Wednesday, January 16, 2013

परंपरा


श्रेया आणि रोहनचं लग्न ठरलं तेव्हा तिच्या आईबाबांना आनंद तर झालाच पण दडपणही तितकंच आलं. एकतर प्रेमविवाह. रोहनसारखा शिकलेला, स्मार्ट, हुशार (शिवाय जातीतला) जावई मिळाला-तोसुध्दा आपल्याला वरसंशोधनाचे कष्ट न पडता- याचा आनंद. आणि आपली हट्टी, लाडावलेली, इंग्रजाळलेली मुलगी सासरी जाऊन काय दिवे लावणार याचं दडपण.

पण श्रेया त्याबाबतीत नशिबवान. रोहनचे आईबाबा भलतेच प्रेमळ आणि सहनशील निघाले. त्यात त्यांना मुलगी नसल्यामुळे श्रेयालाच त्यांनी आपली मुलगी मानलं. वंदनाताईंनी तर श्रेयाच्या आईला साखरपुडयाच्या वेळीच सांगून टाकलं- "तुम्ही काही काळजी नका करु हो. मला मुलीची फार हौस होती. आता हीच आमची मुलगी."

थाटामाटात पारंपारिक मराठी पध्दतीने लग्न झालं. परदेशात मधुचंद्र झाला आणि श्रेया-रोहन दोघेही आपापल्या नोकऱ्यांमध्ये गुंग झाले. रोहनचे बाबा नुकतेच रिटायर झाले असले तरी त्यांना त्यांचं सोशलवर्क वगैरे असायचं. वंदनाताईंची नोकरी अजून चालू होती. श्रेयाचं लहान वयात मोठया जबाबदारीची नोकरी करणं, जमेल तेव्हा हौसेनी घरात इटालियन, चायनीज, पंजाबी वगैरे पदार्थ बनवणं, रोहनच्या सगळ्या नातेवाईकांशी आपलेपणाने वागणं- याचं रोहनच्या आईबाबांना भरपूर कौतुक होतं. एकंदरीत सासू-सुनेची भांडणं वगैरे न होता सगळे मजेत एकत्र राहात होते.

पावसाळा सुरु झाला आणि श्रावणाचे वेध लागले. रोहनच्या नात्यातल्या वडिलधाऱ्या बायकांनी आणि रोहनच्या आईने मिळून श्रेयाच्या पहिल्या मंगळागौरीचे प्लॅनिंग सुरु केले.
जसजशी प्लॅनिंगची स्केल वाढत गेली तशी श्रेया धास्तावली. तिला हे काहीही नको असायचं. "मंगळागौर- काय कटकट आहे- कशाला एकेक ड्रामा?" असं श्रेयाने स्वत:च्या आईकडे म्हणून पाहिलं. पण आईने तिला लग्नाच्या वेळीच बजावलं होतं की सासरी मोठया माणसांचं ऐकायचं, जास्त अक्कल पाजळायची नाही- त्याचीच तिने श्रेयाला परत आठवण करुन दिली.

अखेर श्रेयाच्या मनाविरुध्द मंगळागौरीचा मोठ्ठा घाट घातला गेला. नात्यागोत्यातल्या, अगदी जवळच्या म्हटलं तरी पन्नाससाठ बायकांना आमंत्रण गेलं. पुरणपोळ्यांची ऑर्डर गेली. बाकीचा मेन्यू ठरवला गेला. वशेळया गोळा केल्या गेल्या. पूजेसाठी भटजींना बोलावणे गेले.  श्रेयाने ऑफिसातून सुट्टी काढली. रात्री जागरण करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. कारण एकतर तिला मंगळागौरीचे खेळ अजिबात खेळता येत नव्हते आणि रात्री जागरण केल्यावर मग दुसऱ्या दिवशीही रजा घ्यावी लागली असती, जे शक्य नव्हतं. शिवाय मंगळागौर जागवायला तिच्या कोणी मैत्रिणी किंवा बहिणीही येऊ शकल्या नसत्या. जो तो आपापल्या व्यापात बिझी. यावर रोहनच्या मावशीकडे तोडगा तयारच होता- "आपण मंगळागौर खेळणाऱ्या बायकांचा ग्रुप बोलवू या. त्या पैसे घेऊन कार्यक्रम करतात. मात्र त्यांना आधीच ’बुक’ करावं लागेल हं."
अनोळखी बायका आपल्या घरी येऊन आपल्यासोबत मंगळागौर खेळणार हे श्रेयाला पचनी पडण्यासारखे नव्हते. तिने त्या कल्पनेला विरोध केला.
"ते खेळबिळ नको हं. एकतर दिवसभराच्या फंक्शननंतर दमायला होईल खूप." तिने कुरकुर केली. "हो तेही आहेच. राहू दे मग जागरण." वंदनाताईंनी तिचं म्हणणं उचलून धरलं.

श्रेयाने मंगळागौरीला नऊवारी साडी नेसावी हे तिच्या सासूबाईंनी ठरवलं. "अहो आई कशाला उगाच? नऊवारी साडी मला नेसता येणार आहे का? कोण नेसवणार मला? तुम्ही?" श्रेयाचा आवाज अधिकाधिक त्रासिक होत गेलेला.
 "अगं तीच तर गंमत आहे!" वंदनाताईंच्या चेहऱ्यावर हसू. "तू शिवलेली नऊवारी नेसणार आहेस. माझ्या ओळखीच्या एक बाई शिवून देतात."
मग साडी खरेदी झाली. ती जरीकाठाची महागाची साडी शिवण्यासाठी फाडली जाणार हे श्रेयाला आवडलं नव्हतं पण आता सगळं थांबवण्याच्या पलीकडे कधीच गेलं होतं. तिची मोजमापं घेऊन साडी शिवण्यात आली. ब्लाऊज शिवायलाही टाकला. सासूबाईंनी आणि आईने तिच्यासाठी नवीन दागिने करुन घेतले. त्या दोघींकडून मंगळागौरीच्या गिफ्ट्स म्हणून. "मजा आहे बुवा तुझी- नवीन अंगठी काय- कानातले काय!" रोहन तिला चिडवत म्हणाला.
"सोन्याचे दागिने- It makes sense...investment पण होते ना ती." ती स्वत:लाच स्पष्टीकरण देत म्हणाली.

मंगळागौरीचा दिवस उजाडला. नेमकं आदल्या दिवशी श्रेयाला ऑफिसात तातडीचं काम आलं होतं. तिचा खाष्ट बॉस मागे लागला की उदया सुट्टी रद्द कर आणि ऑफिसला ये.  मंगळागौरीच्या दिवशीची रजा रद्द करणं शक्य नसल्यामुळे तिने कसंबसं बॉसला समजावलं होतं की ती रात्री जागून घरुन काम पूर्ण करुन देईल. काम होऊन तिने शेवटची ईमेल पाठवली तोपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेले होते. त्यात सकाळी लवकर उठून नऊवारी नेसून तयार व्हायला लागलं होतं. पूजा चालू असताना श्रेयाला प्रचंड झोप येत होती. नाकातली नथ टोचत होती. यांत्रिकपणे ती पूजाविधी करत होती. तिच्यासोबत असलेल्या वशेळ्या मुलींशी तिची फारशी ओळख नव्हती. त्यांच्याशी थोडंफार औपचारिकपणे बोलून जांभया आवरत तिने पूजा नेटाने चालू ठेवली. रोहननेही आज रजा टाकली होती. तो कॅमेऱ्यातून तिचे फोटो काढण्यात मग्न होता. तो हळूच तिच्या मागे येऊन उभा राहिला. "अगं ए- फोटो काढतोय मी. जरा चेहऱ्यावर हसू ठेव ना. जांभया देऊ नको. जरा चांगले फोटो येऊ देत की- हॉट दिसते आहेस तू नऊवारीत." त्याचं शेवटचं वाक्य भटजीबुवांनी तर ऐकलं नाही ना, असं वाटून तिने घाबरुन भटजींकडे बघितलं तर ते आपले एकाग्रतेने त्यांच्या मोबाईलवर बोलत होते.
नातेवाईकांनी घर भरुन गेलं होतं. तिच्या सासूबाई, आई स्वयंपाकघरात कामात होत्या. तिचे सासरे आणि बाबा पूजेच्या सामानाची तयारी पूर्ण करुन आता चहा घेत गप्पा मारत बसले होते. जेवायला पुरणपोळी, मसालेभात, उकडलेल्या बटाटयाची भाजी असा अस्सल मराठी बेत होता. त्यात काही बायकांचा उपास होता. श्रेया कधीच उपास करत नसे. उपास केला की तिला कसंतरीच व्हायचं. त्यामुळे तिने व्यवस्थित जेवून घेतलं.
दुपारची जेवणं झाल्यावर मंडळी लगेच संध्याकाळच्या तयारीला लागली कारण संध्याकाळी खूप बायका येणार होत्या. संध्याकाळी नऊवारीच्या ऐवजी श्रेयाने आणखी एक काठपदराची भारीतली साडी नेसली. एकीकडे नजर घडयाळाकडे होती- की कधी हा सगळा प्रकार आवरतोय. घरभर माणसंच माणसं, कोणाच्या गप्पा चालल्यायत, एकीकडे स्वयंपाकघरातून खाण्याच्या प्लेट्स भरभरुन बाहेर आणल्या जातायत, कोणी श्रेयाच्या साडीचं, दागिन्यांचं कौतुक करतंय- श्रेया प्रचंड थकून गेली होती. सगळी पाहुणेमंडळी परतली. अंदाजापेक्षा जास्त माणसं आल्यामुळे म्हणे खाण्याच्या ऑर्डरचा अंदाज चुकला. पाहुण्यांपैकी कोणाला काही कमी पडलं नाही पण घरच्यांसाठी फारसं काही खायला उरलं नव्हतं. रोहनने लगेच फोन करुन हॉटेलातून जेवण मागवलं. श्रेया इतकी दमली होती की थोडंसं काहीतरी पोटात ढकलून ती झोपून गेली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात दुपारी ’टी ब्रेक’ घेताना तिने मनात कालच्या समारंभाचा आढावा घेतला- कोणासाठी केला गेला कालचा समारंभ? तिच्यासाठी? तिला तर काही रसच नव्हता. सासूबाईंचीच हौस सगळी. त्यांची हौस पुरविण्यासाठी इच्छा नसतानाही तिला या सगळ्यात भाग घ्यावा लागला होता.

त्यानंतर काही दिवसांनी ती आईकडे राहायला गेली होती. मंगळागौरीचा विषय निघालाच. श्रेयाच्या कपाळावर लगेच आठया.
"तुला माहित्ये ना आई- मला असल्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसतो. मला खरं तर लग्नही रजिस्टर करायचं होतं. पण रोहनच्या घरच्यांना हिंदू पध्दतीचं साग्रसंगीत लग्न हवं होतं म्हणून मी तयार झाले. वाटलं होतं- हे सगळं लग्नापुरतंच मर्यादित असेल. पण कसलं काय!"
"अगं पण- या सगळ्या परंपरांमध्ये- रिच्युअल्समध्ये- खूप मोठा अर्थ सामावलेला असतो." आई म्हणाली. श्रेयाने तिच्याकडे रागानेच पाहिलं. पण आई आता तिला ऐकवायला सज्जच झाली होती.
"पूर्वीच्या काळी -अगं -बायकांना घराबाहेरही पडायला मिळत नसे. तुम्हाला आजकालच्या मुलींना काय कळणार ते सगळं? इतके हाल व्हायचे बायकांचे पूर्वी. मग या मंगळागौरीच्या निमित्ताने त्या घराबाहेर पडत. मंगळागौरीचे खेळ खेळण्याच्या निमित्ताने जरा मजा करत. ओळखी होत. शिवाय- ती मंगळागौरीला वेगवेगळ्या प्रकारची पानं-पत्री गोळा करतात-"
"ह्ह्म....ते रोहनच्या मामीने आणलं होतं सगळं-"
"तर त्यामुळे त्या मुली निसर्गाच्या सहवासात जाऊ शकत. त्यांना माहिती होत असे त्या पत्रींची- त्यांचे औषधी उपयोग वगैरे-"
"मॉम कम ऑन! हे सगळं त्या काळी ठीक होतं. पण आता मला काय उपयोग याचा. मी रोजच घराबाहेर पडते. माझे फ्रेन्ड्स तर फेसबुकवरच जास्त भेटतात मला. मला नेटवर्किंगसाठी मंगळागौरीची गरज नाहीये. किंवा मला ते मंगळागौरीचे गेम्स खेळायची पण गरज नाहीये. मी जिममध्ये जाते स्वत:ला फिट ठेवायला. आणि ॲज फार ॲज पत्री इज कन्सर्न्ड, मी ते सगळं स्कूलमध्ये बॉटनीमध्ये शिकले आहे ऑलरेडी. तुला माहितेय ना- स्कूलमध्ये मी प्रोजेक्ट पण केला होता - प्लान्ट्सच्या उपयोगांबद्दल."
श्रेयाच्या बोलण्यापुढे आईने शरणागती पत्करली.
"हे बघ- ते काहीही असलं तरी रोहनच्या आईचं मन राखण्यासाठी म्हणून तू मंगळागौर करण्यात काही बिघडलं नाहीये. जरा दुसऱ्याचा विचार करावा की." आईने तिला सुनावलं.
श्रेयाने रागारागात मान हलवली. "मला भूक लागलीय. आणि मला चहा हवाय." ती आईला म्हणाली.
"चहाबरोबर टोस्ट खाणारेस ना तू?" आईने स्वयंपाकघरात जाता जाता विचारलं.
"हो. बटर लाव पण भरपूर. कंजूषपणा नको करुस नेहमीसारखा." आईच्या हातचा आयता चहा-नाश्ता मिळणार असल्याच्या आनंदात श्रेया मंगळागौरीचा विषय विसरली.

असेच दिवस जात राहिले. श्रेया आता सासरी रुळली होती. दिवाळसण तिच्या आईबाबांनी दणक्यात साजरा केला. मग लगेचच आलेला लग्नाचा वाढदिवस मात्र श्रेया-रोहनच्या पध्दतीने- म्हणजे केक कापून आणि हॉटेलात सामिष आहाराची पार्टी करुन साजरा झाला.
आणि मग एकदा रविवार दुपारचा चहा चालू असताना संक्रांतीचा सण करण्याची चर्चा सुरु झाली.
"आता कसला सण? लग्नाला एक वर्षं झालंय आता." श्रेया धास्तावून म्हणाली.
"तुमच्या लग्नानंतर संक्रांतीचा सण पहिलाच आला होता. पहिलाच सण काळा नसतो करायचा. म्हणून केला नाही. आता यावर्षी करायचा. हलव्याचे दागिने, संक्रांतीचं हळदीकुंकू-" वंदनाताई शांतपणे म्हणाल्या.
"हलव्याचे दागिने घालून काय कार्टून दिसशील तू श्रेया-" रोहनला हसू कोसळलं.
श्रेयाने त्याच्याकडे रागारागाने पाहिलं.
"रोहन!" त्याच्या बाबांनी त्याला दटावलं. पण तो कसला ऐकतोय. "अहो बाबा, चांगली आयडिया आहे की नाही- मी हिचे हलव्याचे दागिने घातलेले फोटो फेसबुकवर अपलोड करतो."
श्रेयाच्या रागाचा पारा आता चढला होता. तिचा नवरा आता सरळसरळ धमक्या देत होता- ते सुध्दा त्याच्या आईबाबांच्या समोर.
"याला नसतात का दयायचे हलव्याचे दागिने?" श्रेयाने वंदनाताईंना विचारलं.
"अं हो. म्हणजे तसा तो बायकांचाच सण असतो पण काही काही लोक जावयाला हार घालतात हलव्याचा." वंदनाताई म्हणाल्या.
"गुड. मी सांगते माझ्या आईला- मोठ्ठा हार घेऊन ये ह्याला घालायला म्हणून. ॲन्ड देन स्ट्रेट टू एफबी इट गोज-" श्रेयाला स्फुरण चढलं.
"ए गप- मी नाही घालणार हार-बिर - मी आधीच सांगून ठेवतोय हं आई- जे काय करायचं ते श्रेया आणि तुझं बायका-बायकांचं चालू दे- मी सरळ ऑफिसला निघून जाईन. आणि मी हलव्याचे दागिने तर अजिबात घालणार नाही." रोहनचा आवाज चढला.
"हो कळलं रे. उगाच आरडाओरडा कशाला करतोय?" आईने रोहनला झापलं.

त्यावेळपुरता तो विषय संपला असला तरी सासूबाईंचं आणि रोहनच्या मावशी-मामी-आत्या कंपनीचं बोलणं श्रेयाच्या कानावर पडतच होतं. श्रेयासाठी काळी साडी कुठून घ्यायची, कोणाकोणाला बोलवायचं, तिळाचे लाडू आणायचे की वडया, गुळाच्या पोळ्या कुठे ऑर्डर करायच्या, हलव्याचे दागिने विकत आणायचे का घरी करायचे वगैरे. श्रेयाने आता मनाशी काहीएक निश्चय केला होता.
एक दिवस ती आणि वंदनाताई दोघीच घरात होत्या. श्रेयाने दोघींसाठी चहा करुन आणला. आणि मग हळूच विषय काढला.
"आई, मला ना ते संक्रांत सण वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नाहीये हो. मला ते हलव्याचे दागिने घालून फोटो-बिटो काढणं आवडत नाही. म्हणजे लहान मुलांना घालतात ते ठीक आहे. क्यूट दिसतात बेबीज वगैरे त्यात. बट इट इज नॉट फॉर मी. म्हणजे मला दागिन्यांची हौस आहे हे खरं- पण ते गोन्ड, डायमंड वगैरे. ती investment पण होते ना. हलव्याच्या दागिन्यांत मला इंटरेस्ट नाहीये. आपण हे नाही केलं तर नाही का चालणार? एकतर ऑफिसातही खूप काम आहे मला सध्या."
वंदनाताई बघतच राहिल्या तिच्याकडे.
"अगं पण अचानक काय झालं तुला? मंगळागौरीच्या वेळी तर किती हौसेने तू-"
"हौस? तेव्हापण मला काही हौस वगैरे नव्हती. पण तुमचं मन कसं मोडायचं म्हणून- I just went with the whole thing - you know-"
वंदनाताईंचा चेहरा एकदम विचारात पडल्यासारखा झाला. त्या आता चिडणार की काय, टीव्हीवरच्या त्या स्टुपिड सास-बहु सोपमधल्या मदर-इन-लॉसारख्या तर त्या वागणार नाहीत ना, असा श्रेयाला प्रश्न पडला.
पण मग त्यांचा चेहरा निवळला, एकदम रिलॅक्स झाल्या त्या. कसलंतरी ओझं उतरल्यासारख्या. आणि प्रेमाने तिच्याकडे बघून हसल्या. श्रेयाला हायसं वाटलं.
"तुला खरं सांगू का श्रेया, अगं मला पण अजिबात हौस नाहीये या सगळ्याची. मी इतकी शिकले, नोकरी करायला लागले. माझे विचार पुरोगामीच झाले होते त्यामुळे. रोहनचे बाबाही आपली मतं दुसऱ्यावर लादणारे अजिबात नाहीत. पण लग्नानंतर कसं झालं- माझे आईवडिल तसे सामान्य परिस्थितीतले. मध्यमवर्गीय, खाऊन-पिऊन सुखी. साधी राहणी, उच्च विचारसरणी असे. आणि रोहनचे बाबा मात्र आमच्या तुलनेत श्रीमंतच. मग काय- माझ्या सासूबाईंना अगदी थाटामाटात माझे सगळे सण साजरे करायचे होते. मंगळागौर काय, संक्रांत काय- अगदी एखादया लग्नाबिग्नासारखे त्यांनी माझे सण साजरे केले. मला काही फारशी हौस नव्हती. पण मीही त्यांचं मन मोडलं नाही. आमच्या काळात अशी पध्दत नव्हतीच- सासूसासऱ्यांसमोर तोंड उघडण्याचीच हिंमत नसायची आमची. त्यात मी म्हणजे गरिबाघरची मुलगी करुन आणलेली. त्यामुळे मला हे सगळं मिळतंय, माझं असं कौतुक होतंय यातच मला धन्य धन्य वाटायला हवं अशीच सगळ्यांची अपेक्षा. खूप वर्षं झाली आता त्या सगळ्याला. आता तुमचं लग्न झालं तेव्हा मला वाटलं की तुला सगळे सण साजरे करण्याची हौस, आवड असेल. शिवाय माझ्या सासूने माझे सण केले म्हणजे मी तुझे सण तशाच थाटामाटात साजरे करणं हे माझं कर्तव्यच वाटलं मला."

श्रेया थक्क होऊन बघतच राहिली. "म्हणजे आपल्याला दोघींनाही फारशी हौस नाहीये म्हणायची! Awesome. मग आता आपण हा काही घाट घालायलाच नको." तिने लगेच उत्साहात सूतोवाच केले.
"तसं नाही श्रेया. आता ऑलरेडी मावशी, मामी, आत्या, तुझी आई, तुझी मावशी- सगळ्या जणी उत्साहाने तयारीला लागलायत तुझ्या संक्रांत सणाच्या. आपण आता त्यांचं मन मोडायला नको. यावेळी हे फंक्शन होऊन जाऊ दे. मग पुढल्या वेळपासून आपण दोघी ठरवून आपल्या पध्दतीने प्लॅन करु सगळं."
"म्हणजे- एखादया अनाथाश्रमात भेट देणं, साधेपणानी सेलिब्रेशन करणं, जर लोकांना जेवायला बोलावायचं असेल तर घरी घाट न घालता चांगल्याशा हॉटेलात पार्टी देणं, आपल्याला मनापासून करावीशी वाटेल तेव्हाच पूजा करणं- असं?" श्रेयाने विचारलं.
"होय. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी ते सेलिब्रेशन असेल, त्या व्यक्तीला जसं हवं असेल तसं." सासूबाईंनी मान डोलावली.
"ओके डन. पण यावेळी मीही येणार तुमच्या बरोबर काळी साडी विकत घ्यायला." श्रेयाने जोरदार अनुमोदन दिलं.
"अगं ये की. तुलाच एरवी वेळ नसतो आणि इंटरेस्ट नसतो म्हणून आम्ही बोलावत नाही तुला शॉपिंगला." सासूबाई उत्साहाने म्हणाल्या.
चहाचा घोट घेताना श्रेयाच्या मनात समाधान भरुन आलं होतं.

6 comments:

  1. अशी परस्पर सामंजस्याची कथा वाचून बरं वाटलं. असा संवाद असणारी काही कुटुंबं पाहण्यात आहेत - त्यांची आठवण आली.

    ReplyDelete
  2. गेल्या वीस वर्षांपासून वाढत असलेल्या, कालानुरुप बदलांची आवश्यकता प्रतिपादित करणा-या विचारांचे ही कथा प्रतिनिधित्व करते. परंपरेपेक्षा सामाजिक बदल महत्त्वाचे, असा विचार झिरपत चालला आहे. वशेळ्या हा शब्द खूप दिवसांनी वाचला.
    लिहीत रहा. कथा या साहित्य प्रकारात शक्यता ब-याच असतात. फ्लॅशबँक हा अनेकांचा आवडता प्रकार. सर्व रीती तपासून पाहा. भरपूर लेखन होईल.
    मीही अधूनमधून कथा लिहितो.
    पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. अनपेक्षित शेवट. छान जमली आहे.

    ReplyDelete
  4. Very nice story. I liked it because we always assume what people want and then make our own opinions about them. Talking about the issue definitely resolves most of the problems. And i would prefer this way always. More we keep inside, worse the relations get. Very good flow as well.
    Keep writing.
    Vidya.

    ReplyDelete
  5. Thanks all for the encouraging comments!

    ReplyDelete

Thank You