Sunday, October 28, 2012

फेसबुकवरचे काही उल्लेखनीय मनुष्य-विशेष


उठसूठ चेक-इन करणारे : फेसबुकने तुम्ही कुठे आहात हे सांगण्यासाठी चेक-इनची सुविधा उपलब्ध केली आणि काही लोकांनी तो चेक-इन प्रकार जरा अतीच करायला सुरुवात केली. म्हणजे सारखं चेक-इन करायचं- आज काय - ही मंडळी घराशेजारच्या उडप्याच्या हाटिलात गिळायला गेली आहेत. उदया काय- घराजवळच्या मल्टिप्लेक्समध्ये कुठला तरी टुकार हिंदी चित्रपट बघायला गेली आहेत. बरं- नुसतं चेक-इन करुन ही मंडळी थांबत नाहीत. त्यात ’with' कोण-कोण आहे हे महत्त्वाचं. विशेषत: कपल्समध्ये हे फॅड असतं. म्हणजे ’झंप्या गाढव इज विथ पिंकी गाढव ॲट हॉटेल सत्कार’- छापाच्या पोस्ट करायच्या. (ही नावे काल्पनिक आहेत अर्थात.)
आता एखादा माणूस आणि त्याची बायको शनिवारी कुठच्या हॉटेलमध्ये गेले आहेत याच्याशी इतरांना काय करायचंय? पण असं स्वत:, स्वत:ची बायको/नवरा आणि एखादं-दुसरं सोबत असलेलं कपल - यांना विकेन्डला एखादया मॉल, मल्टिप्लेक्स किंवा हॉटेलमध्ये टॅग केलं की आपण किती ’कूल’ आहोत, आपलं मॅरिड लाईफ आणि सोशल लाईफ किती हॅपनिंग आहे असं या लोकांना दाखवायचं असावं. त्यात जर हे लोक कुठे सहलीला गेले तर मात्र यांना ऊत येतो. आधीच मर्कट, त्यातच मदय प्याला अशी त्यांची अवस्था होते. ते अगदी एअरपोर्टपासून चेक-इन आणि टॅग करायला सुरुवात करतात ते पार राहण्याचं हॉटेल, फिरण्याचे स्पॉट्स- जिथे जिथे रेन्ज मिळते तिथे तिथे फेसबुक भरत बसतात. कुठे कधी बाहेर गेले नसले, घरीच असले, तर आपण घरी आहोत, हे सुद्धा चेक-इन करुन फेसबुकवर टाकतात आणि त्यात घरातल्या लोकांना आणि घरी पाहुणे आले असले तर त्यांना टॅग करतात.

प्रेमात असलेले नवरा-बायको: तशी ही जमात अल्पसंख्य आहे. कारण प्रेमात पडून जरी लग्न केलं तरी एकदा नवरा-बायको झाल्यावर तुम्ही जमिनीवर येताच. पण ही काहीकाही कपल्स लग्नानंतरही फार प्रेमात वगैरे असतात. मग या प्रेमात असलेल्या बायका नवऱ्याला फेसबुकवरती ’माय शोनू’, ’माय स्वीटू’, ’माय हबी’ वगैरे संबोधित करतात. नवरेही बायकोला ’माय लव्ह’, ’wifey', 'बेबी’ वगैरे म्हणत असतात. मग हे लोक फेसबुकवरती एकमेकांची कौतुकं करत बसतात. एकमेकांच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला- एकाच  घरात असले तरी एकमेकांना फेसबुकवरुन विश करतात. एकमेकांचे वेगळे किंवा दोघांचे एकत्र फोटो सतत टाकत बसतात. प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी फेसबुक हे माध्यम यांना आवडतं.

लहान मुलांचे पालक: या जमातीची ओळख यांच्या प्रोफाइल फोटोवरुनच होते. यांच्या प्रोफाइल किंवा कव्हर फोटोमध्ये यांची मुलं असतात. आता मुलासकट स्वत:चा फोटो कुणी टाकला तर ठीकच, पण हे लोक फक्त मुलांचे फोटो टाकतात- तेसुद्धा स्वत:चं प्रोफाइल पिक्चर म्हणून. ’मुलाचे फोटो टाकणं’ हा त्यांचा फेसबुकवरील मुख्य उदयोग असतो असं मात्र नाही. हे लोक सतत पालकत्वाबद्दलचे त्यांचे विचार, त्यांचं मूलच कसं जगातलं सगळ्यात हुशार, गोड मूल आहे, मूल असल्यामुळे यांचं जीवन कसं सफल झालं आहे- हे फेसबुकवर टाकत बसतात. यांच्या मुलांची नावंही ठराविक असतात. मुलगा असेल तर आर्य, आर्यन, विहान, विवान, अथर्व, वेदांत, इशान, नील, अर्णव इत्यादी. मुलगी असेल तर आर्या, सिया, सानवी, सारा, रिद्धी, वगैरे. मुलांचे फोटो कितीही गोड असले तरी ते किती टाकायचे याला काही मोजमाप या मंडळींकडे नसते.
काही लोक तर आपल्या लहान मुलांच्या नावाचे फेसबुक अकाऊंट उघडतात. आणि मग त्यातून स्वत:च पोस्ट करत बसतात लहान मुलाच्या वतीने. आवरा रे कुणीतरी त्यांना!

भारतावर कावळ्यासारखी नजर ठेवून असणारी परदेशस्थ भारतीय मंडळी: ही मंडळी परदेशात स्थायिक झालेली असतात. परदेश म्हणजे अमेरिकेपासून दुबईपर्यंत कुठलाही देश पण त्यातही अमेरिका, कॅनडा किंवा युकेतील मंडळी या कॅटेगरीत जास्त आढळतात. तिथे राहात असलेल्या या लोकांचं भारताकडे भारी लक्ष असतं. आणि भारतातल्या प्रत्येक घडामोडीवर फेसबुकवरुन हे लोक सतत भाष्य करत असतात. अण्णा हजारेंचं आंदोलन, रॉबर्ट वद्राची मालमत्ता, क्रिकेट सीरीजमधला भारतीय टीमचा परफॉर्मन्स- या सगळ्यात या परदेशस्थ फेसबुककरांना भलताच रस असतो. यातही - जे लोक काही कारणामुळे थोडया कालावधीसाठी परदेशात राहतात (यात मीही आलेच) पण भारतातच स्थायिक होण्याचा ज्यांचा निर्णय झालेला असतो, ते लोक या अशा भारताबद्दल कॉमेन्टस करण्यात रस दाखवत नाहीत. कॉमेन्ट्स करणारी मंडळी ही जास्त करुन स्वत: ग्रीनकार्डधारक असतात आणि अमेरिकन नागरिकत्वाच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू असते. भारत कसा वाईट आहे, भारतात भ्रष्टाचार कसा चालू आहे- यावर या लोकांची सतत टिप्पणी चालू असते. थोडक्यात- भारतात राहणाऱ्या लोकांना "कसे राहता तुम्ही त्या डर्टी इंडियात? आम्ही बघा कसे पृथ्वीवरच्या स्वर्गात राहतो" असे खिजवण्याचा यांचा हेतू असावा. भारतात राहणाऱ्या लोकांना नसते इतकी यांना भारतातल्या घडामोडींची माहिती असते. भारतातल्या चांगल्या गोष्टी यांना कधीच दिसत नाहीत. पण भारताला सतत नावे ठेवण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही. भारतात कुठे काहीही झाले- विशेषत: दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट वगैरे- तर हे लोक अमेरिकेत किंवा युकेत बसून सात्विक संतापाने भरलेले पोस्ट टाकतात. "हे असं कुठवर चालणार?" वगैरे बरंच काय काय. मात्र अमेरिकेत किंवा युकेमध्ये भारतीयांवर हेट क्राईमवाले जे हल्ले होतात (परवा Wisconsin ला झाला तसा) त्यावेळी मात्र ही मंडळी गप्प असतात (बहुधा भीतीने दातखिळ बसत असावी.)

अर्थात, या सगळ्या मंडळींमुळेच फेसबुकवर टाईमपास होतो त्यामुळे यांनी आपले हे चांगले काम असेच चालू ठेवावे ही कळकळीची विनंती :)

Saturday, October 27, 2012

मराठीचं काय करायचं?


घटना एक:
स्थळ: पुणे
एका समारंभात नवऱ्याला त्याचा एक जुना मित्र भेटला. तो आपण होऊन बोलायला आला. मित्र पुणेकर मराठी. त्याने मराठीतच बोलायला सुरुवात केली. त्याची सहा-सात वर्षांची लहान मुलगी तिथेच खेळत होती. तिच्याशी मात्र तो हिंदीमध्ये बोलत होता. "यहां आओ, वहां मत जाऒ, मम्मी के पास जाओ" वगैरे. थोडयावेळाने त्याची बायको तिथे आली आणि संभाषणात सामील झाली. तिने हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तोही हिंदी बोलू लागला आणि त्यामुळे आम्हीही. बायकोच्या चेहऱ्यामोहऱ्यावरुन ती मराठी नाही हे कळत होतं. मुलीशीही ते सतत हिंदीमध्येच बोलत होते.
पुण्यात राहणाऱ्या, मराठी आडनाव लावणाऱ्या त्या मित्राच्या बायकोला आणि मुलीला मराठी बोलता येत नव्हते. सहा-सात वर्षांची मुलगी आहे म्हणजे त्यांच्या लग्नाला सात-आठ वर्षं झालीच असणार कमीत कमी. त्या काळात तो पुण्यातच नोकरी करत होता हा उल्लेखही त्याच्या बोलण्यात आला. मराठी मुलाशी लग्न केलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या त्या अमराठी मुलीला नवऱ्याची भाषा (जी सो-कॉल्ड राज्यभाषादेखील आहे) शिकण्याची अजिबात गरज वाटली नव्हती. (भाषा शिकायला सात वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.) आणि तिलाच जी भाषा येत नाही ती मुलीला शिकवण्याचीही अजिबात गरज वाटली नव्हती.

घटना दोन:
स्थळ: मुंबईतील लोकल ट्रेन
मी लोकलमधून प्रवास करत असताना एक ओळखीची बाई भेटली. ती मराठी असल्यामुळे आमच्या गप्पा मराठीतून सुरु झाल्या. तिचा पाच-सहा वर्षांचा मुलगाही सोबत होता. त्याच्याशी ती हिंदीत बोलत होती. तो मुलगाही तिच्याशी हिंदीतच बोलत होता. त्या बाईचा नवरा त्याक्षणी तिच्यासोबत नव्हता पण तोही मराठीच आहे हे मला माहीत होतं. आई-बाबा दोघंही मराठी असताना मुलगा हिंदीत का बोलतोय मला कळेना. मी त्याच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. पण तो माझ्याशी हिंदीत बोलू लागला.
"त्याला मराठी येत नाही." त्याची आई अगदी सहजपणे म्हणाली.
"का?" मी आश्चर्याने विचारलं.
"अगं आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे सगळे कॉस्मोपॉलिटन (म्हणजे मराठी सोडून बाकी सगळॆ) लोक राहतात. तिथे याचे सगळे मित्र, त्यांच्या आया - सगळे हिंदीच बोलतात. शिवाय तो ज्या शाळेत जातो तिथे टीचर्स, मुलं सगळे हिंदीच बोलतात. त्यामुळे त्याला घराबाहेर सतत हिंदीच बोलावं लागतं. त्यामुळे आता घरीपण आम्ही हिंदीतच बोलतो. शिवाय शाळा इंग्लिश मिडीयमची असल्यामुळे तीही भाषा शिकायची आहेच त्याला. मराठी शिकवून काहीच उपयोग नाही. म्हणून आम्ही त्याला हिंदीच शिकवलं आहे."
मराठी मातापित्यांना आता ’मराठी शिकवून काय फायदा?" असं वाटत असल्यामुळे ते मुलांना मराठी-बिराठी शिकवण्याच्या फंदात पडत नाहीत-सरळ घरी हिंदी बोलू लागतात- ही माझ्यासाठी न्यूज होती.

अशी परिस्थिती आता अनेक मराठी घरांमध्ये दिसते. आजकाल मराठी-अमराठी विवाह खूप होतात. मराठी मुलीने अमराठी मुलाशी लग्न  केलं की तिने सासरची संस्कृती आणि भाषा आत्मसात करणं अपेक्षित असतं आणि त्याप्रमाणे त्या करतातही. पण अमराठी मुली लग्नानंतर मराठी शिकताना दिसत नाहीत, त्यांची मुलंही हिंदीच बोलत लहानाची मोठी होतात. त्यामुळे आडनावाने मराठी पण रुपाने आणि भाषेने अमराठी अशा लोकांची एक मोठीच फौज आता तयार होते आहे.
तसेच, काही काही आई-बाप दोघेही मराठी असले, तरी मुलांना मराठी शिकवण्याची त्यांना इच्छा नसते. अमेरिकेत वगैरे स्थायिक झालेल्या पालकांनी ’मुलाला मराठी कशाला शिकवायचं?’ असा विचार केला तर मी एकवेळ समजू शकते. पण महाराष्ट्रात राहणारे पालकही असा विचार करु शकतात हे निदान मलातरी धक्कादायक होतं.
या सगळ्यामुळे मराठी भाषेला अखेरची घरघर लागली आहे असं वाटू लागतं.

घटना तीन:
स्थळ: मुंबईतील एक रेस्टॉरन्ट
मी मित्रमैत्रिणींच्या एका ग्रुपमधे बसले होते. आमच्यातला एकजण पंजाबी आहे. मुंबईत राहतो.
"अरे माझ्या भावाला अमुक अमुक कंपनीनी ऑफर दिली होती. आत्ता आहे त्याच्यापेक्षा दीडपट पगार, इतरही पर्क्स..लोकेशन केरळ होतं." तो म्हणाला. त्याचा भाऊपण मुंबईतच राहतो.
"मग? घेतली का ती नोकरी तुझ्या भावाने?" कोणीतरी विचारलं.
"नाही घेतली." तो म्हणाला.
"का?"
"अरे तिकडे केरळमध्ये राहायचं म्हणजे मल्याळम शिकायला लागलं असतं. त्यांची भाषा येत नसेल तर ते लोक तुम्हाला त्रास देतात. म्हणून मग त्याने ती नोकरी घेतली नाही."
या पंजाबी माणसाला आणि मुंबईत स्थायिक झालेल्या त्याच्या तमाम खानदानाला मराठी अजिबात येत नाही. कधी शिकायची गरजच पडलेली नाही.
मुंबई-पुण्यात- एकंदरीत महाराष्ट्रात मराठी भाषा आली नाही म्हणून काहीच बिघडत नाही. पण इतर राज्यात मात्र लोक त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात. म्हणून परप्रांतियांना सेटल होण्यासाठी महाराष्ट्र बेस्ट. म्हणजे मराठी माणसाचं स्वत:च्या भाषेसाठी आग्रही नसणं त्याच्या मुळावर येत आहे का?

मराठी भाषेचा relevance आता संपत चालला आहे का? एखादया गंभीर, हाताबाहेर गेलेला आजार झालेल्या रुग्णाचे नातेवाईक जसे ’आता याचे थोडेच दिवस राहिले’ ही गोष्ट शांतपणे स्वीकारतात तशी ’आता मराठीवर प्रेम करणारी आपली शेवटची किंवा फारतर शेवटून दुसरी पिढी’ हे आजच्या मराठी पिढीने स्वीकारायला हवे का?

Friday, October 26, 2012

हर इक लम्हे से तुम मिलो..खोले अपनी बाहे...तो झिंदा हो तुम..




एक आळसावलेली संध्याकाळ. (मला आळस कधी आलेला नसतो हा एक प्रश्नच आहे म्हणा!) गरमागरम चहा (मी केलेला, अर्थात!) पीत मी आणि नवरा आपापल्या लॅपटॉपमधे डोकं घालून बसलो होतो. (पेस्तनकाकामध्ये लिहिलंय पुलंनी की ते आणि सुनीताबाई एकेक पुस्तक घेऊन वाचत बसायचे, तसे मी आणि माझा नवरा आपापला लॅपटॉप घेऊन एकमेकांशी एक शब्दही न बोलता तासनतास बसू शकतो.) अचानक लॅपटॉपमधून डोकं वर करुन नवरा म्हणाला- "उदया स्काय डायव्हिंगला जायचं का आपण?"
"स्काय डायव्हिंग? म्हणजे ’झिंदगी ना मिले दोबारा’ मध्ये फरहान अख्तरनी केलं होतं ते?" मी धास्तावून विचारलं.
त्याने होकारार्थी मान डोलावली. तो अतिशय धाडसी स्वभावाचा. Adventure Sports म्हणजे त्याचा आवडता प्रांत.  मी मात्र अगदी उलट. भित्री भागूबाईच. उगाच कशाला जीव धोक्यात घालायचा, त्यापेक्षा मस्त घरी पुस्तक वाचत बसावं एखादं- असा माझा कायम विचार. आणि उंचीची भीती मला वाटतेच.
"घरी फोन कर आणि परवानगी घे." मी सावध पवित्रा घेतला.
"मी काही फोन-बिन करणार नाही-" तो उखडला. आपापल्या आणि/किंवा एकमेकांच्या पालकांची प्रत्येक बाबतीत परवानगी घेण्याइतके आपण आता लहान नाही असं त्याचं ठाम मत आहे.
बरोबर त्याचे मित्र असणार होतेच. त्यांच्या बायकाही असणार होत्या. म्हणून मीही बरोबर यावे इतकीच नवऱ्याची माफक अपेक्षा होती. मी स्काय डायव्हिंग करावे ही त्याची अपेक्षा नव्हतीच.
"ठीक आहे. जाऊ आपण." मी म्हटलं. त्याला जायची किती इच्छा होती हे मला दिसत होतं. त्यामुळे इथे मला नकार देणं शक्य नव्हतं. तो करेल स्काय डायव्हिंग- आपण त्याचे फोटो काढू, त्याचा मोबाईल, सनग्लासेस सांभाळू, बरोबर नेलेलं पुस्तक वाचू, त्याच्या मित्रांच्या बायका जर स्काय डायव्हिंग करणार नसल्या तर त्यांच्याशी गप्पा मारू- असं मी ठरवलं.
रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्यावर मात्र मनात येऊ लागलं- नेहमीच आपल्याला वाटतं की आपण भित्री भागूबाई आहोत. आणि याबद्दल काय करावं हे कळत नाही. आता एक चांगली संधी आली आहे- भित्रटपणावर उपाय करण्याची. मी स्काय डायव्हिंग केलं तर?
नवऱ्याने तोपर्यंत मित्राशी फोनवर बोलून प्लॅन कन्फर्म केला आणि संबंधीत वेबसाईटवर जाऊन तो माहिती काढू लागला. मीही माझ्या लॅपटॉपवरुन वेबसाईट उघडली. अरे बापरे....चक्क उडत्या प्लेनमधून फेकून देतात आपल्याला खाली. आणि खाली काही वाळू वगैरेपण नसते. Parachute घेऊन उडी मारायची.
"इन्स्ट्रक्टर असतो बरोबर. इतकं घाबरु नकोस." नवरा म्हणाला. ('Tandem Sky Diving' म्हणजे नवख्या लोकांसाठी असतं- त्याच्यात एक मार्गदर्शक माणूस तुमच्याबरोबर उडी मारतो. ZNMD मध्ये फरहानला पहिलीच उडी विदाउट मार्गदर्शक मारताना दाखवलं आहे तसं निदान अमेरिकेत तरी करत नाहीत.) तसा खर्चही जास्त होता या प्रकाराचा. फी ’पर हेड’ बेसिसवर होती. ’मी नाहीच केले तर पैसे वाचतील.’ असा कोकणस्थी विचार मनात आलाच. डॉलरमधल्या फीला पन्नासने मनातल्या मनात गुणून किती रुपये वाचतील हा हिशेब केला. लईच महाग होतं हे प्रकरण. एव्हढया पैशात भारतात भरपूर शॉपिंग होईल. पण ’वन्स इन अ लाईफ टाईम’ अनुभव असणार होता. मला स्वत:ला बोल्ड करण्याची एक संधी आयती समोर आली होती. शॉपिंगचं काय- आत्तापर्यंत करत आले, यापुढेही करतच राहीन- पण अशी संधी परत परत मिळणार नाही. ’करावं की न करावं’ - ’टू बी ऑर नॉट तू बी’- माझ्या मनाचा निर्णय होईना. जाऊ दे उदया बघू तिकडे जाऊन- वाटलं तर करु- नाहीतर पैसे वाचल्याचं समाधान- असं ठरवून रात्री झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही स्काय डायव्हिंगच्या ठिकाणी जाऊन पोचलो. तिथे लोकांच्या उडया चालूच होत्या. जंपसूट घालायचा, विमानात बसायचं, वर गेल्यावर इन्स्ट्रक्टर आणि तुम्ही एकत्र बाहेर उडी मारायची, मग पॅराशूट उघडतं, तुम्ही तरंगत तरंगत खाली येता. सोप्पं अगदी.
नवरा हे सगळं बघून खूश झाला. लगेच जाऊन त्याने फी भरली आणि मजेत स्काय डायव्हिंग करुनही आला. मला कळेना काय करावं ते. भीती वाटत तर होतीच. पण मग लगेच मनात विचार आला- करुन बघू या ना. तसं सेफ वाटतंय. आणि जर आपल्याला बोल्ड व्हायचं असेल तर हे केलंच पाहिजे. नुसती बोल-बच्चनगिरी काय कामाची?
झालं. मी सज्ज झाले उडी मारायला. मग त्यांनी कसलासा फॉर्म दिला भरायला. हे प्रकरण रिस्की असतं त्यामुळे कन्सेन्ट फॉर्म भरुन घेतात. उदया तुमचा जीव गेला या नसत्या धाडसात तर स्काय डायव्हिंग कंपनी जबाबदार नाही. मग त्या फॉर्मवर तुमच्या आणि साक्षीदारांच्या सहया घेतात. सह्या झाल्या. नवऱ्याने पैसे भरले. जंपसूट चढवून मी सज्ज झाले. एका छोटयाश्या विमानात स्थानापन्न झाले. विमानात माणसे इन-मीन-तीन. मी, पायलट आणि माझा इन्स्ट्रक्टर कर्ट. आता विमानाने हवेत झेप घेतली. जमिनीवर उभा असलेला नवरा हात हलवत होता. बघता बघता विमान बरंच वर आलं. आता खाली माणसं तर दिसत नव्हती. कारण आम्ही १०,००० पेक्षा जास्त फूट वर आलो होतो. वरुन ’विहंगम’ का काय म्हणतात तसं खालचं जग सुंदर दिसत होतं. विमानातल्या इतर दोघांशी मला काहीच गप्पा मारता येत नव्हत्या कारण प्रचंड आवाज. एरव्ही नॉर्मल विमानप्रवासात टेक-ऑफ, लॅंडिंग आणि टर्ब्युलन्सच्या वेळी मी घाबरते. पण इथे या चिमुकल्या विमानात बसण्याचं धाडस केलं होतं. आत कर्टने पॅराशूट सज्ज केलं. ते आम्हा दोघांशीही attach केलं.  आणि विमानाचं दार उघडलं. अरे बापरे!
बाहेर प्रचंड वारा...प्रचंड फोर्सनी हवा आदळत होती. आम्ही १०,००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर होतो आणि मी आता विमानातून खाली उडी मारावी अशी माझ्या त्या दोन सहप्रवाश्यांची अपेक्षा होती. कर्ट मला मी उडी मारावी असं सांगू लागला. पण माझं धाडस होईना. उगाच काय काहीही. पायलटही आता माझ्याकडे पाहू लागला- ही बया उडी मारतच नाही की काय?
मला त्याक्षणी वाटले- काही उडी-बिडी मारायची नाही. पायलटला सांगू या की दार बंद कर परत आणि मला सुखरुप खाली ने. पैसे गेले फुकट तर गेले. नवरा चिडेल, चिडू दे. बरोबरची मंडळी ’भित्रट’ म्हणून नावे ठेवतील, ठेवूदेत. पण हे असं उडत्या विमानातून उडी मारणं मला शक्य नाहीये. मी आता त्या दोघांना सांगू लागले की मला कसंसंच होतंय- मी जात नाहीये बाहेर. पण त्या वाऱ्यामध्ये आणि विमानाच्या आवाजामध्ये त्यांना काही ऐकूच येत नव्हतं.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की उडी मारल्याशिवाय आता गत्यंतर नव्हते. मी धाडस करुन दोन्ही पाय विमानाबाहेर काढले. आता स्वत:ला झोकून दयायचं बाहेर. तो क्षण प्रचंड भीतीचा- पुढे काय होईल हे माहीत नसण्याचा.  एक क्षण मी विमानात. आणि दुसऱ्या क्षणी मी विमानाबाहेर. विमान दूर निघूनही गेलेलं. फ्री फॉल म्ह्णजे जबरदस्त भारी अनुभव. गुरुत्वाकर्षणाचा जबरदस्त फोर्स. त्यात हवेत कसेही उलटेपालटे होणारे आपण. मी पक्षांसारखे हात पाय पसरवावेत म्हणजे मला बॅलन्सला बरं पडेल असं कर्ट सांगू लागला. मी त्याप्रमाणे केलं. एव्हाना पॅराशूट उघडलं. हुश्श! आता काही टेन्शनच नव्हतं. पक्षासारखी आडवी होऊन उडणारी मी पॅराशूट उघडताच परत उभी झाले आणि मजेत हवेत अलगद तरंगू लागले. "कधी एकदा परत खाली सुखरुप जात्येय’ असा विचार मागे पडला आणि ’कसलं सही वाटतंय- अजून थोडा जास्त वेळ नाही का मला असं हवेत राहता येणार’, असा विचार येऊ लागला. त्यावेळी वरुन दिसणारं ते दृश्य, हवेत तरंगण्याचं ते फीलिंग- ते शब्दात सांगता येणं कठीण आहे. पक्ष्यांना उडताना कसं वाटत असेल याची काहीशी कल्पना आली. नुसतं विमानात बसणं वेगळं आणि हा असा चौफेर view मिळणं, हवेत तरंगणं वेगळं. काही वेळाने सुखरुप आम्ही गवतावर लँड झालो. कर्टचे मी मनापासून आभार मानले.
पुढचे दोन दिवस माझी कंबर ठणकत होती. (Landing च्या वेळी जरा आपटले होते जमिनीवर). पण आजही जेव्हा ते क्षण आठवतात, ते फोटो बघते तेव्हा खूप सही वाटतं. ’जर आपण उडत्या विमानातून १०,०००+ फूट उंचीवरुन खाली उडी मारु शकतो तर आपण आयुष्यात बरीच कठीण कामं करु शकतो’ हा एक नवा विश्वास, एक नवा paradigm मला त्या धाडसाने दिला आहे, आणि तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

क्षण



शीतल सकाळी उठली. घडयाळात बघितलं तर चक्क नऊ वाजले होते. तिने घाईघाईत आवरलं आणि कशीबशी पावणेबारा वाजता ती ऑफिसला पोचली. ऑफिसात पाऊल टाकताच निखिलची सेक्रेटरी ईशा तिच्यावर धावून आली.
"कुठे होतीस तू? मी केव्हापासून तुला contact करण्याचा प्रयत्न करतेय. ब्लॅकबेरीवर फोन केला, तुझ्या पर्सनल नंबरवर फोन केला- तुला मेल्स पाठवली- तुझा पत्ताच नाही."
"अं...हो...जरा उशीर झाला आज- शिवाय traffic-"
"He is waiting for you since TWO HOURS-"
शीतलला आता ईशाचा रागच आला होता. अरे हो..झाला उशीर- पण इतकं काय त्याचं- आणि ही बॉस आहे का माझी? माझ्यापेक्षा कितीतरी ग्रेड खाली आहे ही- दिसायला सुंदर आहे म्हणून निखिलनीच डोक्यावर चढवून ठेवलंय. सीनियर मॅनेजर्सशी कसं बोलावं हेसुध्दा कळत नाही या बयेला.
ती निखिलच्या केबिनकडे वळली. तर आतमधे निखिल फोनवर बोलत होता. ती तिथेच उभी राहिली. हातात पर्स आणि लॅपटॉपची बॅग तशीच घेऊन. दहा मिनिटं उभं राहून पाय दुखायला लागले- जड लॅपटॉप बॅग धरून हात. आता काय करावं? थांबावं का क्युबिकलशी जाऊन बॅग ठेवून नंतर यावं? तेव्हढयात एकदाचा निखिलचा फोन संपला. ती लगेच आत घुसली.
"सॉरी आज उशीर झाला मला-"
"It's alright. Take a seat-" निखिलनी मग लगेच मुद्दयाला हात घातला. त्याला आज दुपारी एक प्रेझेंटेशन दयायचं होतं. त्यासंबंधी काही काम त्याला शीतलकडून करुन घ्यायचं होतं. काम समजावून घेवून शीतल आपल्या क्युबिकलकडे वळली.
दुपारची डेडलाईन होती त्यामुळे मग ती भराभर कामाला लागली. फायनल कॉपी तिने निखिलला मेल केली तेव्हा साडेतीन वाजले होते. त्यांचं canteen बंदच व्हायचं साडेतीनला. तिला आता भूक लागली होती. सकाळपासून चहा, पाणी, खाणं काहीच झालं नव्हतं. तिने डेस्कवर ठेवलेली रिकामी झालेली पाण्याची बाटली भरुन आणली. तेव्हढयात निखिलचं मेल आलं परत. "आता काय झालं? परत काय हवंय याला?" धास्तावून तिने मेल उघडली. "Good. Excellent job." निखिलनी फक्त इतकंच लिहिलं होतं. तिला जरा बरं वाटलं. निखिल आता कसल्याशा conference ला चालला होता. तिथून तो घरी जाणार होता. बाकीही काही ऑफिसमधे फार तातडीचं काम नव्हतं. त्यामुळे आता जरा ब्रेक घ्यावा, जरा खावं असा  तिने विचार केला. तिच्या ऑफिसजवळ एक चांगलं restaurant होतं. तिथे sandwiches आणि कॉफी वगैरे चांगलं मिळायचं. ती तिथे एकटी कधी गेली नव्हती. पण आज मात्र ती तिथे गेली. "Table for how many, mam?" वेटरने विचारलं.
"Just one!" ती उत्तरली. वेटरला जरा आश्चर्यच वाटलं. पण त्याने तिला एक लहानसं टेबल दिलं. दोन माणसांसाठीचं. तसंही restaurant जवळपास रिकामंच होतं. तिने पहिल्यांदा cheese sandwich मागवलं. हातातल्या मोबाईलशी खेळत ती बसली.
आणि अचानक समोर लक्ष गेलं. दार उघडून समीर आत येत होता. समीर? तिने त्याला कितीतरी लांबूनही ओळखलं असतं. केस आता बऱ्यापैकी पिकले होते. वजन मात्र चांगलं maintain केलेलं दिसत होतं. उंचापुरा, नेहमीच उत्तम कपडे घालणारा. आजही पांढरा शर्ट आणि ग्रे पॅंटमध्ये तो स्मार्ट दिसत होता. ती बघतच राहिली त्याच्याकडे. आणि तो सरळ तिच्याकडेच आला. तिच्या समोरच्या रिकाम्या खुर्चीत बसला. तिला कळेना- हे स्वप्न आहे की सत्य?
मग त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं तिचं. तिला पाहून झालेला आनंद स्पष्ट दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर.
मग बोलायला लागले ते एकमेकांशी. त्याच्या कंपनीचं जवळच ऑफिस होतं. तो नुकताच तिथे आला होता transfer घेवून. या restaurant मधे cheese sandwich आणि कॉफी चांगली मिळते हे कळल्यावर पहिल्यांदाच आला होता तो.
त्यानेही cheese sandwich मागवलं आणि इतरही बरंच काही. खाता खाता स्वत:विषयी सांगितलं त्याने. त्याचा आणि उत्तराचा divorce झाला होता. त्यांचा मुलगा त्याच्याकडेच होता. आणि त्याचे आई-वडील. मुलगा खूप हुशार होता त्याचा.
ती बोलता बोलता म्हणाली- "खूप काम होतं ऑफिसमधे. जेवायला canteen मधे जावं तर ते बंद झालेलं. डबा आणायचा असं ठरवलं होतं पण एकटीसाठी काही स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो. अगदी सकाळचा चहा-नाश्तापण एकटीसाठी करायचा कंटाळा येतो. मग कधी रात्री पण असंच काहीतरी पटकन वरण-भाताचा कुकर लावते नाहीतर घरी जाताना काहीतरी विकत घेवून जाते. नाहीतर फोनवरुन मागवते काहीतरी. आणि काम पण इतकं असतं सध्या की घरी जाईपर्यंत दमायलाच होतं."
"वीकेन्डचा काय प्रोग्रॅम असतो तुझा?" तो म्हणाला.
"काही नाही. आता मागचा जो वीकेन्ड गेला- तो मी आरामात झोपून घालवला. शनिवार रविवार म्हणजे उशीरा उठायचं. दुपारी परत झोपायचं. टीव्ही बघायचा- काहीही पिक्चर वगैरे. नाहीतर ऑनलाईन टाईमपास करायचा. आठवडाभर इतकं दमायला होतं की शनिवार-रविवार रिकव्हरीमधेच जातो."
"तुझे आईबाबा-"
"ठीक आहेत आता. थकले आहेत. माझा भाऊ दिल्लीला असतो. त्याची बायको नोकरी करते. त्यांना एक मुलगी आहे. आई-बाबा तिला सांभाळतात. दिल्लीलाच असतात आता."
असंच काहीबाही बोलत त्यांनी खाणं संपवलं. आता तो बिल देईल या धास्तीने ती बाथरुमला जाण्याचं निमित्त सांगून उठली आणि काऊंटरवर बिल देऊन आली. त्याचं काहीच चाललं नाही. पण तिला त्याचे उपकार नको होते अजिबातच.
ऑफिसमधे परत गेल्यावर कामात लक्षच लागेना तिचं. घरी गेल्यावरही त्याचेच विचार डोक्यात. समीर. तिच्या आयुष्यातला एक काळ या माणसाने व्यापलेला होता अख्खाच्या अख्खा. ते एकाच कॉलेजमधे होते. तो टॉल, डार्क, हॅंडसम. अनेक मुली त्याच्या मागे होत्या. पण त्याचं लक्ष मात्र फक्त उत्तराकडेच. ती त्याची गर्लफ्रेन्ड होती. अतिशय सुंदर, लांबसडक केस, टपोऱ्या डोळ्यांच्या उत्तरामागेही कॉलेजमधली बरीच मुलं होती. ती अतिसुंदर असल्याचा तिला खूप गर्व होता व ती शीतलसारख्या सर्वसाधारण मुलींची कधी दखलच घ्यायची नाही. आधीच सुंदर आणि त्यात कॉलेजमधला सर्वात एलिजिबल बॅचलर तिचा प्रियकर- त्यामुळे ती हवेतच तरंगायची जशी. शीतलची आणि समीरची मैत्री योगायोगानेच झाली. एका प्रोजेक्टसाठी ते एकाच ग्रुपमधे होते. तिला खूप आवडायला लागला समीर. कुणालाही आवडण्यासारखा होताच ना तो. देखणा, हजरजबाबी, हसवणारा, जबाबदाऱ्या घेऊन त्या पारही पाडणारा. कायम उत्तम कपडे घालून प्रेझेन्टेबल दिसणारा. मराठी कवितांची आवड असणारा. गाण्याच्या क्लासला वगैरे कधीही न गेलेला असूनही खूप चांगलं गाणारा. अभ्यासातही कायम पुढे. शिवाय सधन घरातला. थोडक्यात एक आयडियल नवरा. पण तो तर आधीच उत्तराने पटकावलेला होता. आणि समीर तर उत्तराशी पूर्ण एकनिष्ठ होता. तिच्या शब्दाबाहेर तो कधी जात नसे. त्यामुळे शीतलच्या मनातल्या भावना तिच्या मनातच राहिल्या. कॉलेजचं शेवटचं सेमिस्टर चालू झालं आणि समीर आणि उत्तरामध्ये दुरावा निर्माण झाल्याची कुजबूज सुरु झाली. ती शीतलच्याही कानावर आली. तिने समीरला त्याबद्दल विचारलंही. उत्तरा आणि आपलं आजकाल पटत नाही हे त्याने मान्य केलं पण त्या विषयावर आणखी काही बोलण्याचं नाकारलं. आणि मग अचानक एक दिवस ध्यानीमनी नसताना समीरने सांगितलं तिला- "उत्तराशी नातं तोडलंय मी. माझं आता तुझ्यावर प्रेम आहे." आणि मग प्रेमकथाच सुरु झाली त्यांची. कॉलेज संपतच आलं होतं. आता जरा एक-दोन वर्षं नोकरी करेल समीर, आणि मग आपलं लग्न- असंच तिला वाटत होतं. समीरवर तिचं गाढ प्रेम होतं. खरोखर तशी त्याला चांगली नोकरी मिळाली. शीतललाही नोकरी मिळाली. एक वर्ष त्यांच्या प्रेमाच्या धुंदीत गेलं आणि मग हळूच जाणवलं- समीर टाळतोय आपल्याला. पूर्वीसारखा प्रेमाने बोलत नाही. त्याच्या आईबाबांशी ओळखही करुन नाही दिली त्याने आपली अजून. लवकरच समीरने सगळ्याचं कारण स्पष्ट केलं- उत्तरा परत आली होती त्याच्या आयुष्यात. आणि तिच्यावरच प्रेम असल्याचा साक्षात्कार झाला होता म्हणे त्याला. "मी तुझ्याशी लग्न केलं आणि उत्तरावरच प्रेम करत राहिलो तर तीन आयुष्यं उध्वस्त होतील शीतल. म्हणून- I am sorry- माफ कर मला- मी काहीच जाणूनबुजून केलं नाहीये-"
शीतलच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता तो. ती प्रतारणा तिला सहनच होत नव्हती. कालपर्यंत ’तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आपण लवकरच लग्न करु या.’ असं म्हणणारा आज सरळ सांगत होता तिला- ’Please move on. झालं-गेलं विसरुन जा.’
खूप भांडली ती समीरशी. उत्तराचाही राग राग आला तिला. समीर आपली चूक कबूल करत होता पण उत्तराशीच लग्न करण्याबाबत तो ठाम होता. त्याने लवकरच लग्न केलं. वर्षभराने मुलगाही झाला त्याला. मित्रमैत्रिणींकडून शीतलला सगळं कळत होतं. समीर आणि उत्तराच्या भांडणानंतर उत्तराला परत मिळवण्यासाठी- तिला असूया वाटावी यासाठी- समीरने शीतलचा वापर केला असावा असं शीतलच्या मैत्रिणींना वाटत होतं. त्यावेळी शीतलला मात्र वाटत होतं- समीरचं आपल्यावर प्रेम आहे. ते आज ना उदया कळेल त्याला. उत्तराला सोडून तो येईल आपल्याकडे. त्या क्षणाची कितीतरी दिवास्वप्नं रंगवली होती तिने. उत्तराचा गर्विष्ठ आणि आळशी, आत्मकेंद्रित स्वभाव पाहता ती चांगला संसार करु शकणार नाही. त्यातून समीर मराठी आणि उत्तरा गुजराती. तिला मराठी भाषा, संस्कृती आवडत नाही. मराठी म्हणजे तिच्यालेखी तुच्छ ’घाटी’. तिला मराठी बोलता येत नाही. शिकण्याची इच्छाही नाही. हे सगळं समीरच्या घरच्यांना खटकणारच. शिवाय समीरचे पैसे शॉपिंगमधे उधळणार उत्तरा. समीर आणि उत्तराचं पटणार नाही. मग समीर माझ्याकडे परत येईल. समीरचा मुलगा राहिला आपल्याबरोबर तरी आपण आपल्या मुलासारखंच सांभाळू त्याला. आणि शिवाय लवकरच आपलं आणि समीरचं मूल या जगात येईल. समीरच्या आईबाबांची आपण खूप सेवा करु. समीरला सुखात ठेवू. वगैरे वगैरे. पण तसं कधीच काहीच घडलं नाही. समीर परत आला नाही. ती कितीतरी वर्षं झुरत राहिली त्याच्यासाठी.
आणि आज इतक्या वर्षांनी समीर भेटला होता.
दोन दिवसांनी- शुक्रवारी- ऑफिसमधून ती बाहेर पडली तर समोर समीर उभा होता. परवा बोलताना तिचं ऑफिस कुठे आहे हे तिने त्याला सांगितलं होतं.
"कॉफी?" तो म्हणाला.
"अं..नको." ती म्हणाली.
"का?" तो आश्चर्याने म्हणाला.
"का म्हणजे काय? कशाला प्यायची मी तुझ्याबरोबर कॉफी?" ती वैतागून म्ह्णाली.
"I am sorry शीतल. तू खूप दुखावली गेली आहेस हे माहीत आहे मला. पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय."
"जे काही बोलायचं असेल ते इथेच बोल समीर. प्लीज. मी कुठेही हॉटेलमधे वगैरे येणार नाही. आणि लवकर बोल. मी घाईत आहे जरा आत्ता." ती हट्टीपणे म्हणाली.
त्याने आजूबाजूला पाहिलं. ते ज्या बसस्टॉपशी उभे होते तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. बऱ्यापैकी एकांत होता.
तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"गेले दोन रात्री मी झोपलो नाहीये शीतल. सारखा तुझा चेहरा डोळयांसमोर येत होता. तुझी आठवण येत होती. काय झालं होतं त्यावेळी मला- मूर्खपणा केला मी उत्तराशी लग्न करुन. तिचं कधीच पटलं नाही माझ्या आईबाबांशी. आणि मग माझेही खटके उडत राहिले. पण संसार मोडायचा तरी कसा? त्यासाठी लागणारं धैर्यही नव्हतं माझ्याकडे. आणि एक दिवस उत्तरानेच डिव्होर्स मागितला. तिच्या एका मित्राशी दुसरं लग्न करायचं होतं तिला. मीही खळखळ न करता लगेच तिला डिव्होर्स दिला. माझा मुलगा मात्र माझ्याकडेच राहिला. त्याला माझ्या आईबाबांचा खूप लळा आहे. त्याच्यासाठीच जगतोय मी आता. परवा तुला पाहिलं- तेव्हा वाटलं की मी तुझ्यावर केलेला अन्याय दूर करण्याची एक संधीच देतोय देव मला. मला लग्न करायचंय तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला हा एकटेपणा दूर करायचाय. मी तुझ्यावर केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करायचंय. तुझ्या रुपाने मला एक चांगली बायको, माझ्या मुलाला चांगली आई आणि माझ्या आईवडिलांना चांगली सून मिळेल. तू म्ह्णशील तेव्हा- अगदी उदयाच- किंवा आजही लग्न करायला तयार आहे मी तुझ्याशी. आणि मी इतकं प्रेम देईन तुला-"
शीतल बघत राहिली त्याच्याकडे. हाच तो क्षण...तिने याच क्षणाची किती वाट बघितली होती- किती स्वप्नं पाहिली होती- तिच्या सगळ्या स्वप्नांत लखलखणारा...तिचं आयुष्यच उजळवून टाकणारा..हाच तो क्षण.

पण आज या क्षणी तिला काहीच वाटत नव्हतं.
"तुझा काहीतरी गैरसमज झालाय समीर." ती थंडपणे म्हणाली.
"म्हणजे सध्या मी एकटी राहते हे खरंय. पण बेसिकली माझा नवरा पंधरा दिवस ऑफिसच्या कामासाठी चेन्नईला गेला होता. आणि सासूसासरे कोकणातल्या आमच्या घरी गेले आहेत. अर्णव- म्हणजे माझा मुलगाही गेलाय त्यांच्याबरोबर. सध्या सुट्टी आहे त्याला शाळेला. मला मात्र ऑफिसमधे खूप काम असल्यामुळे सुट्टी घेता आली नाही आणि इथेच राहावं लागलं. आज माझा नवरा परत येतोय. आणि सोमवारी सासू-सासरे-मुलगाही परत येतील. तुझा गैरसमज झाला- आणि मी वेस्टर्न कपडयांवर मंगळसूत्र वगैरे पण रोजच्या रोज घालतेच असं नाही- त्यामुळे पण कळलं नसेल तुला."
समीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
"ओके..आय गेस...आता बोलण्यासारखं काही उरलं नाहीये- बाय." ती घाईघाईत निघाली. तिने एक रिक्षा थांबवली व रिक्षावाल्याला तिच्या घराचा पत्ता सांगून ती रिक्षात बसली. डोक्यात विचार चालूच होते. त्यावेळी समीरची खूप वाट बघूनही तो परत आला नाही तेव्हा ती एकटी पडली होती. तिच्या मैत्रिणींची भराभरा लग्न ठरली, झाली. समीर प्रकरणानंतर ती पुरती निराश झाली होती. आईबाबांना, दादाला सगळं कळलं होतं आणि त्यांनाही तिची अवस्था बघून तुटत होतं. लग्न करायला ती आता तयारच नव्हती. आईने जबरदस्तीनेच अजिंक्यला भॆटायला लावलं तिला. अजिंक्य समीरपेक्षा कितीतरी जास्त देखणा. शिवाय उच्चशिक्षित, निर्व्यसनी, चांगल्या घरातला. तिच्या बाबांच्या जिवलग मित्राच्या माहितीतलं स्थळ. अजिंक्यने होकार दिल्यावर तिने होकार दयावा ही आई-बाबा, दादा-वहिनी सगळ्यांचीच अपेक्षा. पण होकार दयायच्या ऐवजी तिने अजिंक्यला बाहेर भेटायला बोलावलं आणि समीरबद्दल सांगितलं सगळं. समीरबरोबर शारीरिक मर्यादा तिने कधीच ओलांडली नव्हती पण मनाने मात्र ती समीरची झाली होती. हे सगळं स्पष्टपणे तिने अजिंक्यला सांगितलं. "बरं झालं तू विषय काढलास. मलाही तुला असंच काही सांगायचं होतं. माझीपण होती गर्लफ्रेन्ड कॉलेजमधे. नंतर ब्रेक-अप झाला आमचा. आणि तू इतकं नको मनाला लावून घेवूस. त्यात काही इतकं ॲबनॉर्मल नाहीये." अजिंक्यने सहजपणे घेतलं होतं सगळं. "फक्त आपल्या लग्नानंतर या प्रकरणाचा आपल्यावर कधी काही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायलाच पाहिजेस तू. मीही माझ्याकडून तशी काळजी घेईन." हेही बजावलं होतं त्याने. आणि मग अजिंक्यशी लग्न, तिचं नोकरी सोडून पूर्णवेळ गृहिणी होणं, मोठया कुटुंबातील आदर्श सून होण्याचा प्रयत्न, अजिंक्यला भराभर मिळत गेलेली प्रमोशन्स, त्यात अर्णवचा जन्म, अर्णव एक वर्षाचा झाल्यावर आर्थिक गरज नसतानाही सहज मिळाला म्हणून तिने स्वीकारलेला या कंपनीतला लठ्ठ पगाराचा, मोठया पोस्टचा पण हेक्टिक जॉब..सासूसासऱ्यांनी अर्णवला दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी घेऊन तिच्या करीयरला दिलेला सपोर्ट..भराभरा दिवस उडून गेले होते.

अजिंक्यशी संसार केला होता तिने पण प्रेम? मनातला तो कोपरा समीरनेच व्यापला होता. का नाही प्रेम करत आपण अजिंक्यवर? तो समीरसारखा नाही म्हणून? पण याच अजिंक्यच्या पुरुषी कणखरपणामुळे आपल्याला कायम सेफ वाटतं हे का विसरतो आपण? याच अजिंक्यने आपलं थांबून राहिलेलं जीवन पुन्हा प्रवाही केलं हे का विसरतो आपण? समीरने फक्त उपेक्षा केली आपली आणि अजिंक्यने मात्र आपल्या भूतकाळासकट स्वीकारलं आपल्याला. आज आपलं आयुष्य जे काही आहे ते अजिंक्यमुळे आहे.
तिला आज पहिल्यांदाच अजिंक्यला भेटण्याची ओढ वाटत होती. रिक्षावाल्याला तिने रिक्षा तिच्या घराजवळच्या पार्लरशी घ्यायला सांगितली. हेअर वॉश, ब्लो ड्राय, आय ब्रोज, फेशियल- दीड तासानी ती बाहेर पडली तेव्हा तिला हलकं आणि फ्रेश वाटत होतं. घरी पोचल्यावर तिने आरशात पाहिलं. ती छानच दिसत होती. अजिंक्यच्या आवडत्या काळया रंगाचा एक नवीन टॉप तिच्याकडे पडला होता. तो तिने कधी वापरलाच नव्हता. तिने आज तो घालायचं ठरवलं. गोऱ्या रंगावर खुलून दिसणारा काळा टॉप, फिकट निळी जीन्स, हातात ’असू दे’ म्हणून थंडीसाठी घेतलेलं ग्रे जॅकेट, सेंटचा सुगंधी फवारा. हिऱ्याचं नाजूक लहानसं मंगळसूत्र. हिऱ्याचेच कानातले. हातात नाजूक फिकट लाल गुलाबांचा एक गुच्छ. ती एअरपोर्टवर पोचली. तिला असं फुलंबिलं घेऊन एअरपोर्टवर आलेलं बघून आधी अजिंक्यला धक्काच बसला. त्याने कधीच याआधी न बघितलेल्या काळ्या टॉपमधे ती खास सुंदर वगैरे दिसत होती यामुळे आणखीच धक्का बसला. ती गाडी घेऊन आली होती. एरव्ही अजिंक्य बरोबर असला की ती स्वत: ड्रायव्हिंग करायचा कंटाळा करायची. त्यालाच ड्रायव्हिंग करायला लावायची. त्याला ड्रायव्हिंग आवडायचं त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. आज मात्र ती आपण होऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसली. "मी टेबल बुक केलंय ’चायना स्टार’ मधे." ती गाडी चालू करत म्हणाली. ते अजिंक्यचं आवडतं रेस्टॉरन्ट होतं. "डिनर करु आणि मग घरी जाऊ." ती म्हणाली. अजिंक्य तिच्याकडे बघतच राहिला. हा जो काही बदल झाला होता तिच्यामधे त्याचं कारण त्याला माहीत नव्हतं पण हा चांगला बदल होता हे मात्र नक्की. रेस्टॉरन्टमधे आधीच बुक करुन ठेवलेलं टेबल त्यांची वाटच बघत होतं. त्यांनी ऑर्डर दिल्यावर काही वेळाने वेटर गरमागरम चायनिज जेवण घेऊन आला. आज सगळेच पदार्थ फार छान बनले होते. अजिंक्य एकदम खूश. खाता खाता "हे जेवण किती चांगलं आहे.." ही अजिंक्यशी चर्चा करताना तिला जाणवलं...तिच्या आयुष्यातलं समीर नावाचं मळभ आता कायमचं दूर झालंय आणि अजिंक्य नावाचा सूर्य तिथे स्वच्छ प्रकाश देतोय.

झोपाळा


माझ्या आजोळच्या जुन्या घरातल्या लक्षात राहण्यासारख्या काही गोष्टींपैकी एक म्हणजे तिथला जुना झोपाळा. मी लहान असल्यापासून त्या झोपाळयावर बसायचे. आम्ही भावंडं सुट्टीत एकत्र जमलो की झोपाळयावर यथेच्छ धुडगूस घालायचो. या झोपाळयाचं आकर्षण माझ्या आजोळी येणाऱ्या पाहुण्यांनाही असायचं. लहान मुलं तर झोपाळयाकडे आपसूकच वळायची. मोठया माणसांनाही तिथे बसावसं वाटायचं. एकावेळी तीन माणसं आरामात ऐसपैस बसू शकतात इतका प्रशस्त झोपाळा. माझी आजी त्या झोपाळयाची व्यवस्थित काळजी घेत असे. त्याला तेलपाणी करायला लागायचं..तो स्वच्छ ठेवायला लागायचा. ती ते सगळं नेहमीच करत असे.
माझ्या आईला आठवतंय तेव्हापासून तो झोपाळा घरात आहेच. तिच्यामते तो खूप जुना आहे. तिच्या आई-वडिलांच्या लग्नाआधीपासून, कदाचित तिच्या वडिलांच्या लहानपणापासून तो झोपाळा घरात असावा. किती जुना- तो कधी घेतला- हे सांगू शकेल असं कोणी आता आसपास जिवंत नाही. आमच्या अंदाजाने १९१० ते १९३० या वीस वर्षांत कधीतरी तो घरात आला असावा. कदाचित त्याहूनही जुना असेल. पुराणपुरुषच तो. घरातल्या अनेक घटनांचा साक्षीदार.
तसे झोपाळयाचे उपयोग बरेच होते. लहान मुलांना खेळण्यासाठी उपयोग होतच असे. मोठी माणसे बसण्यासाठी सोफ्याला किंवा खुर्चीला पर्याय म्हणून झोपाळा निवडत. सण-समारंभाला सगळे एकत्र जमले की गप्पा रंगत त्या झोपाळयाच्या साक्षीनेच. बायका धान्य निवडणं वगैरे कामं झोपाळ्यावर बसून करत. वाचन करायलाही ती एक मस्त जागा होती. काहीवेळा झोपाळयावर उशा, लोड, तक्के टाकून अगदी आरामात बसत असू आम्ही.
या झोपाळयावर मी शेवटचं कधी बसले ते मला आठवावंच लागेल. आजी गेल्यानंतर त्या घराशी असणारं घट्ट नातं संपलंच. आता तेथे आजीच्या वारसांपैकी कोणी राहात नाही कारण ज्या वारसांकडे घराची मालकी आहे त्यांनी ते घर रिकामंच ठेवलंय. कधीकधी भाडयाने दिलं जातं. आता कदाचित तिथे redevelopment होईल. एक उंच टॉवर बांधला जाईल. घर पाडलं जाईल. झोपाळा विकला जाईल. झोपाळयाची आणि घराची मालकी याच्याशी माझा काहीच संबंध आता नाही. अर्थात सर्व मालमत्तेच्या वाटण्या अत्यंत शांतपणे व समजूतदारपणे झाल्या होत्या आणि आजीच्या आम्हा सर्व वारसांचे एकमेकांशी आजही अतिशय चांगले संबंध आहेत.

परवा मात्र त्या झोपाळ्याची आठवण झाली. माझा एक भाऊ त्या घरी आवर्जून गेला होता- त्याच्या लहान बाळाला घेऊन. घराच्या मालकीशी या माझ्या भावाचाही काही संबंध आता नाही. पण ज्या घरात आपल्या बालपणातला काही काळ गेला, ज्या घरात आपल्यावर खूप माया करणारी आपली आजी राहात होती, त्या घरात आपल्या मुलाला घेऊन जावंसं त्याला वाटलं. त्या घरात असताना माझ्या गोंडस, निरागस, गोबऱ्या गोबऱ्या गालांच्या भाच्याचे फोटोही त्याने काढले. ते फोटो त्याने मला सहज ईमेल केले. ते फोटो बघताना माझ्या मनात मात्र बरंच काही दाटून आलं. अरे...हा झोपाळा अजून आहे तिथे?
माझ्या आईच्या आजी-आजोबांच्या काळापासूनचं ते घर आणि तो झोपाळा. आज त्यांचा एक खापरपणतू त्या घरात आला होता. त्याच जुन्या झोपाळयावर बसला होता. आयुष्याचं चक्र पुढे चालत राहिलं होतं. माणसांची बेरीज-वजाबाकी या कुटुंबात अनेक दशकं चालूच होती. माणसं त्यांचं जीवन संपलं की वजा होत होती. तरुण पिढीत एकेक लग्न झालं की नवीन सून किंवा जावई आणि मग नवीन बाळं- अशी बेरीजही होत होती. माझी आजी गेली तेव्हा तिच्या काही नातवंडांची लग्नं झाली होती. पण कोणालाच मूल नव्हते किंवा कोणी प्रेग्नंटही नव्हते. आजी आजीच राहिली-पणजी झाली नाही. आणि अलीकडेच माझ्या भावाला मुलगा झाला- आजीचा पहिला पणतू. ऐटीत झोपाळयावर बसलेला. आपण कुठे आहोत, आपल्याला इथे का आणलंय याचा काहीच पत्ता नसलेला. आज जर आजी असती तर हा गोजिरवाणा बाळकृष्ण बघून तिला काय करु आणि काय नको - त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको- असं होऊन गेलं असतं.
आजी गेली म्हणजे नेमकी कुठे गेली? आता ती कुठे असेल? आपल्याला एक खूप गोंडस पणतू झालाय हे आजीला कळलं असेल का? का तिचा आत्मा कधीच या सगळया सांसारिक मोहातून मुक्त झाला असेल? होय- तसंच असेल कारण मुक्तीसाठी जर पुण्य लागत असेल तर माझी आजी नक्कीच खूप पुण्यवान होती. कोणाचं वाईट करणं तर सोडाच, पण कोणाचं वाईट तिनं कधी चिंतलंही नसेल. तिच्या घरच्यांना ती ग्रेट वाटली तर त्यात फारसं नवल नाही. पण तिच्या सहवासात आलेले शेजारी-पाजारी, जवळचे-लांबचे नातेवाईक, स्नेही मंडळी, नोकर-चाकर, मुला-नातवंडांचे मित्रमैत्रिणी- सगळ्यांनाच ती ग्रेट वाटायची- सगळयांनाच तिच्याविषयी आदर आणि आपुलकी वाटायची.
एक विचार मनात येऊन गेला- जेव्हा त्या घराची redevelopment होणार असेल- तेव्हा जर तो झोपाळा कोणाला नको असेल- तर घ्यायचा का आपण? त्याचे पैसेही देऊ आपण. आणि कुठेतरी नक्की फिट करु त्याला. अगदी विकला नको जायला कुठेतरी एखादया अनोळखी कबाडवाल्याकडे. पण दुसरं मन म्हणालं- त्याचा maintenance कोण करत बसणार? कामं थोडी का आहेत आपल्याला? काय-काय करणार आपण? शिवाय तो झोपाळा त्या घरापासून दूर नाही ठीक वाटणार. तो झोपाळा, ते घर, त्यातली ती अशीच सत्तर-ऐंशी वर्षं जुनी कपाटं, भांडी-कुंडी, इतर जुनं फर्निचर - हे सगळं त्या घराबरोबरच संपलेलं बरं. तो जमाना नाहीये आता. आता ती इमोशन्स नकोत आणि हे असं मन भरुन येणंही नकोच.
झोपाळा नाही सांभाळला आजीचा तरी चालेल. पण आजीचे संस्कार, तिच्या values, तिचं न कंटाळता अविरत काम करत राहणं, आल्या-गेल्याचं प्रसन्न चित्ताने आदरातिथ्य करणं, नि:स्वार्थीपणे माणसं जोडणं, घरातल्या देव्हाऱ्याचं पावित्र्य आणि अस्तित्व श्रध्देने जपणं, जिद्दीने एक बायको, सून, बहीण, आई, आजी, सासू, जाऊ, वहिनी या भूमिकांमधली आपली कर्तव्यं चोख पार पाडणं, संसाराच्या व्यापातही वाचन, संगीत, बागकाम, विणकाम हे छंद जोपासणं- हे जरी मी माझ्या अंगी उतरवण्याचा प्रयत्न केला तरी मी आजीची आठवण जपली असं होईल.

Thank You