर्णवेळ गृहिणी होणं, मोठया कुटुंबातील आदर्श सून होण्याचा प्रयत्न, अजिंक्यला भराभर मिळत गेलेली प्रमोशन्स, त्यात अर्णवचा जन्म, अर्णव एक वर्षाचा झाल्यावर आर्थिक गरज नसतानाही सहज मिळाला म्हणून तिने स्वीकारलेला या कंपनीतला लठ्ठ पगाराचा, मोठया पोस्टचा पण हेक्टिक जॉब..सासूसासऱ्यांनी अर्णवला दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी घेऊन तिच्या करीयरला दिलेला सपोर्ट..भराभरा दिवस उडून गेले होते.
अजिंक्यशी संसार केला होता तिने पण प्रेम? मनातला तो कोपरा समीरनेच व्यापला होता. का नाही प्रेम करत आपण अजिंक्यवर? तो समीरसारखा नाही म्हणून? पण याच अजिंक्यच्या पुरुषी कणखरपणामुळे आपल्याला कायम सेफ वाटतं हे का विसरतो आपण? याच अजिंक्यने आपलं थांबून राहिलेलं जीवन पुन्हा प्रवाही केलं हे का विसरतो आपण? समीरने फक्त उपेक्षा केली आपली आणि अजिंक्यने मात्र आपल्या भूतकाळासकट स्वीकारलं आपल्याला. आज आपलं आयुष्य जे काही आहे ते अजिंक्यमुळे आहे.
तिला आज पहिल्यांदाच अजिंक्यला भेटण्याची ओढ वाटत होती. रिक्षावाल्याला तिने रिक्षा तिच्या घराजवळच्या पार्लरशी घ्यायला सांगितली. हेअर वॉश, ब्लो ड्राय, आय ब्रोज, फेशियल- दीड तासानी ती बाहेर पडली तेव्हा तिला हलकं आणि फ्रेश वाटत होतं. घरी पोचल्यावर तिने आरशात पाहिलं. ती छानच दिसत होती. अजिंक्यच्या आवडत्या काळया रंगाचा एक नवीन टॉप तिच्याकडे पडला होता. तो तिने कधी वापरलाच नव्हता. तिने आज तो घालायचं ठरवलं. गोऱ्या रंगावर खुलून दिसणारा काळा टॉप, फिकट निळी जीन्स, हातात ’असू दे’ म्हणून थंडीसाठी घेतलेलं ग्रे जॅकेट, सेंटचा सुगंधी फवारा. हिऱ्याचं नाजूक लहानसं मंगळसूत्र. हिऱ्याचेच कानातले. हातात नाजूक फिकट लाल गुलाबांचा एक गुच्छ. ती एअरपोर्टवर पोचली. तिला असं फुलंबिलं घेऊन एअरपोर्टवर आलेलं बघून आधी अजिंक्यला धक्काच बसला. त्याने कधीच याआधी न बघितलेल्या काळ्या टॉपमधे ती खास सुंदर वगैरे दिसत होती यामुळे आणखीच धक्का बसला. ती गाडी घेऊन आली होती. एरव्ही अजिंक्य बरोबर असला की ती स्वत: ड्रायव्हिंग करायचा कंटाळा करायची. त्यालाच ड्रायव्हिंग करायला लावायची. त्याला ड्रायव्हिंग आवडायचं त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. आज मात्र ती आपण होऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसली. "मी टेबल बुक केलंय ’चायना स्टार’ मधे." ती गाडी चालू करत म्हणाली. ते अजिंक्यचं आवडतं रेस्टॉरन्ट होतं. "डिनर करु आणि मग घरी जाऊ." ती म्हणाली. अजिंक्य तिच्याकडे बघतच राहिला. हा जो काही बदल झाला होता तिच्यामधे त्याचं कारण त्याला माहीत नव्हतं पण हा चांगला बदल होता हे मात्र नक्की. रेस्टॉरन्टमधे आधीच बुक करुन ठेवलेलं टेबल त्यांची वाटच बघत होतं. त्यांनी ऑर्डर दिल्यावर काही वेळाने वेटर गरमागरम चायनिज जेवण घेऊन आला. आज सगळेच पदार्थ फार छान बनले होते. अजिंक्य एकदम खूश. खाता खाता "हे जेवण किती चांगलं आहे.." ही अजिंक्यशी चर्चा करताना तिला जाणवलं...तिच्या आयुष्यातलं समीर नावाचं मळभ आता कायमचं दूर झालंय आणि अजिंक्य नावाचा सूर्य तिथे स्वच्छ प्रकाश देतोय.
Labels:
कथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
शक्यतो लहान पॅरिग्राफ कर म्हणजे वाचायला सोपं होतं. इतके मोठे पॅरीग्राफ असले की शब्दांचा नुसता गोंधळ दिसतो स्क्रिन वर.
ReplyDeleteआणि पांढरा बॅकग्राउंड जास्त बरा वाटतो वाचतांना.
धन्यवाद!
ReplyDeleteKhupach chan!
ReplyDeletereally very very good...
ReplyDeletedhanyavaad shilpa!
ReplyDeletekhup khup chan ...
ReplyDeletesar kahi ekadam perfect mandal aahe sar chitr dolyasamore ubh rahil.
Thanks Yashwant!
ReplyDeletekhoopach chan
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteWaiting for your next story.... perfect like this...
ReplyDelete