वसंत श्रीधर फडकेंनी घराचं दार किल्लीने उघडलं, किल्ली परत जाग्यावर ठेवली आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवणाची पिशवी टेबलावर ठेवली. बटाटयाचा रस्सा, गवारची भाजी, चार पोळ्या, भात, फोडणीचे वरण - त्यांनी जिन्नस वेगवेगळ्या भांडयांत काढले. सोबत सायलीच्या आईने दिलेले घरी केलेले आंब्याचे लोणचे आणि वसंत फडकेंनी स्वत: घरी विरजण लावून केलेले दही. त्यांनी पोळी-भाजी केंद्रातून आणलेले जेवण दुपार आणि रात्र दोन्ही वेळी पुरेल इतके होते.
आपले ताट वाढून घेऊन फडके हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले व त्यांनी रिमोट कंट्रोलने टीव्ही लावला. सगळ्या न्यूज चॅनेल्सवर त्याच त्याच बातम्या- राजकारणी भ्रष्टाचार करतायत,घरांचे भाव वाढतायत, बायकांवर आणि लहान मुलामुलींवर बलात्कार होतायत, सुप्रीम कोर्टाने सजा सुनावलेल्या बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट शंभर करोडचा गल्ला जमवतायत, दुष्काळात राज्य होरपळतंय. वसंतरावांनी ताडकन टीव्ही बंद केला. त्यांना जेवण जाईना. तसंही जेवण अजिबात चवदार नव्हतं. विहीणबाईंच्या- सायलीच्या आईच्या हातचं लोणचंच काय ते चांगलं लागत होतं. शेवटी घरचं ते घरचंच.
पण वसंतरावांना घरचं जेवण आता मिळणार नव्हतं. त्यांची पत्नी शालिनी आता या जगात नव्हती. शालिनीच्या आठवणीने आलेला अस्वस्थपणा बोचत असताना त्यांनी कसंबसं जेवण संपवलं, ताट-वाटी घासून ओटयावर उपडी घालून ठेवली, उरलेलं जेवण झाकून फ्रीजमध्ये टाकलं. टेबल पुसलं. इतकं काम शालिनी असताना त्यांना कधीच करावं लागलं नव्हतं.
शालिनी समर्थपणे स्वयंपाकघर सांभाळत असे. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. पुढे शैलेशचं लग्न झालं आणि सायली सून म्हणून घरात आली. शालिनीच्या हाताखाली शिकून तीही टापटिपीने स्वयंपाकघर चालवण्यात तरबेज झाली. शैलेश-सायलीच्या दोन मुलांमुळे घर हसू-खेळू लागलं. पण शालिनीचं अचानक अल्पशा आजाराने भरल्या संसारातून उठून जाणं, नंतर शैलेश-वसंतरावात शुल्लक कारणांमुळे वाढत गेलेला वाद आणि विसंवाद, शैलेशने सरळ मुंबईला नवीन नोकरी स्वीकारणं आणि बायकोपोरांना घेऊन तिकडेच भाडयाने फ्लॅट घेऊन राहाणं- या सगळ्या घटनाक्रमानंतर आता वसंतराव पुण्यातल्या आनंद सोसायटीतल्या घरात एकटेच राहात होते. शैलेश-सायलीशी संपर्क उरला नव्हता. सायलीच्या पुण्यातच राहाणाऱ्या आईबाबांना वसंतरावांबद्दल आपुलकी होती- ते अधूनमधून भेटायला येत तेव्हा फक्त वसंतरावांना मुलानातवंडांची ख्यालीखुशाली कळत असे.
वसंतरावांनी सेवानिवृत्तीच्या आधीच आर्थिक गुंतवणूक उत्तम केली असल्यामुळे त्यांना आर्थिक चिंता नव्हती. त्यांचे खर्चही फार कमी होते. एक पुस्तकांची लायब्ररी सोडली तर त्यांना कसलंही व्यसन नव्हतं.
वसंतरावांना मित्र फारसे नव्हते. नातेवाईकांनी त्यांच्या शैलेशशी झालेल्या भांडणानंतर त्यांच्याशी संबंध कमी करुन शैलेश-सायलीशी मात्र चांगले संबंध ठेवले होते. आनंद सोसायटीतल्या रहिवाश्यांशीही वसंतरावांचा फारसा संबंध नव्हता. त्यांचा बराचसा वेळ पुस्तके-वृत्तपत्रे वाचणं, घरातली कामं करणं, टीव्ही बघणं यातच जात असे.
वसंतराव बेडरुममध्ये झोपायला गेले. जरा डुलकी लागलेली असताना त्यांना अचानक जाग आली. जवळच असलेल्या झोपडपट्टीतली मुलं रस्त्यावर खेळायला आली होती. त्यांचा आरडाओरडा चालू होता. झोप उडाल्यामुळे वसंतराव बाल्कनीत जाऊन उभे राहिले. समोरच्या बिल्डिंगमधल्या एक ऐंशीच्या पुढच्या वयाच्या आजी काकुळतीला येऊन मुलांना विनवत होत्या- "अरे पोरांनो, नका रे आरडाओरडा करु. आजोबांना बरं नाहीये अजिबात. आत्ता कुठे जरा झोप लागली आहे त्यांना. प्लीज ऐका ना जरा." मुलांनी आजींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. वसंतरावांच्या डोक्यात तिडीक गेली. "अरे ए! काय चालवलंय तुम्ही? अजिबात खेळायचं नाही इथे. रस्ता आहे हा- मैदान नाही." त्यांनी वरुन आवाज चढवला. मुलांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. मुलं आपापसात हिंदी बोलत होती. म्हणून मग "यहां पे मत खेलो- आवाज मत करो इतना-" वगैरे हिंदीमधूनही त्यांनी बोलून पाहिलं. पण मुलांनी काही लक्ष दिलं नाही. वसंतराव चडफडत आत आले. वास्तविक जवळच एक सोडून चांगली दोन मैदानं होती. पण ही मुलं गल्लीतच खेळायला येत- खेळण्यापेक्षा किंचाळणं आणि एकमेकांना जोरजोरात शिव्या देणं आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं यात त्यांना जास्त रस होता. मुलांचा दंगा वाढतच होता. चिडलेले वसंतराव स्वयंपाकघरात गेले. शालिनीने जमवलेल्या काचेच्या ग्लासेसचे आणि कपबश्यांचे अनेक सेट्स कपाटात होते. वसंतरावांनी वापरात नसलेल्या, जुन्या कपबश्यांचा एक संच बाहेर काढला. सकाळी नाश्त्यासाठी आणून ठेवलेली अंडीही उचलली. आणून ती अंडी नेम साधून मुलांवर मारली. मुलं कसली- सोळा-सतरा वर्षांचे टीनएजर्स होते ते. या हल्ल्याने ती गोंधळली. त्यांनी हल्ल्याच्या दिशेने वर पाहिलं. संतापाने लालबुंद झालेला गोरापान चेहरा. धगधगते, निखाऱ्यासारखे धुमसते घारेहिरवे डोळे. हातातला काचेचा कप रोखून वसंतराव पुढच्या हल्ल्यासाठी सज्ज उभे होते.
"अबे भाग रे- बुढ्ढा पागल हो गया है!" "चल दुसरी गलीमें जाके खेलते है!" मुलांनी एकमेकांना ओरडून सांगितलं आणि तिथून काढता पाय घेतला.
मुलांची पाठ वळल्यावर वसंतरावांनी कप-बश्या पुन्हा नीट शालिनीच्या कपाटात लावून ठेवल्या. समोरच्या सोसायटीतल्या आजींच्या आजोबांना बरं वाटलं असावं असं त्यांना उगाचच वाटलं आणि त्यामुळे समाधानही वाटलं.
’आनंद’मधले पांढरपेशा रहिवासी आपापल्या घरातून हा प्रकार बघत होते. वसंतराव नामक ’वेडसर’ म्हाताऱ्यामुळे एक चांगला टाईमपास सगळ्यांनाच मिळाला होता.
दिवसेगणिक वसंतरावांचा ’वेडसरपणा’ वाढत चालला होता. पाठीमागच्या गल्लीतली एक हाय-फाय मुलगी तिच्या कुत्र्याला घेऊन रोज ठराविक वेळी वॉकला यायची. आनंदच्या थोडं आधी असणाऱ्या एका फास्ट फूडच्या दुकानाशी तिचे मित्रमैत्रिणी उभे असायचे. त्यांच्याशी थोडावेळ बोलून ती कुत्र्याला घेऊन आनंदच्या गेटसमोर यायची. तो कुत्रा नेमका आनंदच्या गेटसमोर आल्यावर ’शी’ करायचा. मुलगी तशीच कुत्र्यासह पुढे सुरु व्हायची. वसंतरावांच्या हे लक्षात आल्यावर एक दिवस त्या वेळेला ते खालती हजर. मुलगी आणि कुत्रा दिसल्यावर त्यांनी पुढे होऊन तिला बजावले- "रस्ता आणि संडास यात फरक असतो हे कळत नाही का? कुत्र्याला शी स्वत:च्या घरात करायला सांगायची. आमच्या गेटसमोर याने घाण केली तर तुला ती उचलून बरोबर घेऊन जावी लागेल." मुलगी गोंधळून बघू लागली. तिला मराठी कळत नाही हे वसंतरावांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी तोच मजकूर इंग्रजीत सांगितला. मुलीने त्यांच्याकडे तुच्छतेने बघितले. "आप ज्यादा बकवास मत करो अंकल- फालतूमें टाईम वेस्ट मत करो- यहां के कॉर्पोरेटर मेरे पापा के दोस्त है." कुत्र्याने आजही शी केलीच. मुलगी तिथून निघून गेली. वसंतरावांनी शांतपणे सोबत आणलेल्या वर्तमानपत्रात सगळी घाण भरली आणि घरी घेऊन गेले.
मुलगी थोडया वेळाने त्याच रस्त्याने उलटी परत जात असे. तेव्हा वसंतरावांनी वरुन कुत्र्याची घाण त्या मस्तवाल मुलीच्या अंगावर फेकली.
"मेरा कोई नही है इस दुनिया मे- वाईफ मर गयी है. अकेला रहता हू. तुम्हारे कॉर्पोरेटर को बोलो मेरा खून कर देने को- आय डोन्ट केअर!" तिला सरळ आव्हान देऊन वसंतराव बाल्कनीतून हॉलमध्ये येऊन बसले. आनंद सोसायटी थक्क. फास्ट फूडच्या दुकानासमोरचे तिचे मित्रमैत्रिणी तिच्याकडे बघत होते पण किळस वाटून पटकन कोणी तिच्या मदतीलाही येईना. उलट सगळ्यांना हसू आवरत नव्हतं आणि तिच्यापासून आपलं हसू लपवण्याचा सगळ्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरत होता. रस्त्यावरुन येणारे-जाणारे इतर लोकही नेहमीचेच. सगळी पार्श्वभूमी माहीत असलेले. त्यामुळे त्यांनाही तिच्याविषयी सहानुभूती न वाटता घडल्या प्रकाराची गंमत वाटत होती. सगळेजण आपल्याला हसत आहेत आणि आपण अगदीच एकटे पडले आहोत हे लक्षात घेऊन खाली मान घालून ती मुलगी जवळजवळ पळतच आपल्या सोसायटीकडे गेली. दुसऱ्या दिवसापासून ती कुत्रावाली मुलगी पुन्हा आनंदच्या गल्लीत फिरकली नाही.
"वेडसर म्हातारा" आता आनंद सोसायटीसाठी रोजची करमणूक होऊ लागला होता.
आनंदच्याच गल्लीत असलेल्या उमंग कनाकियांच्या बंगल्यात एक दिवस कसलासा समारंभ होता. मोठयामोठया महागडया गाडया घेऊन अतिश्रीमंत पाहुणे समारंभाला आले होते. आनंदच्या दारात लावलेल्या ’नो पार्किंग’ च्या भल्यामोठया पाटीला न जुमानता लोकांनी गाडया तिथेच लावायला सुरुवात केली. पार्किंग शोधण्याचे कष्ट कोण घेणार? आणि इथे फुकट पार्किंग मिळत असताना पे पार्किंगचा खर्च कोण करणार? वसंतरावांनी एकदा वरुन ओरडून सांगून पाहिलं पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. मग मात्र त्यांनी लोकांना गाडया लावण्यास विरोध केला नाही. मात्र अंधार पडल्यावर त्यांनी खाली जाऊन एकूणएक गाडया पंक्चर केल्या.
आनंदच्या तळमजल्यावर राहणाऱ्या तीस वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या समीपने वसंतरावांना हे काम करताना पाहिले होते. गाडया पंक्चर झाल्यात हे कळल्यावर पाहुण्यांपैकी काही जाडजूड इसम समीपच्या दारात येऊन उभे राहिले आणि पंक्चरबद्दल जाब विचारु लागले. "मी आत्ताच घरी आलोय कामावरुन - मला काही माहीत नाही- पण तिथे ’नो पार्किंग’ लिहिले होते- त्यामुळे गाडया लावल्यात कशाला तिथे तुम्ही मुळात?" समीपने वसंतरावांचे नाव न सांगता दार लावून घेतले.
पाहुण्यांचा होत असलेला चडफडाट, त्यांना बसलेला भुर्दंड, ’या निरुपद्रवी मराठी मध्यमवर्गीय एरियात आपलं कोण काय बिघडवणार?’ या समजुतीला घडल्या प्रकारामुळे बसलेला धक्का, बंगल्याचा मालक उमंग कनाकियाचा रागाने फुललेला चेहरा- एकंदरीत हाही एपिसोड आनंदवासीयांसाठी ’रिॲलिटी शो’ हून मोठी करमणूक ठरला.
वसंतराव रोज आता काहीना काही भांडण किंवा कुरापत करतच होते. आत्तापर्यंत ते सोसायटीबाहेरच्या लोकांशी भांडण करत होते. पण मग एक दिवस त्यांची वक्रदृष्टी आनंदवरच वळली. दुसऱ्या मजल्यावरचे देवधर कुटुंबिय एक दिवस नळ तसाच चालू ठेवून घराबाहेर गेले होते. अश्या वेळी आनंदच्या टाकीमधला पाण्याचा आधीच कमी असलेला साठा संपून जायचा आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणाकडेच पाणी नसायचे. वसंतरावांनी स्वखर्चाने प्लंबर बोलवून देवधरांच्या घरात जाणारी पाण्याची लाईनच नादुरुस्त केली. हे सगळं होईपर्यंत देवधर घरी आले आणि वसंतरावांना जाब विचारु लागले. "आपल्या राज्यात लोकांना प्यायला पाणी नाहीये, आणि तुम्ही नळ तसाच चालू ठेवून सरळ निघून जाता? ही मस्ती? पाण्यावाचून तडफडा एक दिवस म्हणजे कळेल." वसंतराव तिथून निघून गेले. देवधरांनी दुसरा प्लंबर शोधून आणला आणि स्वत:चा पाणी पुरवठा पूर्ववत केला. त्यात त्यांचा बराच वेळ, श्रम आणि पैसाही खर्च झाला. आनंदवासीय तेव्हापासून घराबाहेर पडण्याआधी आपापल्या घरातले नळ मात्र आवर्जून तपासू लागले. उगाच वेडसर म्हाताऱ्याच्या तावडीत सापडण्याची कोणाची इच्छा नव्हती.
देवधर मात्र चिडले होते. हा वेडसर माणूस नको त्या उचापती करतो, बाहेरच्या लोकांशी भांडणे करतो त्याचा सोसायटीतल्या लोकांना त्रास होईल, झोपडीपट्टीतले उदयोन्मुख दादा-लोक, परिसरातले राजकारण्यांशी साटेलोटे असलेले श्रीमंत बंगलेवाले लोक- या सगळ्यांशीच हा वेडा पंगे घेतोय- हे सोसायटीसाठी चांगलं नाहीये- असं ते इतर आनंदवासीयांना सांगू लागले. वसंतरावांविरुध्द पोलिस तक्रार करावी, किंवा शैलेशशी संपर्क साधून ’त्यांना एकटं सोडणं धोकादायक आहे- त्यांना इथून ने’ असं त्याला निक्षून सांगावं- असं पिल्लू देवधरांनी सोडलं.
मात्र हे सगळं चालू असतानाच तिकडे मुंबईला सायली खूप अस्वस्थ होती. वसंतराव आणि शैलेशमधला दुरावा तिला बघवत नव्हता. मुळात तिला वसंतरावांविषयी खूप आदर आणि आपुलकी होती. तिचं आणि शैलेशचं लग्न रीतसर वधूवरसूचक मंडळातून स्थळ बघून ठरलं. लग्नात वसंतरावांनी कसलाही हुंडा, मानपान, देणीघेणी असल्या मागण्या केल्या नाहीत. ’आम्ही मुलाकडचे’ म्हणून तोरा स्वत: दाखवला तर नाहीच,पण इतर कोणाला दाखवूही दिला नाही. तिचे बाबा नको-नको म्हणत असतानाही लग्नाचा अर्धा खर्च वसंतरावांनी हट्टानी केला. लग्नानंतरही पित्याच्या मायेनेच ते सायलीशी वागत आले होते. शैलेश तर एकुलता एक मुलगा म्हणून त्यांचा खूपच लाडका होता. पण शुल्लक भांडणामुळे बाप आणि मुलगा डोक्यात राख घालून दोन दिशांना तोंडं करुन बसले होते.
तिची मुलं निरागसपणे आजोबांची आठवण काढायची. शैलेश बोलत नसला तरी त्याला होत असलेला त्रास सायलीला कळत होता. आधी आई अचानक गेली आणि आता वडील असून नसल्यासारखे. सायलीला तिच्या सासूची कमी प्रकर्षाने जाणवत होती. आज आई असत्या तर बाप-मुलगा असे दुरावले नसते- आईंनी असं घडूनच दिलं नसतं. पण आता त्या नाहीत तर सायलीलाच काहीतरी करुन दोघांना एकत्र आणायला हवं.
तिने हळूहळू शैलेशला समजावायला सुरुवात केली. झालं ते झालं, शेवटी ते तुझे बाबा आहेत, निदान आईंच्या आत्म्याला क्लेश होऊ नयेत, वगैरे वगैरे. त्यातच तिला एक पार्ट-टाईम नोकरीची चांगली संधी चालून आली. मुलं आता तशी मोठी होती, शाळॆत जात होती पण सायली नोकरीवर गेल्यावर मुलांवर लक्ष ठेवायला घरात कोणीतरी वडिलधारं असतं तर बरं झालं असतं. जर वसंतराव मुंबईला आले, तर प्रश्नच मिटेल. मुलांनाही आजोबांचा लळा होताच. तिने शैलेशला हे सगळं समजावलं. सायलीला घराबाहेर पडता यावं, तिला स्वत:ची वेगळी ओळख असावी- अशी शैलेशचीही मनापासून इच्छा होती. अखेर शैलेश तयार झाला.
एक दिवस शैलेश, सायली आणि सायलीचे बाबा वसंतरावांच्या घरी आले. सायलीच्या बाबांनी मुत्सद्दी मध्यस्थाची भूमिका चोख पार पाडली. अखेर बापलेकात समेट झाला. नातवंडांच्या ओढीने वसंतराव मुंबईला यायला तयार झाले. चौथ्या दिवशी सामान बांधून वसंतराव मुंबईला रवाना झाले. शैलेशचा आलिशान प्रशस्त फ्लॅट अगरवाल टॉवरच्या सोळाव्या मजल्यावर होता. दोन-चार वॉचमन सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायचे. इथे वसंतरावांना भांडण करण्यात तसा काही स्कोप नव्हता.
तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये एक बेडरुम वसंतरावांना देण्यात आली. आता त्यांना घरचं उत्तम जेवण मिळू लागलं. शैलेश-सायली त्यांचा मान ठेवून वागत, काळजी घेत. सिनेमाला, मॉलमध्ये शॉपिंगला, बाहेर जेवायला जाताना आग्रहाने सोबत घेऊन जात. आता वसंतरावांचा वेळ नातवंडांना सांभाळण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात जाऊ लागला. शिवाय घरातली आणि बाहेरची काही लहानसहान कामं त्यांनी आपण होऊन स्वत:वर घेतली होती. शक्य तितकी मदत मुलासुनेला करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी अभ्यास घ्यायला सुरुवात केल्यानंतर झालेल्या युनिट टेस्टमध्ये दोन्ही मुलांचे मार्क्स वाढले होते. एकंदरीत वसंतराव शैलेशकडे मजेत होते.
आनंद सोसायटीत सुरुवातीला लोकांना वाटलं की देवधरांनी खरंच वसंतरावांना घालवलं की काय? पण काही बायकांना सायली त्या दिवशी भेटली होती आणि सायली नोकरी करणार असल्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी वसंतराव मुंबईला जात असल्याचं तिने घाईघाईत सांगितलं होतं. त्यामुळे खरं कारण लोकांना कळलं. ’नातवंडांच्या निमित्ताने का होईना, वेडयाची ब्याद गेली एकदाची’ म्हणून लोकांनी आनंद व्यक्त केला. वसंतरावांचे आनंदमधले उपद्व्याप मात्र शैलेश-सायलीला अजिबात कळलेले नव्हते.
लवकरच आनंद सोसायटीचं जीवन मूळपदावर आलं. झोपडपट्टीतली पोरं येऊन दुपारी यथेच्छ दंगा करु लागली, ’नो पार्किंग’ ला न जुमानता गाडया दिवसदिवस उभ्या राहू लागल्या. पाण्याचा गैरवापर आणि त्यामुळे तुटवडा वाढला. आनंदसमोरचा रस्ता अस्वच्छ राहू लागला.
समीप ऑफिसात रात्रपाळी करुन घरी आला. त्याला असह्य झोप आली होती. एसी लावून त्याने बेडरुममध्ये ताणून दिली. पण पोरांच्या आरडाओरडयामुळे तो जागा झाला. वसंतरावांसारखं वागणं त्याला जमणारं नव्हतं. आता आपल्याला झोप येत असूनही झोपणं शक्य नाहीये हे स्वत:शी स्वीकारुन त्याने एचबीओवर चित्रपट लावला. त्याचवेळी आपण वसंतरावांना मिस करतोय हे त्याने मनाशी कबूल केलं.
आनंदमधल्या इतर रहिवाश्यांची तीच परिस्थिती होती. वसंतराव तिथे असताना कोणीही त्यांना कधीही साथ दिली नव्हती. वसंतराव बनण्याची तर कोणाचीच इच्छा नव्हती. पण वसंतराव आयते मिळाले तर आनंद सोसायटीला आता हवे होते. देवधरांनासुध्दा.
ase Vasantrao saglikadech astat aani ya Vasantrao pramane te hi lokana nakosech hotat. pan te nasalyavar asha Vasantrao chi kimmat tyana kalate.
ReplyDeleteस्वताला सुसंस्कृत आणि sophisticated म्हणवणाऱ्या लोकांचाच हा समाज आहे .
ReplyDeleteइथे वसंतरावांची गरज आहे पण स्वतः तसे बनण्याची हिम्मत नाही . बाकी कथा उत्तम आहे.
... शिवचंद्र
कथा आवडली...
ReplyDeleteLike the story and the reality of it too.
ReplyDeleteधन्यवाद :)
ReplyDelete