Thursday, November 22, 2012

निर्णय


प्रिया दुपारच्या उन्हात रिक्षात बसून निनादचं घर शोधत होती. मनात चरफडत तिने रिक्षा सोडली, रिक्षावाल्याला पैसे दिले आणि आता निनादची सोसायटी चालतच शोधण्याचा निश्चय केला. निनाद साने तिच्याच इंजिनियरिंग कॉलेजमध्ये होता, पण वेगळ्या शाखेत. त्याला कॅंपस मुलाखतीतून एका बडया आयटी कंपनीत नोकरी मिळाल्याबद्दल आज दुपारी त्याच्या घरी खास जेवणाची पार्टी होती. वास्तविक निनाद हा तिचा काही खास मित्र वगैरे नव्हता. पण प्रज्ञा देवधर त्याची गर्लफेंड, आणि प्रिया प्रज्ञाची जवळची मैत्रिण. म्हणून या पार्टीत प्रियालाही आमंत्रण मिळाले होते आणि प्रज्ञाच्या धाकामुळे ती मुकाटयाने आलीही होती. शेवटी दोन वेळा चुकीच्या दिशेने जाऊन आल्यावर एकदाचे निनादचे घर सापडले.
निनादच्या घरी प्रज्ञा आधीच आलेली होती आणि निनादच्या आईला स्वयंपाकघरात मदत करत होती. निनाद म्हणे जेवणासाठी खास ऑर्डर केलेले सामोसे वगैरे आणायला बाहेर गेला होता. दिवाणखान्यात निनादच्या वर्गातली एक मुलगी आणि दोन मुलगे बसून गप्पा मारत होते. प्रियाने त्यांच्या गप्पांत सामील होण्याचा प्रयत्न केला. पण तिची त्या मंडळींची फारशी ओळख नव्हती आणि त्या मुलांनीही तिची ओळख करुन घेण्यात रस दाखवला नाही. तिने एकदा स्वयंपाकघरात जावं असा विचार केला. पण प्रज्ञाला निनादच्या आईशी त्या एकटया असताना बोलण्याची, इंप्रेशन पाडण्याची चांगली संधी मिळालेली असताना आपण उगाच तिथे जाणं तिला योग्य वाटेना.
निनादचे बाबा दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात बसले होते. त्यांच्या समोर पीसी होता आणि कसलंसं भविष्यविषयक सॉफ्टवेअर स्क्रीनवर दिसत होतं. निनादचे बाबा पत्रिका पाहतात हे तिला माहीत होतं. इंजिनियरिंग कंपनीतली नोकरी करुन फावल्या वेळात ते पत्रिका बघतात, त्यांच्याकडे पत्रिका बनवण्याचं सॉफ्टवेअर आहे, पण ते जास्तकरुन ओळखीच्या लोकांच्याच पत्रिका बघतात, जे भविष्य असेल ते चांगलं-वाईट कसंही असलं तरी स्पष्टपणे सांगतात, ते पैसे अजिबात घेत नाहीत, व्यवसाय म्हणून त्यांनी भविष्य सांगण्याचं दुकान थाटलेलं नाही- हे सगळं प्रज्ञाकडून तिला मागेच कळलेलं होतं.
एकटं गप्प बसून निनादच्या फ्रेन्ड्सच्या गप्पा ऐकून प्रिया कंटाळली. सहजच निनादच्या बाबांच्या जवळ जाऊन तिने विचारलं- "काका, माझी पत्रिका पण बघाल तुम्ही?"
निनादच्या बाबांनी पीसीवरची नजर आता तिच्याकडे वळवली. "तुझ्याकडे जन्मतारीख, वेळ आणि स्थळ हे डिटेल्स असले तर नक्कीच बघता येईल की!" ते हसून म्हणाले.
निनादसारखेच त्याचे बाबा पण उंच होते. उमदं व्यक्तिमत्व, बारीक कापलेले रुपेरी केस, गोरा रंग, हसरे डोळे, बारीक सोनेरी काडयांचा चष्मा, टी-शर्ट आणि जीन्स घातलेले, प्रेमळ हसणारे निनादचे बाबा तिला खूप आवडले. तिच्या बाबांसारखेच वाटले ते तिला. मुलांशी उगाच तुसडेपणाने न वागता प्रेमाने वागणारे. त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज झळकत होतं.
तिची जन्मतारीख आणि स्थळ तर तिच्या लक्षात होतंच. जन्मवेळही नेमकी आठवली तिला. मग ते सगळे डिटेल्स निनादच्या बाबांना- म्ह्णजे साने काकांना दिल्यावर त्यांनी तिची पत्रिका बनवली.
"हं...काय जाणून घ्यायचंय तुला?" ते म्हणाले.
तिला काही सुचेचना. "अं...मला...म्हणजे...अं..मला कॅंपस इंटरव्ह्यूमधून नोकरी कधी लागेल?" ती बोलून गेली.
काकांनी पाच-दहा मिनिटं पत्रिका पाहिली. डायरी उघडून त्यात काहीतरी आकडेमोड वगैरे केली. "कँपसमधून नाही लागणार तुला नोकरी. नंतर मिळेल. एक ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर या काळात. पण चांगली नोकरी असेल ती." काका म्हणाले.
तेव्हढयात निनाद खाण्याचे पदार्थ घेऊन आला. बाकी सगळा स्वयंपाक तयार होता म्हणून निनादच्या आईने सगळ्यांना लगेच जेवायला बोलावलं. प्रियाचं सानेकाकांशी नंतर पत्रिकेबद्दल काहीच बोलणं झालं नाही.
घरी गेल्यावर त्यांच्या भविष्याचा शांतपणे विचार केल्यावर तिला रागच आला. लोकांना शेवटचं सेमिस्टर व्हायच्या आधीच नोकरी मिळते. आणि आपल्याला इतक्या उशीरा- नोव्हेंबरमध्ये मिळणार म्हणे. तिने सानेकाकांच्या भविष्याकडे दुर्लक्ष करुन भरपूर मेहनत करुन कॅंपसमधूनच नोकरी मिळवायचं ठरवलं. पण त्यावर्षी कॅंपसमध्ये फारच थोडया कंपन्या आल्या आणि तिची डाळ कुठे शिजलीच नाही. परीक्षा झाल्यावर नोकरी शोधण्याचा तिने कसून प्रयत्न सुरु केला. पण कुठे नोकरी मिळेचना. ती निराश होऊ लागली. बघता बघता नोव्हेंबरचेही पंधरा दिवस उलटले. सानेकाकांचं वीस नोव्हेंबरचं भाकीतही खोटं ठरणार असंच तिला वाटू लागलं.
सतरा तारखेला एका लहानशा आयटी कंपनीतून तिला कॉल आला- आजच मुलाखतीला ये म्हणून. तिने त्या कंपनीचं आधी कधी नावही ऐकलं नव्हतं. तिचा CV त्यांना कुठे मिळाला हेही त्यांना सांगता आलं नाही. पण तिचा CV त्यांच्याकडे होता आणि त्यांनी तिला तातडीने मुलाखतीला बोलावलं होतं. आता तिला इतकं नैराश्य आलं होतं की अजिबात अपेक्षा न ठेवता पाय ओढत ओढत कंटाळलेल्या मन:स्थितीतच ती त्यांच्या ऑफिसमध्ये गेली. मुलाखत सुरळीतपणे पार पडली आणि दुसऱ्या दिवशीच- अठरा तारखेला- त्यांच्याकडून फोन आला. तिला नोकरी मिळाली होती. कंपनीची एकच अट होती. त्यांची एक ट्रेनिंगची बॅच वीस तारखेपासून सुरु होत होती- त्यात प्रियाही असणं गरजेचं असल्यामुळे तिने उदयाच- एकोणीस तारखेलाच- जॉईन केलं पाहिजे. प्रियाने ही अट अगदी आनंदाने मान्य केली!
लहान कंपनी होती, पगारही तसा कमीच दिला होता. पण प्रियाला मिळालेलं प्रोफाईल चांगलं होतं, कंपनीतलं एकंदरीत वातावरण चांगलं होतं. प्रियाचा बॉसही चांगला होता. ठराविक तास- नऊ ते सहा- काम करायचं, कंपनीच्या बसने आरामात जायचं-यायचं. त्यामुळे प्रिया लवकरच नवीन नोकरीत रमली. पहिला पगार झाल्यावर आवर्जून पेढयांचा भलामोठा बॉक्स घेऊन सान्यांकडे गेली. ’वीस नोव्हेंबरच्या आत नोकरी मिळेल आणि ती चांगली असेल’ हे काकांचं भाकीत तंतोतंत खरं ठरलं होतं. काकाकाकूंनी तिचं अगत्याने स्वागत केलं, खायला-प्यायला घातलं आणि एक छानशी पर्सही काकूंनी तिला भेट म्हणून दिली.
अशीच काही वर्षं गेली. निनाद आता अमेरिकेला सेटल झाला होता. त्याचा प्रज्ञाशी साखरपुडा झाला होता. त्यांचं लग्न जवळ आलं होतं. प्रिया प्रज्ञासाठी खूष होती पण आपली मैत्रिण आता आपल्यापासून दूर अमेरिकेला जाणार याचं वाईटही वाटत होतं. एकदा लग्नाच्या साडीखरेदीनंतर प्रिया प्रज्ञाबरोबर निनादच्या घरी गेली. सानेकाका आणि काकू घरी होतेच. सानेकाकांना बघून प्रियाला एकदम भविष्याची आठवण झाली. तिच्या कंपनीतून एका प्रोजेक्टसाठी दहा लोकांना काही महिन्यांसाठी युकेला पाठवणार होते. युकेसाठी निवड झालेल्या त्या दहा भाग्यवान लोकांची नावं जाहीर व्हायला दीड महिना अवकाश होता. प्रियाचंही नाव विचारात घेतलं जाणार होतं. आपली निवड होईल असं तिला प्रकर्षाने वाटत होतं.
"काका, मला मिळेल का युकेला जायला?" तिने न राहवून सानेकाकांना विचारलं.
काकांनी पीसीमध्ये तिची पूर्वी करुन ठेवलेली पत्रिका उघडली. जुनी डायरी काढून त्यातलं तिचं पानही उघडलं. नीट अभ्यास करुन त्यांनी उत्तर दिलं- "नाही बेटा. तुझ्या पत्रिकेप्रमाणे तू काही सध्या परदेशात जाणार नाहीयेस. तू तशी अपेक्षा न ठेवलेलीच बरी."
प्रिया वैतागलीच! सानेकाकांचं बोलणं फारसं मनावर न घेता ती युकेसाठीची नावं घोषित होण्याची वाट बघू लागली. ज्या दिवशी नावं जाहीर होणार होती त्या दिवशी ती इतकी टेन्स होती की तिने ऑफिसला दांडीच मारली- बरं नाही असं सांगून. आणि संध्याकाळी सहाला तिच्या एका सहकाऱ्याचा फोन आला- युकेसाठी तिची निवड झाली होती! सानेकाकांचं भविष्य चक्क खोटं ठरलं होतं. पुढचा एक आठवडा ती हवेतच होती. युकेला जाण्यासाठी काय काय नवीन शॉपिंग करायचं, तिथून भारतात काय काय घेऊन यायचं हेच तिच्या डोक्यात घुमत होतं. आणि एक दिवस मॅनेजरने युकेच्या लिस्टमधल्या पाच जणांना मिटींगला बोलावलं. ती उत्साहाने मिटींग रुममध्ये शिरली. मॅनेजरचा सुतकी चेहरा बघून मात्र तिला कसंतरीच वाटलं. "क्लायंटनी प्रोजेक्टमध्ये काही बदल केलेत. त्यांना खूप प्रेशर आहे कॉस्ट कमी करण्याचं. आता ते म्हणतायत की ऑनसाईट दहा लोकांना आणण्यापेक्षा भारतातून जास्त काम करणं स्वस्त पडेल. त्यामुळे युकेला दहाऐवजी आता पाचच लोक जातील. त्यामुळे तुम्ही पाच जण जात नाही आहात. रियली सॉरी अबाऊट इट..पण संधी पुढेही मिळत राहतील..जरा मार्केट सुधारलं की-" मॅनेजर बरंच काही बोलत होता. तिच्या कानावर आता काही पडतच नव्हतं.
युकेला जात नसण्याच्या दु:खातून जरा सावरल्यावर मात्र तिच्या लक्षात आलं- सानेकाकांचं भविष्य अचूक ठरलं होतं. तिची निवड होऊनही शेवटी तिला जाता आलंच नव्हतं. हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. सानेकाकांच्या भविष्यावरचा तिचा विश्वास वाढला.

काही महिन्यांनी एप्रिल-मेचा लग्नसराईचा सीझन आला. निनाद-प्रज्ञाचं लग्न होतं. त्याचबरोबर प्रियाच्या ओळखीत, नात्यात आणखी तीन-चार लग्नं लागोपाठ होती. या सगळ्या लग्नांमध्ये घालण्यासाठी तिच्या आईने बरेच दागिने लॉकरमधून काढून आणले होते. प्रिया आणि आई दोघी चार-पाच लग्नांत ते दागिने घालून मिरवल्या. सीझनमधलं शेवटचं लग्न तर घरचंच- प्रियाच्या सख्ख्या मामेभावाचं. ते लग्न झाल्यावर आवराआवर करताना एकदम आईच्या लक्षात आलं- एक सोन्याचा नेकलेस गायब होता. घरभर शोधून झाला, मामाकडे फोन केला- तिथेही शोधाशोध झाली- पण नेकलेस सापडला नाही. सोन्याचा नेकलेस हरवणं म्हणजे आर्थिक नुकसान तर होतंच, पण प्रियाच्या आईचा तो जुना, अत्यंत आवडता नेकलेस होता. आजकाल तसले घसघशीत नेकलेस कोणी सोनार बनवतच नव्हते. प्रियाने एकदा सहज सानेकाकांना फोन करुन ही नेकलेसची समस्या सांगितली. "प्रश्नकुंडली मांडून सांगतो. मला पंधरा मिनिटांनी फोन कर." काका म्हणाले.
पंधरा मिनिटांनी फोन केल्यावर काकांचं उत्तर तयार होतं- "तो नेकलेस चोरलेला नाहीये- तो घरातच आहे. नीट शोधा म्हणजे सापडेल."
परत एकदा शोधाशोध केली, पण नेकलेसचा पत्ता नव्हता. नेकलेस गेल्याचं दु:ख आता सगळ्यांनी स्वीकारलं. प्रियाची आई दर थोडया दिवसांनी स्वयंपाकघर साफ करायची. एक दिवस असंच आवराआवरी करण्यासाठी स्वयंपाकघरातला एक ड्रॉवर तिने उघडला. त्यात नेहमी कापूर, सुपारी वगैरे पूजेशी संबंधित सामान असायचं. आज त्यात चक्क नेकलेसही होता. आईने भाच्याच्या लग्नानंतर घरी आल्यावर घाईघाईत स्वयंपाकघरातच नेकलेस ठेवला आणि नंतर साफ विसरुन गेली. रोजच्या पूजेला कापूर वगैरे लागत नसल्यामुळे तो ड्रॉवर काही रोज उघडला जात नसे. त्यामुळे नेकलेस त्यातच राहिला. नेकलेस मिळाल्यावर घरी आनंदीआनंद झाला. प्रियाने सानेकाकांना लगेच फोन करुन ही बातमी कळवली. त्यांच्या भविष्यावरचा तिचा विश्वास आणखी बळकट झाला होता.

आता प्रियासाठी वरसंशोधनाला सुरुवात झाली होती. नोकरीत ती चांगली रुळली होती. बघता बघता वय वर्षं सत्ताविस झालं होतं. आईबाबांनी आता तिच्या लग्नाचं चांगलंच मनावर घेतलं. मुलाकडची मंडळी पत्रिका मागत. तिला मंगळ होता. त्यामुळे अनेक जण नकार देत. मंगळ चालत असला, तरी पत्रिकेत किमान अठरा गुण जमायला हवेत अशीही अनेकांची अट असायचीच. ती एकदा खास फोन करुन अपॉईन्टमेन्ट घेऊन सानेकाकांना भेटून आली. "लग्नाचा योग आहे. प्रयत्न चालू देत." असं त्यांनी सांगितलं. "एखादं स्थळ असेल तर तू दोघांच्या पत्रिका घेऊन ये, मी बघून सांगेन काय ते. मंगळ, गुण बघणं, इतरही बरंच काही बघायचं असतं पत्रिका जुळवताना." ते शांतपणे म्हणाले. सानेकाकांशी बोलल्यावर नेहमीच तिला बरं वाटायचं, तसं आजही वाटलं. काकूंच्या हातची कॉफी पिऊन ती निघाली. "येत जा गं..प्रज्ञा इथे नसली म्हणून काय झालं..आम्ही आहोत ना. आम्ही दोघंच असतो आता. बरं वाटतं तुम्ही मुलं कोणी आलात की." काकू प्रेमाने म्हणाल्या. त्यांना वरचेवर यायचं आश्वासन देऊन ती घरी परतली.
तिचं कुठे काही जमत नव्हतं. कोणताच मुलगा ’क्लिक’ होत नव्हता. साने दांपत्य काही दिवसांनी प्रज्ञाच्या बाळंतपणासाठी शिकागोला रवाना झालं.
एक दिवस रात्री आईने तिच्या हाती एक कागद आणून दिला. त्यावर एक ईमेल आयडी होता. "आत्याने स्थळ आणलंय. तिला वधूवरसूचक मंडळात मिळालं. मुलगा सीए आहे. कुठल्याशा मोठया कंपनीत काम करतो. तुझ्यासारखाच त्यालाही मंगळ आहे. तू जरा तुझी पत्रिका आणि फोटो ईमेल कर बघू त्याला."
काहीशा अनिच्छेनेच तिने ईमेल पाठवली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून मेलबॉक्स उघडली तर समोर त्याचा रिप्लाय आलेला होता. तिने लंचब्रेकमध्ये कोणी आसपास नाहीये असं बघून हळूच त्याने पाठवलेली फाईल उघडली. आत पत्रिका होती, त्याचे फोटोही आणि त्याची माहिती. त्याचं नाव श्रीरंग. तिला पहिल्यापासून ते नाव खूप आवडायचं. तिने फोटोंवर नजर टाकली. उंच, स्मार्ट. दिसायला अगदी देखणा म्हणण्यासारखा नाही पण आकर्षक. एका फोटोत तो एका कारला रेलून उभा होता. त्याचीच कार असावी ती. मस्त गडद निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर. त्याची माहितीही होती त्या मेलमध्ये. बाप रे! बारावीत चक्क कॉमर्सच्या मेरिट लिस्टमध्ये आला होता तो. त्याची पत्रिका आणि जन्मतारीख, वेळ वगैरे त्याने पाठवलं होतंच. वर असंही लिहिलं होतं की त्याला पत्रिका बघायची नाहीये. सगळ्यात शेवटी त्याने लिहिलं होतं- "तुला चालणार असेल तर तुझा मोबाईल नंबर दे. मी फोन करेन. किंवा तू मला फोन कर." त्याचा नंबरही होता. तिने त्याला मेसेज केला. "हाय, धिस इज प्रिया. तुमची ईमेल मिळाली. तुम्हाला आज सात वाजता फोनवर बोलायला वेळ आहे का?" त्याचा क्षणार्धात रिप्लाय आला."येस..आय विल कॉल यू."
सातच्या ठोक्याला त्याचा फोन आला. त्याचा आवाज अगदी भारदस्त आणि पुरुषी होता. तिला खूप आवडला त्याचा आवाज. "मला ना, हे कांदे-पोहे प्रकरण काही झेपतच नाही. किती ऑकवर्ड वाटतं. त्यापेक्षा असं इन्फॉर्मल बोलणं-भेटणं बरं पडतं." तो म्हणाला. "मलाही तसंच वाटतं." प्रियाने त्याला लगेच अनुमती देऊन टाकली. जवळजवळ अर्धा तास त्यांच्या गप्पा रंगल्या. त्याने त्याच्याविषयी खूप माहिती दिली. कॉलेज कुठचं, सीए कधी झाला, कामाचं स्वरुप काय आहे, घरच्यांबद्दल माहिती, त्याचं एकंदरी रुटिन काय असतं, वगैरे. मध्येच- "सॉरी मी खूपच बोलतो ना. तूही सांग ना तुझ्याबद्दल." अशी तिला बोलायला मुभा दिली. तिने त्याला ’तुम्ही’ म्हणून संबोधित केल्यावर "तुम्ही???? आवरा!!! अगं मी फक्त दीड वर्षाने मोठा आहे तुझ्यापेक्षा-" असं म्हणून तिला अरे-तुरे करण्याची परवानगीही लगेच देऊन टाकली त्याने.
"आपण भेटू या का? घरच्यांबरोबर भेटण्याऐवजी एखादया कॉफी-शॉपमध्ये वगैरे?" त्याने आर्जवी स्वरात तिला विचारलं.
"अं..हो..चालेल की-" तिच्याही नकळत ती म्हणाली.
"हा आठवडा मला खूप काम आहे ऑफिसमध्ये. इन फॅक्ट आत्ताही मी ऑफिसमध्येच आहे. कदाचित वीकेन्डही वर्किंग असेल. सोमवारी एक डेडलाईन आहे. ती झाल्यावर आपण पुढच्या आठवडयात भेटू या का?"
"हो...तुला जमेल तसं." ती सहजपणे म्हणाली.
रात्री झोपायला गेल्यावर सारखा त्याचाच आवाज आठवत होता तिला..माय गॉड....कसला सेक्सी आवाज लाभलाय त्याला. त्याच्या विचारात ती असताना त्याचा मेसेज आला- "Just reached home. It was really nice talking to you. Looking forward to meeting you in person next week. Good night and sweet dreams :)"
म्हणजे तोही आत्ता तिचाच विचार करत होता तर! त्याला रिप्लाय करुन ती झोपली. पुढचे तीन-चार दिवस रुटीनचेच असले तरी जरा खास होते. दिवसभरात दोघांमध्ये मेसेजेसची देवाणघेवाण व्हायची. पहिल्या दिवशी बोलताना त्याने त्याच्या कॉलेजचं नाव सांगितलं होतं. तिची चुलत बहीण स्वप्नाही त्याच कॉलेजमध्ये, श्रीरंगच्याच बॅचमध्ये होती. प्रियाने लगेच तिच्या स्वप्नाताईला फोन लावला. "चांगला मुलगा आहे श्रीरंग. खूप मुली मागे असायच्या त्याच्या. पॉप्युलर होता तो खूप. पण तो असा काही फ्लर्ट वगैरे नाहीये. आणि ब्रिलियन्ट आहे हं एकदम तो. नेहमी टॉपर असायचा." स्वप्नाताईनेही श्रीरंगचं भरपूर कौतुक केलं. प्रियाला श्रीरंग मग आणखीच आवडायला लागला.
शुक्रवारी रात्री श्रीरंगचा फोन आला. त्याला वीकेन्डलाही ऑफिसला जायचं होतं. म्हणून तो जरा वैतागला होता. त्याचा मूड सुधारावा म्हणून तिने जरा ’सुट्टीत कुठे कुठे जातोस’- असा विषय काढला. "मला गोवा सगळ्यात जास्त आवडतं. मी तर बाईकवरुन पण गेलोय कैक वेळा. तिथे एका बीचजवळ माझं एक आवडतं हॉटेल आहे राहायला. आणि त्या हॉटेलच्या जवळच एका कॉर्नरला एक रेस्टॉरन्ट आहे. ते तसं साधंच आहे पण तिथे जबरदस्त टेस्टी फिश मिळतं. मी तिथे इतकं फिश खातो! आपलं लग्न झाल्यावर तुला घेऊन जाईन मी तिथे-"
तिने तर श्वासच रोखला त्याचं वाक्य ऐकून. तोही गडबडला लगेच.
"आय मीन...जर आपलं लग्न झालं- तर- नक्की जाऊ आपण तिथे-" तो सावरुन घेत म्हणाला.
"पण मी बाईकवरुन नाही हं येणार-" तीही सगळं लाईटली घेत म्हणाली.
"हां ते ठीक आहे...मी तुला माझ्या स्विफ्टमधून घेऊन जाईन- मला ड्राईव्ह करत जायला पण आवडतं-" तो उत्साहाने म्हणाला. अगदी पुढच्याच आठवडयात गोव्याला जात असल्यासारखं!
रात्री तिच्या मिटल्या डोळ्यांसमोर गोव्याला जाण्याचा हाय वे दिसत होता...त्यावर श्रीरंगची निळी स्विफ्ट...एक्स्पर्टली ड्राईव्ह करणारा उंच,रुबाबदार श्रीरंग..आणि त्याच्या बाजूला बसलेली ती. सुखी, तृप्त, हसतमुख.

शनिवारी सकाळी सकाळी श्रीरंगचा गुड मॉर्निंग मेसेज आला. बिचारा शनिवारीही सकाळी सहाला उठला होता. नऊच्या सुमारास तिचा फोन वाजला. श्रीरंगचा असेल या अपेक्षेने तिने फोन घेतला, तर फोन निनादच्या आईचा होता. ते तीन दिवसांपूर्वीच शिकागोहून परत आले होते. प्रज्ञाला दोन महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. प्रज्ञाने प्रियासाठी पाठवलेली चॉकलेट्स आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी प्रियाला ’दुपारी चहा प्यायला येऊन जा’ असं निनादच्या आईने सांगितलं.
प्रिया उत्साहात तयार झाली. श्रीरंगने पाठवलेल्या पहिल्या मेलमध्ये त्याचे डिटेल्स होते- जन्मतारीख, वेळ, स्थळ. ते तिने कागदावर लिहून घेतले.
सानेकाकांच्या समोर तिने तो कागद ठेवला. श्रीरंगला मंगळ आहे हे तिला आधीच माहीत होते. त्यामुळे पत्रिका जुळेल असंच तिला वाटत होतं.
सानेकाकांनी श्रीरंगची पत्रिका बनवली. मग दोघांच्या पत्रिकेचा अभ्यास केला.
"पत्रिका नाही जुळत आहेत तुमच्या. पुढे जाण्यात अर्थ नाही." ते गंभीरपणे म्हणाले.
प्रियाचा घसा कोरडा पडला, हातपाय कापू लागले.
"अहो पण...त्याला पण मंगळ आहे-"
"हो...आहे ना. पण केवळ मुलगा-मुलगी दोघांना मंगळ आहे याचा अर्थ पत्रिका जुळते असा होत नाही. तुम्हा दोघांच्या पत्रिका तर अजिबातच जुळत नाहीयेत."
प्रिया सुन्न झाली एकदम.
"तू भेटली आहेस त्याला?" काकांनी विचारलं.
"अं...नाही अजून.."आम्ही पुढच्या आठवडयात भेटणार होतो.." ती उत्तरली.
"हां...मग ठीक आहे. माझ्या मते तरी पुढे जाऊ नकोस. बाकी तू काय ते ठरव."
"पण...काही उपाय, सोल्यूशन नाही का?" तिने क्षीण आवाजात विचारलं.
"नाही ना. म्हणजे तशी तुझी पत्रिका ठीक आहे. त्याचीही चांगलीच आहे. पण तुमच्या पत्रिका एकमेकांशी मॅच होत नाहीत. हे बघ- तुझ्या या स्थानात ग्रह कसे पडलेत- आणि त्याच्या पत्रिकेत-" काका तिला समजावू लागले पण तिला ते स्पष्टीकरण डोक्यावरुन जात होतं.
"तरी पण म्हणजे- काय होईल- जर आम्ही केलंच लग्न तर? काय धोका आहे?" तिने चिवटपणे विचारलं.
काकांनी एक सुस्कारा सोडला.
"हे बघ...जास्त खोलात शिरु नकोस तू."
"I...I just want to know...सांगा ना काका-  What is the worst that can happen?"
"त्याच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो- अपघात-घातपात - त्यातून मृत्यू वगैरे-" काका म्हणाले.
प्रिया अवाक झाली.
"दुसरी कोणाची पत्रिका आणली आहेस का तू? का हे एकच स्थळ होतं?" काका विषय संपवत म्हणाले.
"ही एकच पत्रिका आणली होती." प्रिया म्हणाली. मग तिथून निघालीच ती तडक. काकू थांबायचा आग्रह करत होत्या तरी काहीतरी कारण काढून ती लगेच निघाली.
तिचं डोकं बधीर झालं होतं. आता काय करायचं? श्रीरंगचा तर पत्रिका बघण्यावर विश्वासच नव्हता. त्याने तिला त्याचे डिटेल्स, अगदी मराठीत केलेल्या पत्रिकेची स्कॅन केलेली कॉपीही पाठवली होती. पण त्याचबरोबर त्याला आणि त्याच्या घरच्यांना पत्रिका पाहायची नाही हेही स्पष्टच लिहिलं होतं त्याने. सानेकाकांचा प्रचंड राग आला तिला. पण त्यांची तरी काय चूक? तिने विचारलं म्हणून त्यांनी सांगितलं. ते त्यांच्या शास्त्राशी प्रामाणिक होते. पुढे हवा तो निर्णय घ्यायला ती मोकळी होती. पण जर खरंच श्रीरंगला तिच्या पत्रिकेमुळे पुढे काही झालं तर? ती ते सहन करु शकेल? स्वत:ला माफ करु शकेल?
शनिवार आणि रविवारची रात्र ती झोपूच शकली नाही. सगळा वेळ तिने विचार करण्यात आणि स्वत:च डोकं दुखवून घेण्यात घालवला. सोमवारी रात्री तिचा फोन वाजू लागला. श्रीरंग कॉलिंग...तिने थरथरत्या हातांनी फोन उचलला. "हॅलो.." ती कसंबसं म्हणाली.
"हाय!!" त्याचा आवाज उत्साही, आनंदी, टेन्शन फ्री होता.
"सुटलो एकदाचा. झालं ते ऑडिट पूर्ण. व्यवस्थित झालं सगळं. आता मला जरा वेळ मिळेल. कधी भेटायचं आपण? हॅलो? प्रिया?"
"अं...श्रीरंग...actually...मी काल माझ्या एका ज्योतिषी काकांकडे गेले होते. म्हणजे माझ्या मैत्रिणीचे सासरे. ते गेली अनेक वर्षं माझी पत्रिका बघतात. मी त्यांना आपल्या पत्रिका दाखवल्या."
"बरं मग?" श्रीरंगच्या आवाजात नाराजी होती.
"तर...ते म्हणाले की...आपल्या पत्रिका जुळत नाहीयेत अजिबात. पुढे जाऊ नका म्हणाले. म्हणजे पुढे आपल्यालाच त्रास होईल-"
"ते काय म्हणाले ते मला सांगू नकोस. तुझं काय म्हणणं आहे ते सांग."
"माझंही...म्हणजे तेच...लेट्स स्टॉप धिस. नको भेटायला आपण." ती सगळं बळ एकवटून म्हणाली.
दोन मिनिटं जीवघेणी शांतता होती.
"अगं पण...जग कुठे पोचलंय आणि तू हे काय मानून बसलीयस..इंजिनियर आहेस ना तू? सायन्स स्टुडन्ट? मग तरीही-" त्याचा हा असा आवाज तिने कधीच ऐकला नव्हता. कातर झालेला, काहीसा हताश, हातातलं काहीतरी महत्वाचं निसटून गेल्यासारखा- तिला खूप तुटत होतं त्याच्यासाठी पण इलाज नव्हता.
"आय ॲम सॉरी. मी खरं तर आधीच पत्रिका बघायला हवी होती पण काका शिकागोला होते- ते आत्ताच आले त्यामुळे-"
तो गप्प.
"आय ॲम रियली सॉरी." ती पुन्हा म्हणाली.
"It's alright." त्याचा आवाज नाराज, तिच्यावर अतिशय चिडलेला.
"ओके देन, बाय. आणि तुझ्या सर्चसाठी ऑल द बेस्ट." तो कडवटपणे म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट न बघता त्याने फोन बंदही केला.
बंद झालेला फोन तसाच कानाशी धरुन ती कितीतरी वेळ सुन्नपणे उभी होती.

Saturday, November 3, 2012

जावे त्याच्या वंशा..


स्नेहाने शेवटचा बटाटेवडा टिश्यू पेपरवर टाकला आणि मग एकदा आपल्या कामगिरीकडे समाधानाने नजर फिरवून ती स्वयंपाकघरात घातलेला पसारा आवरु लागली. पसारा आवरुन झाल्यावर तिने नीटनेटक्या स्वयंपाकघरात चहाची तयारी केली. बटाटेवडे तिने डब्यात भरले होते. आता सचिन आला की लगेच संध्याकाळचा चहा टाकायचा, बटाटेवडे जरा थंड वाटले तर मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचे की झालं! आज रात्रीचा स्वयंपाक सकाळीच तयार झाला होता. फक्त सगळ्या गोष्टी फ्रीजमधून काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायच्या. त्यामुळे उदया सकाळपर्यंत स्नेहाला स्वयंपाक करायचा नव्हता. तिच्याकडॆ आता रिकामा वेळ होता. तिने लॅपटॉप उघडला. फेसबुकवरती तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या त्यांच्या दुबई ट्रीपच्या फोटोंवर खूप कॉमेन्ट्स वगैरे आल्या होत्या. बटाटेवडे खात तिने फेसबुकवर नजर टाकली. ’पीपल यू मे नो’ - रीमा देशमुख. ते नाव बघून स्नेहा एकदम खूप वर्षं मागे गेली. रीमा तिच्या वर्गात होती. आठवी ते दहावी ही तीन वर्षं. वर्गात त्या दोघींची स्पर्धा लागलेली असायची. कोणाला जास्त मार्क मिळतायत, कोणाला चित्रकला स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळतंय इथपासून ते कोणाच्या मागे जास्त पोरं लागली आहेत इथपर्यंत त्या दोघी एकमेकींची चढाओढ करत असत. क्वचित कधी त्यांची मैत्रीही व्हायची पण ते सौहार्द अळवावरच्या पाण्यासारखं काही दिवसच टिकायचं. मग पुन्हा स्पर्धा चालूच. स्नेहाचा स्वभाव मुळात भिडस्त. काहीसा घाबरटच. रीमाशी स्पर्धा करण्यात तिला फारसा रसच नव्हता. आपण बरं, आपलं काम बरं असं तिचं असायचं. पण रीमा तिला काही ना काही करुन चिथवायचीच. दोघी मुली हुशार, अभ्यासाबरोबर इतरही कलागुणांत निपुण, दिसायला स्मार्ट, सुंदर. त्यामुळे त्यांची ही अघोषित स्पर्धा शाळेतल्या लोकांसाठी एक प्रकारचं मनोरंजनच झाली होती.
दहावीच्या परिक्षेत स्नेहाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले. घरी आईबाबा नाही म्हटलं तरी अपसेट झालेच. नातेवाईकांचे टोमणे, मित्रमैत्रिणींच्या पालकांच्या चौकश्या. नको नको होऊन गेलं तिला सगळं. रीमाला मात्र चांगले गुण पडले होते आणि चांगल्या कॉलेजात प्रवेशही.
नंतर त्या दोघींचे मार्ग वेगळे झाले. शाळेतल्या इतर मित्रमैत्रिणींशी स्नेहाने संपर्क ठेवला पण रीमाशी मात्र नाही. आताही तिने रीमाला फ्रेन्ड रिक्वेस्ट टाकण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय रीमालाही तिचं प्रोफाइल दिसत असणारच कारण त्यांचे खूप कॉमन फ्रेन्ड्स होते. पण रीमानेही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली नव्हती. अर्थात, तिने पाठवली असती तरी स्नेहाने ती स्वीकारली नसतीच. पण रीमाविषयी उत्सुकता होतीच, त्यामुळे स्नेहाने तिचं प्रोफाइल उघडलंच. याला stalking म्हणतात हे तिला माहीत होतं. पण तिला खूपच उत्सुकता होती रीमा काय करतेय सध्या हे पाहण्याची.
रीमा एका मोठया आय.टी. कंपनीत नोकरी करत होती. साधीसुधी नोकरी नाही- ती प्रोजेक्ट मॅनेजर होती. तिच्या फोटो अल्बम्समध्ये जगभरातले फोटो होते. ऑफिसच्या कामानिमित्त जगभर फिरत होती ती. शिवाय एका मोठया मॅनेजमेन्ट कॉलेजमधून एक एक्झिक्युटिव एमबीएचा कोर्सही करत होती. शाळॆत दिसायची त्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिने घेतलेल्या नवीन महागडया गाडीचेही फोटो होते. आणि नुसतीच नोकरी एके नोकरी करत नव्हती रीमा. ती खूप पुस्तकं वाचत होती, चांगले चित्रपट बघत होती, तिच्या पेन्टिंग्जचे फोटोही होते फेसबुकवर. शिवाय जगभर फिरत असल्यामुळे फोटोग्राफीचाही छंद होता तिला. साडीपासून मिनी स्कर्टपर्यंत सगळया कपडयात सुंदर दिसंणारी, देशीविदेशी मित्रमैत्रिणी असणारी, लाखो रुपये कमावणारी, जगभर फिरणारी, छंद जोपासणारी रीमा पाहून स्नेहाला अगदी बिचारं असल्यासारखं वाटू लागलं. ती काय काय करतेय, कुठे पोचलेय..आणि आपण? नवऱ्यासाठी बटाटेवडे करतोय! स्नेहानेही शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळवली होती. पण लग्न झालं आणि सचिनला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्याबरोबर तिलाही. मग दिली सोडून नोकरी. अमेरिकेत इतकी मंदी होती की तिथे तिला नोकरी मिळणं, कोणीतरी तिचा एच वन व्हिसा स्पॉन्सर करणं- सगळंच अवघड होतं.  भारतात परत आल्यावर पुन्हा नोकरी करण्याचा विचार मनात डोकावू लागला. पण आता सासर-माहेरच्यांना नातवंड हवं होतं. पटकन दिवस गेले नाहीत तेव्हा चेक-अप, फर्टिलिटी ट्रीटमेन्टचं चक्र चालू झालं. ट्रीटमेन्टच्या दरम्यान स्ट्रेस नको म्हणून डॉक्टरांनीच सुचवलं की नोकरी सध्या करु नकोस. आणि तशी आर्थिक गरज नव्हतीच. त्यामुळे आता तिचं आयुष्य ठरुन गेलं होतं- स्वयंपाक करायचा, घर नीटनेटकं ठेवायचं, दर महिन्याला ट्रीटमेन्टचं फळ मिळण्याची वाट बघायची, बाकी मग होतंच- टीव्ही, वाचनालय, शेजारी-पाजारी, नातेवाईक, मैत्रिणी- वेळ निघून जायचाच सहज. डॉक्टरांच्या मते अजून एक-दीड वर्षात स्नेहा आई होईल. मग आईपणात ती गुंतून जाणार. नोकरी वगैरे पुढची काही वर्षं कठीणच. आणि मग त्यानंतर तिला कोण चांगली नोकरी देणार? एखादी फुटकळ नोकरी मिळाली तर सचिन अजिबात करु देणार नाही.
सचिन स्वभावाने चांगला होता, सरळ मनाचा होता पण त्यांच्या संसारात सगळे मोठे निर्णय तोच घेणार हे नकळत ठरुनच गेले होते. स्नेहाच्या वाटयाला दुय्यम भूमिका कधी आली हे तिलाही कळले नव्हते.
आणि रीमा...ती किती सुखात होती...लग्न केलेले नाही...त्यामुळे नवरा, सासरची माणसे यांची मर्जी सांभाळण्याची जबाबदारी नाही. अजून ती तिच्या आईबाबांच्या घरीच राहत होती....त्यामुळे घरकामाची कटकट नाही. स्वयंपाकघरात तासनतास राबणे नाही. कोणी काहीही बोलणार नाही. "दिवसभर घरीच बसून असतेस ना?" "वेळ कसा जातो तुझा?" "बाहेर जाऊन नोकरी कर म्हणजे कळॆल तुला किती कठीण असतं सगळं ते!" असं काहीही ऐकून घ्यावं लागत नसेल. मोठी नोकरी, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वरचेवर जाणे, परदेशात (तेही ऑफिसच्या खर्चाने) फिरणॆ, भरपूर पैसा मिळवून तो स्वत:च्या मर्जीनुसार खर्च करणे, सतत नवीन गोष्टी शिकत राहणे, स्वत:च्या आवडी-निवडी जपणे- मजा होती  नुसती. स्वतंत्र, मुक्त आयुष्य जगत होती ती. कोणाला काही विचारायला नको, कोणाचं ऐकून घ्यायला नको. हवं तेव्हा झोपायचं, हवं तेव्हा उठायचं, हवं ते खायचं-प्यायचं. ’उदया भाजी कुठली करायची?" हा प्रश्न नसेल. स्नेहाला आता आपण अगदीच गरीब बिचारी काकूबाई झालो आहोत असं वाटू लागलं. तेव्हढयात बेल वाजली. सचिन आला होता. लॅपटॉप खाली ठेवून ती उठली. दार उघडून तिने सचिनला घरात घेतलं आणि लगबगीने चहाची तयारी करायला गेली. बटाटेवडे प्लेटमध्ये काढत असताना बाहेरुन सचिनचा त्रासलेला आवाज आला- "तुझा लॅपटॉप वापरुन झाला असेल तर बंद का नाही करत? निदान अनप्लग तरी कर. उगाच विजेचं बिल वाढतं- परवाच भरलं मी बिल..खूप जास्त आलं होतं गेल्या महिन्याचं-" "बिल वाढतं ते तुझा एसी सतत चालू असतो म्हणून-" असं म्हणावं असं स्नेहाच्या मनात आलं. पण तिने स्वत:ला आवरलं. उगाच तिला वाद नको होता. आपण कमवत नाही म्हणून सचिन आपल्याला पैश्यांवरुन असं बोलू शकतो असं वाटून तिला आणखीच बिचारं वाटू लागलं. "तू महिन्याला पाच लाख कमवत असतीस तरी सचिन हेच बोलला असता- त्याच्या दृष्टीने हा प्रश्न पैश्यांचा नसून विजेच्या गैरवापराचा आहे-" तिच्या लॉजिकल मनाने मुद्दा काढला. तो तिला पटलाही. तिने सचिनला चहा-खाणं बाहेर नेऊन दिलं. सचिनने बटाटेवडयांचं कौतुक केलं, मनापासून भरपेट खाल्ले...तेव्हा तिचा पडलेला चेहरा जरा सुधारला.

रीमा रात्री जेवण झाल्यावर तिच्या खोलीत आली. घडयाळात साडेनऊ वाजले होते. उदया शनिवारची सुट्टी असल्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती. तिने बेडमध्ये बसूनच लॅपटॉप ऑन केला. मेल्स वगैरे बघत एकीकडे फेसबुक उघडलं. पीपल यू मे नो- स्नेहा रानडे-आगाशे. तिने स्नेहाच्या प्रोफाइलवर क्लिक केलं. स्नेहा रानडे-आगाशे. मॅरिड टू सचिन आगाशे. प्रोफाइल फोटोत स्नेहाच्या बरोबर तिचा देखणा, उंच, गोरा-घारा नवरा. सचिन आगाशे. अल्बम्समध्ये फोटो होते- काही दुबईतले, काही अमेरिकेतले, काही मुंबईतलेच नातेवाईकांबरोबर वगैरे काढलेले. स्नेहाचं वजन वाढलं होतं. पण ते तिला शोभतही होतं. काठपदराची उंची साडी, ठसठशीत मंगळसूत्र, सोन्याचे घसघशीत दागिने घातलेली स्नेहा आणि तिच्या बाजूला सचिन. काही फोटो स्नेहाच्या पाककृतींचे होते. काही मैत्रिणींबरोबर काढलेले.
रीमाच्या मनात तुलना येऊन गेली आणि काहीशी असूयाही. स्नेहा पूर्णवेळ गृहिणी होती. काय आयुष्य असेल- छानपैकी स्वयंपाक करायचा, घर सजवायचं. दुपारी झोप काढायची, टीव्ही सीरीयल्स बघायच्या. ऑफिसमधल्या कटकटी नाहीत. तासनतास रात्रीबेरात्री काम करणं नाही. रात्री उशीरा एकटं घरी परतताना वाटणारी असुरक्षितता नाही. सुरक्षित, उबदार घराच्या चौकटीतलं आयुष्य. तिचे त्रास, संकटं, मनातले विचार- सगळं शेअर करायला तिचा हक्काचा नवरा होता. रात्रीच्या थंडीत तिला कुडकुडत एकटं झोपावं लागत नव्हतं. तिच्या नवऱ्याच्या उबदार कुशीत ती निर्धास्त झोपत असेल. आणि आपण? कितीही यश मिळवलं आपल्या करीअरमध्ये तरी नातेवाईक, मित्रमैत्रिणी या गोष्टीची जाणीव करुन देणारच की आपलं लग्न झालेलं नाहीये, आपण एकटया आहोत. आईबाबा काय आज आहेत, ते काही आयुष्यभर पुरणार नाहीत, वगैरे.
तसा रीमाने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला स्थळं भरपूर येत होती तिच्यासाठी. पण तिला कोणी पटकन पसंतच पडत नव्हतं. त्यामुळे बरीचशी स्थळं वजा होत होती. जी उरत होती त्यातली काही पत्रिका न जुळल्यामुळे बाद. त्यातून उरलेल्या स्थळांच्या बाबतीत कधी तिचा नकार- काही ना काही कारणांमुळे. आणि जिथे तिला सकारात्मक भावना होती तिथे नेमका समोरच्या बाजूने नकार. त्यामुळे योग जुळून आलाच नव्हता. आपल्या अपेक्षा कमी करुन नुसतं करायचं म्हणून मनाविरुध्द लग्न केलं तर आपण सुखी होणार नाही असं तिचं मत होतं. त्यामुळे तसं काही करण्याचा प्रश्न नव्हता. सुटेबल स्थळ असेल तर लग्न करायची तिची आजही तयारी होती पण आताशा स्थळं कमीच येत होती. तीच तीच स्थळं परत येत होती. तिच्यायोग्य असणाऱ्या बऱ्याच चांगल्या मुलांची लग्नं झाली होती. आईबाबांना तिच्या लग्नाची चिंता होतीच पण आता तेही स्थळं शोधून थकले होते, त्यांचंही वय झालं होतं. त्यांनीही हा विषय सारखा सारखा काढणं थांबवलं होतं. तिच्या कॉर्पोरेट जगातले पुरुष दोन प्रकारचे. काही जण तिच्याशी जेव्हढयास तेव्हढं प्रोफेशनल वागणारे. तर काहीजण ’इतर’ अपेक्षा ठेवणारे. ती खंबीर होती त्यामुळे कोणी थेट काही सुचवण्याचं धाडस केलं नव्हतं. शारीरिक सुखाची ओढ तिलाही होती पण तिला तिच्या संस्कारांशी विपरीत काही करायचं नव्हतं. आणि रीतसर लग्नाची मागणी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कुणी तिला अजूनतरी घातली नव्हती. विवाहित लोकांच्या ग्रुप्समधे चालणारे टिपीकल विषय- संसार, मुलं- यात तिला गम्य नसल्याने आजकाल अशा ग्रुप्समध्ये ती केवळ एक मूक श्रोता होऊ लागली होती. ऑफिसमधून घरी आल्यावर तिला एकटेपणा  जाणवू लागला होता. तिने ज्या ऑनलाईन matrimonial साईटवर नाव नोंदवलं होतं तिथे लॉग इन करुन ती पुन्हा एकदा स्थळं शोधू लागली. फेसबुकचं पेज क्लोज करताना ’स्नेहाचं आयुष्य आपल्यापेक्षा जास्त चांगलं आहे’ हा विचार मनात परत आलाच.

स्नेहा स्वयंपाकघरातली झाकपाक करुन बेडरुममध्ये आली. सचिनचा ऑनसाईट कॉल चालू होता त्यामुळे तो लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये ठाण मांडून बसला होता. दार लोटून ती बेडवर पडली. डोळे मिटून झोपेची आराधना करताना मनात विचार आला की रीमाचं आयुष्य आपल्यापेक्षा किती छान आहे.

Thank You