Tuesday, February 19, 2013

फ्लॅशबॅक


परवा एक खण काही कारणामुळे उघडला. हा खण फारसा उघडलाच जात नाही कारण रोजच्या वापराच्या वस्तू तिथे मी ठेवत नाही. वापरात नसलेल्या वस्तू डम्प करण्यासाठीचा तो ’जंक ड्रॉवर’ आहे. तर त्यात मला एक जुना कोडॅकचा डिजिटल कॅमेरा सापडला. अगदी बॉक्स-पॅक केलेला.
लहानपणी आमच्या घरात एकच कॅमेरा होता. कोडॅकचाच अर्थात. त्यात रिळ भरायचं, फोटो काढायचे, मग ते रिळ दुकानात नेऊन दयायचं, मग काही दिवसांनी पाकिटात घालून फोटो यायचे. ते बघण्याची काय उत्सुकता असायची. मग ते फोटो अल्बममध्ये लावायचे. एका रिळात मोजकेच फोटो मावायचे त्यामुळॆ डोक्यात तो आकडा असायचा फोटो काढताना- आता वीस झाले, चारच राहिले, आता जरा जपूनच क्लिक केले पाहिजे, वगैरे.
मग जेव्हा डिजिटल कॅमेरे नवीन नवीन आले तेव्हा हा डिजिकॅम घेतला. पहिला-वहिला. तो कोडॅकचाच का घेतला? तर तो घ्यायला मी आणि बाबा गेलो होतो. आणि चांगला कॅमेरा ब्रॅंड म्हणजे कोडॅक असं बाबांचं मत असावं. तो कॅमेरा नवीन असताना खूप कौतुकाने आणि उत्साहाने वापरला गेला. मग काही वर्षांनी त्याला काहीतरी झालं आणि तो चालेनासा झाला. बॅटरी बदलणं वगैरे नेहमीचे उपाय केल्यावरही तो चालू झाला नाही तेव्हा घराजवळच्या एका दुकानात तो रिपेअर करायला नेला पण त्या माणसालाही तो चालू करता आला नाही असं काहीतरी मला अंधुकसं आठवत होतं. त्यावेळी मी तो उचलून नीट पॅक करुन (यूझर मॅन्यूअल, सीडी, USB केबल, चार्जर इत्यादी) त्या खणात टाकला असणार. दृष्टीआड ते सृष्टीआड.
आता मात्र ठरवलं- हा खोका सरळ उचलून टाकून दयावा. उगाच खणात जागा व्यापतोय. पण हे इलेक्ट्रोनिक वेस्ट. ते सरळ कचऱ्याच्या टोपलीत कसं टाकणार? म्हणजे टाकायला हरकत नव्हती, पण तरीही मी विचारात पडले. नवऱ्याशी बोलले. घराजवळच्या दुकानात नेऊन तो रिपेअर होतो का ते बघावं, नसेल होत तर फेकून दयावा असा सल्ला टीव्हीवरची नजर न काढता आणि रिमोटवरची पकड जराही सैल न करता त्याने दिला. घरात आता Nikon चा एक आणि Sony चा एक असे दोन चांगल्यापैकी डिजिकॅम्स आहेत. गेली काही वर्षं आम्ही तेच दोन कॅमेरे वापरतो आहोत. याशिवाय घरात मोबाईल फोन्स, डेस्कटॉप, लॅपटॉप, आयपॅड वगैरेमध्ये प्रत्येकी किमान एक डिजिटल कॅमेरा आहे- तसे एकूण आठ-नऊ कॅमेरे असतील. त्यामुळे त्या जुन्या कॅमेऱ्याची त्याला अजिबातच पर्वा असण्याचं कारण नव्हतं. घराजवळच्या दुकानातल्या माणसाला कॅमेरा मागेच दाखवून झाला होता. परत तिथे तो नेण्यात अर्थ नव्हता. इस्टमन कोडॅक कंपनीने काही वर्षांपूर्वी bankrupcy साठी file केलंय आणि डिजिटल कॅमेरा उत्पादन बंद केलंय असं माझ्या कानावर होतं. कोडॅक म्हणजे एकंदरित सगळा आनंदच होता.
मग मीच जरा त्यात डोकं घातलं. यूझर मॅन्यूअल उघडून नीट वाचलं. बॅटऱ्या बदलून बघितल्या. अगदी Nikon वाल्याच्या बॅटऱ्या काढून यात घालून बघितल्या. थपडा मारुन काहीही इलेक्ट्रोनिक गोष्टी चालू होतात हा एक माझा जुना विश्वास आहे. त्यामुळे तेही करुन झालं. मॅन्यूअलमध्ये दोन-चार trouble-shooting चे सल्ले दिले होते ते फॉलो केले. शेवटी नक्की काय उपाय लागू पडला माहीत नाही पण आमचे कोडॅक काका अचानक चालू झाले!
नक्की चालू आहे ना हे चेक करण्यासाठी सोफ्यावर लोळून टीव्ही बघणाऱ्या नवऱ्याचे एक-दोन फोटो काढले. (त्याच्या चेहऱ्यावरचे आळस, कंटाळा, आपले असे अनावश्यक फोटो का काढले जात आहेत याचं चिडखोर आश्चर्य, जुन्या कॅमेऱ्यामध्ये मी इतका रस घ्यावा -तेही घरात दोन जास्त चांगले डिजिकॅम्स असताना- याबद्दलची हतबुध्दता- हे सगळे भाव त्या फोटोत टिपले गेले.)
मग जरा जुने फोटो आहेत का ते erase झालेत ते बघावं म्हटलं.
तर जुने फोटोही होतेच की. कधीकाळची दिवाळी, भाऊबीजेला ओवाळण्याच्या पोझमध्ये मी आणि माझा भाऊ. नात्यातल्या एका लग्नाच्या दिवशीचे फोटो- सगळ्यांनी नवीन भारी साडयांमध्ये कौतुकाने दिलेल्या पोझेस. माझी त्यावेळी आवडीने घेतलेली गुलाबी साडी. आईची गच्चीवरची बाग, त्यातली विविध तरारलेली रोपं. भूतकाळाचा विस्मरणात गेलेला एक तुकडा त्या कॅमेऱ्याच्या मेमरी कार्डमध्ये लपलेला होता आणि अचानक माझ्या समोर आला होता.
आता मी तो कॅमेरा जपून ठेवलाय. मी तो आता नियमितपणे वापरणार आहे.
पण तरी प्रश्न आहेच. आजकाल आपण इतके फोटो काढतो. डिजिकॅम, फोन, टॅबलेट वापरुन. पण पुढे काय होतं? ते सगळे फोटो एका ठिकाणी - म्हणजे लॅपटॉपवर ट्रान्सफर करा, मग त्यातले नको असलेले उडवा, उरलेले जीमेल, फेसबुक वगैरेवर टाकले जातात. प्रिंट घ्यायचा कंटाळा येतो- कशाला खर्च आणि अडगळ म्हणून. पूर्वीच्या काळी जे कौतुक असायचं फोटोचं...नीट अल्बम्समध्ये जपून ठेवलेले, वारंवार पाहिले जाणारे मोजकेच फोटो. ते आता नाही राहिलंय. आपला ’problem of plenty' आहे का हा?
अनेक बाबतीत हे जाणवतं. पूर्वी ऑडियो कॅसेटवर मोजकी गाणी असायची. किंवा टीव्हीवर ठराविक वेळी गाणी लागायची. आता इंटरनेट, टीव्ही, आयपॉडच्या जमान्यात हवं ते गाणं लगेच उपलब्ध असतं. पण ती गाणी तितकी मन लावून, involve होऊन ऐकली जात नाहीत. लहानपणी घराजवळच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम कोन खाणं हा एक खास कार्यक्रम असायचा. आता कधीही आईस्क्रीम कोपऱ्यावरच्या वाण्याकडेही उपलब्ध असतं. किंवा फ्रीझरमध्ये मोठा डबा आणून ठेवता येतो. जास्त frequently खाल्लं जातं आईस्क्रीम पण त्यात ती पूर्वीची मजा नाही.
यातून कसं बाहेर पडायचं- याचाच विचार चाललाय सध्या.

Thank You