Sunday, April 28, 2013

जब तक है जान.....


यश चोप्रा म्हणजे माझे एक आवडते बॉलिवुडचे दिग्दर्शक. असंख्य भारतीयांना स्वप्नांच्या सुंदर, सुरेल दुनियेत नेऊन बोचरा, त्रास देणारा वर्तमानकाळ विसरायला लावणारे जादुगार. स्वत: यशजींनी उत्तमोत्तम चित्रपट बनवलेच, पण पुढे यशराज फिल्म्सतर्फे अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
King of Romance म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशजींनी प्रेमपटांना अतिशय सुंदर पध्दतीने प्रेझेन्ट केलं.
यशजींचा मुलगा आदित्य चोप्रा. त्याचा पहिलाच चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. अठरा वर्षांपूर्वी आलेला आणि लोकप्रियतेचे उच्चांक सर केलेला हा चित्रपट आजही रोमॅंटिक चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवून आहे. आदित्यने पहिल्याच चित्रपटात आपल्या पित्याचा वारसा समर्थपणे पेलला.
पुढे काही वर्षांनंतर मात्र आदित्यने ’रब ने बना दी जोडी’ बनवला आणि तो चित्रपट मात्र माझ्या डोक्यात गेला. DDLJ बनवणारा दिग्दर्शक ’रब ने’ सारखा बिनडोक चित्रपट बनवू शकतो? ’रब ने’ ने धंदा मात्र चांगला केला. काळाची पावलं ओळखून यशराजनेही रोमान्सवर भर न देता धूमसारखे सिनेमे बनवायला सुरुवात केली.

यश चोप्रांचा मरणोत्तर प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. ’जब तक है जान’. तो प्रदर्शित झाला त्यावेळी चित्रपटगृहात जाऊन बघता आला नाही. अलीकडेच छोटया पडदयावर पाहिला. रोमॅन्टिक आणि नर्म विनोदी असा हा चित्रपट आहे.

समर आनंद (शाहरुख खान) लंडनमध्ये राहणारा अठ्ठावीस वर्षांचा तरुण आहे. (शाहरुख खानचं वय अठ्ठावीस दाखवणं हा विनोद की दुर्दैव हे तुम्हीच ठरवायचं.) तो मीरा(कट्रिना कैफ) नामक सौंदर्यवतीच्या प्रेमात पडतो. तीही त्याच्या प्रेमात पडते. समरला अपघात होतो. मीरा समरचा जीव वाचवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करते आणि तो वाचल्यास त्याच्यापासून दूर जायचं ठरवते. आपण त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं तरच त्याचा जीव वाचेल असं मीराला का वाटतं, याचं समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही.
असो. तर मीरासारखी सौंदर्यवती हातची गेल्यामुळे समरला अर्थातच दु:ख होतं. आता अशावेळी एखादा नॉर्मल मुलगा काय करेल? मीरा कितीही सुंदर असली तरी डोक्याने अंमळ अधू आहे हे लक्षात घेऊन ब्रेक-अप झाला ते बरंच झालं असा विचार करेल, वधूवरसूचक मंडळात नाव नोंदवेल आणि आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करुन संसाराला लागेल. पण समरला फारच दु:ख झालंय आणि त्याचा हार्टब्रेक झालाय अगदी.

म्हणून तो भारतात परत येतो आणि इंडियन आर्मीत भरती होतो. (आर्मीत त्याला अशी सहजासहजी नोकरी कशी मिळते वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत. हिरो आहे ना तो. मग? त्याला शक्य आहे सगळं. आजकाल कुठेही इतक्या सहज नोकरी मिळत नाही हा भाग वेगळा. पण असो.) आर्मीत भरती होण्यामागे देशप्रेम किंवा साहसाची, सैनिकी जीवनाची आवड वगैरे काही नसते. आर्मीत जाऊन रोज मृत्यूला आव्हान दयायचं- म्हणजे मग मीराने घेतलेली शपथ आणि आपलं तिच्यावरचं प्रेम- यातल्या एकाची निवड देव करेल- हा समरचा उद्देश असतो. त्याप्रमाणे तो बॉम्ब निकामी करणाऱ्या टीममध्ये काम करु लागतो. दहा वर्षं जातात.
अकिरा (अनुष्का शर्मा) नावाची एकवीस वर्षांची सुंदर पत्रकार आता समरला भेटते, त्याची डायरी वाचते आणि त्याच्यावर ’स्टोरी’ करायचं ठरवते. त्याचवेळी त्याच्या प्रेमातही पडते. अकिराच्या स्टोरीसाठी ती समरला लंडनला बोलावते- फक्त एक दिवसासाठी- आणि तो लगेच जातो. (पुण्यातले लोक कोथरुडहून कर्वे नगरला जातात इतक्या सहजतेने यशराज फिल्म्सच्या चित्रपटातले लोक भारतातून लंडनला जातात.) आता लंडनमध्ये त्याला अपघात होतो. अकिरा त्याला हॉस्पिटलमधे ॲडमिट करते. तो शुध्दीवर आल्यावर डॉक्टरांच्या लक्षात येते- त्याची ’याददाश्त’ खो गेलेय (म्हणजे हरवलेय हो!) आणि त्याला असं वाटतंय की तो २००२ मध्ये आहे. (कोथरुडहून कर्वेनगरला जावं इतक्या सहजतेने तो २०१२ मधून २००२ मध्ये जातो.)


आता हा याददाश्तवाला फॉर्म्युला मराठी-हिंदी सीरीयलवाल्यांनी इतका वापरलाय की त्याची मजाच गेलेय. एकता कपूरच्या एका सीरीयलमध्ये तर आधी नायिकेच्या दुसऱ्या नवऱ्याची याददाश्त जाते, मग तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या मुलाची याददाश्त जाते आणि मग खुद्द नायिकेची याददाश्त जाते. या सगळ्या ट्रॅक्समध्ये दीडेक वर्षं निघून गेलं होतं. आणि मग शिवाय शेवटी कळतं की नायिकेची याददाश्त गेलीच नव्हती- तिचा पहिला नवरा तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा खून करेल या संशयामुळे त्याला रंगेहात पकडण्यासाठी तिने याददाश्त गेल्याचं नाटक केलं होतं-पण मग तिला शेवटी कळतं की पहिला नवरा बिचारा अगदीच निरपराध आहे! तर त्यामुळे हे ’याददाश्त’ प्रकरण म्हणजे मध्येच एकदम टीव्ही सीरीयल सुरु झाल्यासारखं वाटलं.

आता तमाम याददाश्त गेलेल्या लोकांप्रमाणेच समरची स्थिती नाजूक असते आणि कुठलाही धक्का त्याला सहन होणार नसतो. मग अकिरा मीराला शोधून काढते आणि समरला भेटवते. समरला सांगण्यात येतं की त्याचं आणि मीराचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालंय आणि तो लंडनमध्ये स्थायिक झालाय. यासाठी समरच्या एका पाकिस्तानी मित्राची मदत घेण्यात येते जो अर्थातच स्वभावाने खूप चांगला असतो. (बॉलिवुडपटांत पाकिस्तानी लोक नेहमी इतके चांगले का दाखवतात?) मीरा-समर असे पुन्हा एकत्र येतात. मग पुन्हा समरची मेमरी परत येते. मीराला आपली चूक उमगते. अकिराला तिची ’स्टोरी’ मिळते. आनंदीआनंद होतो.
डोकं बाजूला काढून न ठेवता बघितला तर त्रास होईल असा हा चित्रपट आहे. पण तरी यात काही खास ’यश चोप्रा’ स्पेशल टच आहेच. अकिराने समरवर प्रेम असल्याचं त्याला सांगितल्यावर तो तिच्या सादाला प्रतिसाद देत नाही. आपलं मीरावरच प्रेम आहे याबद्दल तो ठाम आहे. अकिराही सर्व शांतपणे समजून घेते आहे आणि समर-मीरा एकत्र यावेत असं तिलाही वाटतंय. यामुळे एक घिसा-पिटा प्रेमत्रिकोण निर्माण होत नाही. तो तसा न होणं हे खूपच सुखद आहे. यातच दिग्दर्शकाचं ’यश’ही आहे.
समर आणि मीराने वेगळं झाल्यावरही दहा वर्षं एकमेकांवर प्रेम करत राहणं, एकमेकांशी निष्ठावान राहाणं, आणि दहा वर्षांनी एकत्र आल्यावर त्यांच्या प्रेमातली उत्कटता तशीच असणं- ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली. दर महिन्याला जोडीदार बदलण्याचा ट्रेन्ड असणाऱ्या आजच्या जगात असं प्रेम कुठे बघायला मिळतं- प्रत्यक्षात तर जाऊच दया, पण पडदयावरही असं बेफाट प्रेम क्वचितच दिसतं. रोमान्सचा तुटवडा असणाऱ्या आजच्या जगात हा रोमान्स मनाला भावतो.


चित्रपटातली गाणी रहमानचं संगीत असूनही फारशी खास नाहीयेत. ’जब तक है जान’ हे टायटल गीत आणि ’सांस’ हे मुख्य गाणं सोडलं तर बाकी गाणी ठीकठाकच आहेत. त्यातही ’सांस’ हे गाणं कानाला गोड वाटत असलं तरी मला उगाचच वाटत राहिलं की विधुर सासऱ्याने दुसरं लग्न करुन नवीन सासू घरी आणल्यावर सुनेने आनंद व्यक्त करायला गायलेलं हे गाणं असावं- मुझे सांस आयी, मुझे सांस आयी.


कलाकारांविषयी लिहायचं तर कट्रिना कैफ सुंदर दिसली आहे आणि कामही तिने चांगलं केलंय. तिच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडला असेल. अनुष्का शर्मा चाचरत, तोतरेपणानी आणि भराभर बोलत असल्यामुळे तिचे काही संवाद नीट कळत नाहीत. कट्रिनाच्या मानाने तिचा प्रभाव पडत नाही. शाहरुख काकांविषयी काय लिहावं? कट्रिना-अनुष्काचा हिरो कमी आणि वडिलधारे काकाच जास्त वाटणाऱ्या शाहरुख खानने नेहमीच्या सफाईने काहीकाही सीन्समध्ये आपला ’signature' अभिनय केला आहे. पण बाकी एकंदरीत काहीकाही गोष्टी पंचवीशीच्या तरुणाने केल्या तर शोभून दिसतात, तेच पन्नाशीच्या काकांनी केल्यावर ’म्हातारा चळलाय’ असं वाटतं.

बाकी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम देखणी, आकर्षक, नयनरम्य आहे, यश चोप्रांच्या नावाला साजेशी आहे. शेवटच्या चित्रपटात काही त्रुटी जरी असल्या तरी एक प्रेमात पाडणारी प्रेमकथा यशजींनी नक्कीच दिली आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांतून त्यांचं नाव सिनेप्रेमींच्या मनात कायम राहील, यात शंका नाही.

Sunday, April 21, 2013

फुटक्या खिडक्यांची घरं


वसंत श्रीधर फडकेंनी घराचं दार किल्लीने उघडलं, किल्ली परत जाग्यावर ठेवली आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवणाची पिशवी टेबलावर ठेवली. बटाटयाचा रस्सा, गवारची भाजी, चार पोळ्या, भात, फोडणीचे वरण - त्यांनी जिन्नस वेगवेगळ्या भांडयांत काढले. सोबत सायलीच्या आईने दिलेले घरी केलेले आंब्याचे लोणचे आणि वसंत फडकेंनी स्वत: घरी विरजण लावून केलेले दही. त्यांनी पोळी-भाजी केंद्रातून आणलेले जेवण दुपार आणि रात्र दोन्ही वेळी पुरेल इतके होते.

आपले ताट वाढून घेऊन फडके हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले व त्यांनी रिमोट कंट्रोलने टीव्ही लावला. सगळ्या न्यूज चॅनेल्सवर त्याच त्याच बातम्या- राजकारणी भ्रष्टाचार करतायत,घरांचे भाव वाढतायत, बायकांवर आणि लहान मुलामुलींवर बलात्कार होतायत, सुप्रीम कोर्टाने सजा सुनावलेल्या बॉलिवूड स्टार्सचे चित्रपट शंभर करोडचा गल्ला जमवतायत, दुष्काळात राज्य होरपळतंय. वसंतरावांनी ताडकन टीव्ही बंद केला. त्यांना जेवण जाईना. तसंही जेवण अजिबात चवदार नव्हतं. विहीणबाईंच्या- सायलीच्या आईच्या हातचं लोणचंच काय ते चांगलं लागत होतं. शेवटी घरचं ते घरचंच.
पण वसंतरावांना घरचं जेवण आता मिळणार नव्हतं. त्यांची पत्नी शालिनी आता या जगात नव्हती. शालिनीच्या आठवणीने आलेला अस्वस्थपणा बोचत असताना त्यांनी कसंबसं जेवण संपवलं, ताट-वाटी घासून ओटयावर उपडी घालून ठेवली, उरलेलं जेवण झाकून फ्रीजमध्ये टाकलं. टेबल पुसलं. इतकं काम शालिनी असताना त्यांना कधीच करावं लागलं नव्हतं.
शालिनी समर्थपणे स्वयंपाकघर सांभाळत असे. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. पुढे शैलेशचं लग्न झालं आणि सायली सून म्हणून घरात आली. शालिनीच्या हाताखाली शिकून तीही टापटिपीने स्वयंपाकघर चालवण्यात तरबेज झाली. शैलेश-सायलीच्या दोन मुलांमुळे घर हसू-खेळू लागलं. पण शालिनीचं अचानक अल्पशा आजाराने भरल्या संसारातून उठून जाणं, नंतर शैलेश-वसंतरावात शुल्लक कारणांमुळे वाढत गेलेला वाद आणि विसंवाद, शैलेशने सरळ मुंबईला नवीन नोकरी स्वीकारणं आणि बायकोपोरांना घेऊन तिकडेच भाडयाने फ्लॅट घेऊन  राहाणं- या सगळ्या घटनाक्रमानंतर आता वसंतराव पुण्यातल्या आनंद सोसायटीतल्या घरात एकटेच राहात होते. शैलेश-सायलीशी संपर्क उरला नव्हता. सायलीच्या पुण्यातच राहाणाऱ्या आईबाबांना वसंतरावांबद्दल आपुलकी होती- ते अधूनमधून भेटायला येत तेव्हा फक्त वसंतरावांना मुलानातवंडांची ख्यालीखुशाली कळत असे.

वसंतरावांनी सेवानिवृत्तीच्या आधीच आर्थिक गुंतवणूक उत्तम केली असल्यामुळे त्यांना आर्थिक चिंता नव्हती. त्यांचे खर्चही फार कमी होते. एक पुस्तकांची लायब्ररी सोडली तर त्यांना कसलंही व्यसन नव्हतं.
वसंतरावांना मित्र फारसे नव्हते. नातेवाईकांनी त्यांच्या शैलेशशी झालेल्या भांडणानंतर त्यांच्याशी संबंध कमी करुन शैलेश-सायलीशी मात्र चांगले संबंध ठेवले होते. आनंद सोसायटीतल्या रहिवाश्यांशीही वसंतरावांचा फारसा संबंध नव्हता. त्यांचा बराचसा वेळ पुस्तके-वृत्तपत्रे वाचणं, घरातली कामं करणं, टीव्ही बघणं यातच जात असे.

वसंतराव बेडरुममध्ये झोपायला गेले. जरा डुलकी लागलेली असताना त्यांना अचानक जाग आली. जवळच असलेल्या झोपडपट्टीतली मुलं रस्त्यावर खेळायला आली होती. त्यांचा आरडाओरडा चालू होता. झोप उडाल्यामुळे वसंतराव बाल्कनीत जाऊन उभे राहिले. समोरच्या बिल्डिंगमधल्या एक ऐंशीच्या पुढच्या वयाच्या आजी काकुळतीला येऊन मुलांना विनवत होत्या- "अरे पोरांनो, नका रे आरडाओरडा करु. आजोबांना बरं नाहीये अजिबात. आत्ता कुठे जरा झोप लागली आहे त्यांना. प्लीज ऐका ना जरा." मुलांनी आजींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. वसंतरावांच्या डोक्यात तिडीक गेली. "अरे ए! काय चालवलंय तुम्ही? अजिबात खेळायचं नाही इथे. रस्ता आहे हा- मैदान नाही." त्यांनी वरुन आवाज चढवला. मुलांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं. मुलं आपापसात हिंदी बोलत होती. म्हणून मग "यहां पे मत खेलो- आवाज मत करो इतना-" वगैरे हिंदीमधूनही त्यांनी बोलून पाहिलं. पण मुलांनी काही लक्ष दिलं नाही. वसंतराव चडफडत आत आले. वास्तविक जवळच एक सोडून चांगली दोन मैदानं होती. पण ही मुलं गल्लीतच खेळायला येत- खेळण्यापेक्षा किंचाळणं आणि एकमेकांना जोरजोरात शिव्या देणं आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं यात त्यांना जास्त रस होता. मुलांचा दंगा वाढतच होता. चिडलेले वसंतराव स्वयंपाकघरात गेले. शालिनीने जमवलेल्या काचेच्या ग्लासेसचे आणि कपबश्यांचे अनेक सेट्स कपाटात होते. वसंतरावांनी वापरात नसलेल्या, जुन्या कपबश्यांचा एक संच बाहेर काढला. सकाळी नाश्त्यासाठी आणून ठेवलेली अंडीही उचलली. आणून ती अंडी नेम साधून मुलांवर मारली. मुलं कसली- सोळा-सतरा वर्षांचे टीनएजर्स होते ते. या हल्ल्याने ती गोंधळली. त्यांनी हल्ल्याच्या दिशेने वर पाहिलं. संतापाने लालबुंद झालेला गोरापान चेहरा. धगधगते, निखाऱ्यासारखे धुमसते घारेहिरवे डोळे. हातातला काचेचा कप रोखून वसंतराव पुढच्या हल्ल्यासाठी सज्ज उभे होते.
"अबे भाग रे- बुढ्ढा पागल हो गया है!" "चल दुसरी गलीमें जाके खेलते है!" मुलांनी एकमेकांना ओरडून सांगितलं आणि तिथून काढता पाय घेतला.
मुलांची पाठ वळल्यावर वसंतरावांनी कप-बश्या पुन्हा नीट शालिनीच्या कपाटात लावून ठेवल्या. समोरच्या सोसायटीतल्या आजींच्या आजोबांना बरं वाटलं असावं असं त्यांना उगाचच वाटलं आणि त्यामुळे समाधानही वाटलं.
’आनंद’मधले पांढरपेशा रहिवासी आपापल्या घरातून हा प्रकार बघत होते. वसंतराव नामक ’वेडसर’ म्हाताऱ्यामुळे एक चांगला टाईमपास सगळ्यांनाच मिळाला होता.


दिवसेगणिक वसंतरावांचा ’वेडसरपणा’ वाढत चालला होता. पाठीमागच्या गल्लीतली एक हाय-फाय मुलगी तिच्या कुत्र्याला घेऊन रोज ठराविक वेळी वॉकला यायची. आनंदच्या थोडं आधी असणाऱ्या एका फास्ट फूडच्या दुकानाशी तिचे मित्रमैत्रिणी उभे असायचे. त्यांच्याशी थोडावेळ बोलून ती कुत्र्याला घेऊन आनंदच्या गेटसमोर यायची. तो कुत्रा नेमका आनंदच्या गेटसमोर आल्यावर ’शी’ करायचा. मुलगी तशीच कुत्र्यासह पुढे सुरु व्हायची. वसंतरावांच्या हे लक्षात आल्यावर एक दिवस त्या वेळेला ते खालती हजर. मुलगी आणि कुत्रा दिसल्यावर त्यांनी पुढे होऊन तिला बजावले- "रस्ता आणि संडास यात फरक असतो हे कळत नाही का? कुत्र्याला शी स्वत:च्या घरात करायला सांगायची. आमच्या गेटसमोर याने घाण केली तर तुला ती उचलून बरोबर घेऊन जावी लागेल." मुलगी गोंधळून बघू लागली. तिला मराठी कळत नाही हे वसंतरावांच्या लगेच लक्षात आले. त्यांनी तोच मजकूर इंग्रजीत सांगितला. मुलीने त्यांच्याकडे तुच्छतेने बघितले. "आप ज्यादा बकवास मत करो अंकल- फालतूमें टाईम वेस्ट मत करो- यहां के कॉर्पोरेटर मेरे पापा के दोस्त है." कुत्र्याने आजही शी केलीच. मुलगी तिथून निघून गेली. वसंतरावांनी शांतपणे सोबत आणलेल्या वर्तमानपत्रात सगळी घाण भरली आणि घरी घेऊन गेले.

मुलगी थोडया वेळाने त्याच रस्त्याने उलटी परत जात असे. तेव्हा वसंतरावांनी वरुन कुत्र्याची घाण त्या मस्तवाल मुलीच्या अंगावर फेकली.

"मेरा कोई नही है इस दुनिया मे- वाईफ मर गयी है. अकेला रहता हू. तुम्हारे कॉर्पोरेटर को बोलो मेरा खून कर देने को- आय डोन्ट केअर!" तिला सरळ आव्हान देऊन वसंतराव बाल्कनीतून हॉलमध्ये येऊन बसले. आनंद सोसायटी थक्क. फास्ट फूडच्या दुकानासमोरचे तिचे मित्रमैत्रिणी तिच्याकडे बघत होते पण किळस वाटून पटकन कोणी तिच्या मदतीलाही येईना. उलट सगळ्यांना हसू आवरत नव्हतं आणि तिच्यापासून आपलं हसू लपवण्याचा सगळ्यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरत होता. रस्त्यावरुन येणारे-जाणारे इतर लोकही नेहमीचेच. सगळी पार्श्वभूमी माहीत असलेले. त्यामुळे त्यांनाही तिच्याविषयी सहानुभूती न वाटता घडल्या प्रकाराची गंमत वाटत होती. सगळेजण आपल्याला हसत आहेत आणि आपण अगदीच एकटे पडले आहोत हे लक्षात घेऊन खाली मान घालून ती मुलगी जवळजवळ पळतच आपल्या सोसायटीकडे गेली. दुसऱ्या दिवसापासून ती कुत्रावाली मुलगी पुन्हा आनंदच्या गल्लीत फिरकली नाही.
"वेडसर म्हातारा" आता आनंद सोसायटीसाठी रोजची करमणूक होऊ लागला होता.

आनंदच्याच गल्लीत असलेल्या उमंग कनाकियांच्या बंगल्यात एक दिवस कसलासा समारंभ होता. मोठयामोठया महागडया गाडया घेऊन अतिश्रीमंत पाहुणे समारंभाला आले होते. आनंदच्या दारात लावलेल्या ’नो पार्किंग’ च्या भल्यामोठया पाटीला न जुमानता लोकांनी गाडया तिथेच लावायला सुरुवात केली. पार्किंग शोधण्याचे कष्ट कोण घेणार? आणि इथे फुकट पार्किंग मिळत असताना पे पार्किंगचा खर्च कोण करणार? वसंतरावांनी एकदा वरुन ओरडून सांगून पाहिलं पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. मग मात्र त्यांनी लोकांना गाडया लावण्यास विरोध केला नाही. मात्र अंधार पडल्यावर त्यांनी खाली जाऊन एकूणएक गाडया पंक्चर केल्या.
आनंदच्या तळमजल्यावर राहणाऱ्या तीस वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या समीपने वसंतरावांना हे काम करताना पाहिले होते. गाडया पंक्चर झाल्यात हे कळल्यावर पाहुण्यांपैकी काही जाडजूड इसम समीपच्या दारात येऊन उभे राहिले आणि पंक्चरबद्दल जाब विचारु लागले. "मी आत्ताच घरी आलोय कामावरुन - मला काही माहीत नाही- पण तिथे ’नो पार्किंग’ लिहिले होते- त्यामुळे गाडया लावल्यात कशाला तिथे तुम्ही मुळात?" समीपने वसंतरावांचे नाव न सांगता दार लावून घेतले.
पाहुण्यांचा होत असलेला चडफडाट, त्यांना बसलेला भुर्दंड, ’या निरुपद्रवी मराठी मध्यमवर्गीय एरियात आपलं कोण काय बिघडवणार?’ या समजुतीला घडल्या प्रकारामुळे बसलेला धक्का, बंगल्याचा मालक उमंग कनाकियाचा रागाने फुललेला चेहरा- एकंदरीत हाही एपिसोड आनंदवासीयांसाठी ’रिॲलिटी शो’ हून मोठी करमणूक ठरला.


वसंतराव रोज आता काहीना काही भांडण किंवा कुरापत करतच होते. आत्तापर्यंत ते सोसायटीबाहेरच्या लोकांशी भांडण करत होते. पण मग एक दिवस त्यांची वक्रदृष्टी आनंदवरच वळली. दुसऱ्या मजल्यावरचे देवधर कुटुंबिय एक दिवस नळ तसाच चालू ठेवून घराबाहेर गेले होते. अश्या वेळी आनंदच्या टाकीमधला पाण्याचा आधीच कमी असलेला साठा संपून जायचा आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणाकडेच पाणी नसायचे. वसंतरावांनी स्वखर्चाने प्लंबर बोलवून देवधरांच्या घरात जाणारी पाण्याची लाईनच नादुरुस्त केली. हे सगळं होईपर्यंत देवधर घरी आले आणि वसंतरावांना जाब विचारु लागले. "आपल्या राज्यात लोकांना प्यायला पाणी नाहीये, आणि तुम्ही नळ तसाच चालू ठेवून सरळ निघून जाता? ही मस्ती? पाण्यावाचून तडफडा एक दिवस म्हणजे कळेल." वसंतराव तिथून निघून गेले. देवधरांनी दुसरा प्लंबर शोधून आणला आणि स्वत:चा पाणी पुरवठा पूर्ववत केला. त्यात त्यांचा बराच वेळ, श्रम आणि पैसाही खर्च झाला. आनंदवासीय तेव्हापासून घराबाहेर पडण्याआधी आपापल्या घरातले नळ मात्र आवर्जून तपासू लागले. उगाच वेडसर म्हाताऱ्याच्या तावडीत सापडण्याची कोणाची इच्छा नव्हती.

देवधर मात्र चिडले होते. हा वेडसर माणूस नको त्या उचापती करतो, बाहेरच्या लोकांशी भांडणे करतो त्याचा सोसायटीतल्या लोकांना त्रास होईल, झोपडीपट्टीतले उदयोन्मुख दादा-लोक, परिसरातले राजकारण्यांशी साटेलोटे असलेले श्रीमंत बंगलेवाले लोक- या सगळ्यांशीच हा वेडा पंगे घेतोय- हे सोसायटीसाठी चांगलं नाहीये- असं ते इतर आनंदवासीयांना सांगू लागले. वसंतरावांविरुध्द पोलिस तक्रार करावी, किंवा शैलेशशी संपर्क साधून ’त्यांना एकटं सोडणं धोकादायक आहे- त्यांना इथून ने’ असं त्याला निक्षून सांगावं- असं पिल्लू देवधरांनी सोडलं.

मात्र हे सगळं चालू असतानाच तिकडे मुंबईला सायली खूप अस्वस्थ होती. वसंतराव आणि शैलेशमधला दुरावा तिला बघवत नव्हता. मुळात तिला वसंतरावांविषयी खूप आदर आणि आपुलकी होती. तिचं आणि शैलेशचं लग्न रीतसर वधूवरसूचक मंडळातून स्थळ बघून ठरलं. लग्नात वसंतरावांनी कसलाही हुंडा, मानपान, देणीघेणी असल्या मागण्या केल्या नाहीत. ’आम्ही मुलाकडचे’ म्हणून तोरा स्वत: दाखवला तर नाहीच,पण इतर कोणाला दाखवूही दिला नाही. तिचे बाबा नको-नको म्हणत असतानाही लग्नाचा अर्धा खर्च वसंतरावांनी हट्टानी केला. लग्नानंतरही पित्याच्या मायेनेच ते सायलीशी वागत आले होते. शैलेश तर एकुलता एक मुलगा म्हणून त्यांचा खूपच लाडका होता. पण शुल्लक भांडणामुळे बाप आणि मुलगा डोक्यात राख घालून दोन दिशांना तोंडं करुन बसले होते.

तिची मुलं निरागसपणे आजोबांची आठवण काढायची. शैलेश बोलत नसला तरी त्याला होत असलेला त्रास सायलीला कळत होता. आधी आई अचानक गेली आणि आता वडील असून नसल्यासारखे. सायलीला तिच्या सासूची कमी प्रकर्षाने जाणवत होती. आज आई असत्या तर बाप-मुलगा असे दुरावले नसते- आईंनी असं घडूनच दिलं नसतं. पण आता त्या नाहीत तर सायलीलाच काहीतरी करुन दोघांना एकत्र आणायला हवं.

तिने हळूहळू शैलेशला समजावायला सुरुवात केली. झालं ते झालं, शेवटी ते तुझे बाबा आहेत, निदान आईंच्या आत्म्याला क्लेश होऊ नयेत, वगैरे वगैरे. त्यातच तिला एक पार्ट-टाईम नोकरीची चांगली संधी चालून आली.  मुलं आता तशी मोठी होती, शाळॆत जात होती पण सायली नोकरीवर गेल्यावर मुलांवर लक्ष ठेवायला घरात कोणीतरी वडिलधारं असतं तर बरं झालं असतं. जर वसंतराव मुंबईला आले, तर प्रश्नच मिटेल. मुलांनाही आजोबांचा लळा होताच. तिने शैलेशला हे सगळं समजावलं. सायलीला घराबाहेर पडता यावं, तिला स्वत:ची वेगळी ओळख असावी- अशी शैलेशचीही मनापासून इच्छा होती. अखेर शैलेश तयार झाला.


एक दिवस शैलेश, सायली आणि सायलीचे बाबा वसंतरावांच्या घरी आले. सायलीच्या बाबांनी मुत्सद्दी मध्यस्थाची भूमिका चोख पार पाडली. अखेर बापलेकात समेट झाला. नातवंडांच्या ओढीने वसंतराव मुंबईला यायला तयार झाले. चौथ्या दिवशी सामान बांधून वसंतराव मुंबईला रवाना झाले. शैलेशचा आलिशान प्रशस्त फ्लॅट अगरवाल टॉवरच्या सोळाव्या मजल्यावर होता. दोन-चार वॉचमन सतत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवायचे. इथे वसंतरावांना भांडण करण्यात तसा काही स्कोप नव्हता.

तीन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये एक बेडरुम वसंतरावांना देण्यात आली. आता त्यांना घरचं उत्तम जेवण मिळू लागलं. शैलेश-सायली त्यांचा मान ठेवून वागत, काळजी घेत. सिनेमाला, मॉलमध्ये शॉपिंगला, बाहेर जेवायला जाताना आग्रहाने सोबत घेऊन जात. आता वसंतरावांचा वेळ नातवंडांना सांभाळण्यात, त्यांचा अभ्यास घेण्यात जाऊ लागला. शिवाय घरातली आणि बाहेरची काही लहानसहान कामं त्यांनी आपण होऊन स्वत:वर घेतली होती. शक्य तितकी मदत मुलासुनेला करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी अभ्यास घ्यायला सुरुवात केल्यानंतर झालेल्या युनिट टेस्टमध्ये दोन्ही मुलांचे मार्क्स वाढले होते. एकंदरीत वसंतराव शैलेशकडे मजेत होते.

आनंद सोसायटीत सुरुवातीला लोकांना वाटलं की देवधरांनी खरंच वसंतरावांना घालवलं की काय? पण काही बायकांना सायली त्या दिवशी भेटली होती आणि सायली नोकरी करणार असल्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी वसंतराव मुंबईला जात असल्याचं तिने घाईघाईत सांगितलं होतं. त्यामुळे खरं कारण लोकांना कळलं. ’नातवंडांच्या निमित्ताने का होईना, वेडयाची ब्याद गेली एकदाची’ म्हणून लोकांनी आनंद व्यक्त केला. वसंतरावांचे आनंदमधले उपद्व्याप मात्र शैलेश-सायलीला अजिबात कळलेले नव्हते.
लवकरच आनंद सोसायटीचं जीवन मूळपदावर आलं. झोपडपट्टीतली पोरं येऊन दुपारी यथेच्छ दंगा करु लागली, ’नो पार्किंग’ ला न जुमानता गाडया दिवसदिवस उभ्या राहू लागल्या. पाण्याचा गैरवापर आणि त्यामुळे तुटवडा वाढला. आनंदसमोरचा रस्ता अस्वच्छ राहू लागला.

समीप ऑफिसात रात्रपाळी करुन घरी आला. त्याला असह्य झोप आली होती. एसी लावून त्याने बेडरुममध्ये ताणून दिली. पण पोरांच्या आरडाओरडयामुळे तो जागा झाला. वसंतरावांसारखं वागणं त्याला जमणारं नव्हतं. आता आपल्याला झोप येत असूनही झोपणं शक्य नाहीये हे स्वत:शी स्वीकारुन त्याने एचबीओवर चित्रपट लावला.  त्याचवेळी आपण वसंतरावांना मिस करतोय हे त्याने मनाशी कबूल केलं.
आनंदमधल्या इतर रहिवाश्यांची तीच परिस्थिती होती. वसंतराव तिथे असताना कोणीही त्यांना कधीही साथ दिली नव्हती. वसंतराव बनण्याची तर कोणाचीच इच्छा नव्हती. पण वसंतराव आयते मिळाले तर आनंद सोसायटीला आता हवे होते. देवधरांनासुध्दा.

Thank You